बाबासाहेब चन्ने या व्यक्तिमत्वबद्दल लिहायचे म्हटले तरी काय लिहणार, प्रत्येक वेळी नवीन प्रचिती, नवीन प्रेरणा देण्याऱ्या असंख्य आठवणीपैकी कोणत्या घटना लिहाव्यात तसेच सर्वगुण संपन्न असलेल्या व्यक्तीचे कोणते गुण रेखाटवेत हा मोठा प्रश्न माझ्यापूढे उभा आहे. त्यांच्या बद्दल लिहायचे म्हटले की लेखणीला ब्रेक लागत नाही. असंख्य पाने कमी पडतील. पण तरीही वयक्तिक काही आठवणीना उजाळा देण्याचा छोटासा प्रयत्न करतोय.
२०२१ च्या १ जुलैला, आम्ही “युथ कट्टा साहित्यिक समूह” आणि “राईटर्स वर्ल्ड” च्या परिवारासोबत बाबाजी सरांचा वाढदिवस अगदी धुमधडाक्यात साजरा केला होता. शुभेच्छांची इतकी प्रचंड लाट होती, की शेकडो कवी, लेखक, साहित्यिक आपल्या लेखणीतून बाबांना शुभेच्छा देत होते. त्यातली निवडक आणि हृदयस्पर्शी कविता आम्ही एकत्र करून एक ऐतिहासिक काव्यसंग्रह तयार केला त्याचे नाव आदरणीय जगदीश संसारे सरांनी “मनामनातील बाबाजी”. असं ठरवलं.
या पुस्तकाच्या संपादनाची जबाबदारी बाबाजींनी मला दिली.आणि ते माझ्यासाठी आयुष्यभराचं गौरवपद ठरलं. हे माझं पहिलंच संपादन... पण खरंतर बाबाजींमुळे मी संपादक झालो! माझ्या साहित्यिक प्रवासाला दिशा, ओळख, आणि आत्मविश्वास मिळवून दिला तो बाबाजींनी.
“मनामनातील बाबाजी” चा प्रकाशन सोहळा पुण्याच्या पत्रकार भवन मध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला. त्याच दिवशी मला वाटलं, बाबाजींसारखा साहित्यिक, संपादक, विचारवंत आणि माणूस मिळणं, हे खरंच भाग्याचं लक्षण आहे.
बाबाजी सर आणि माझ्या नात्याचं स्वरूप नेहमीच गुरू-शिष्यासारखं राहिलं. ते माझ्यासाठी मार्गदर्शक, गुरु, आणि आत्मविश्वास देणारे स्नेहीही आहेत. आम्ही एकत्र अनेक साहित्यिक उपक्रम, स्पर्धा, कविता संग्रह, स्नेहमेळावे, शिवजयंतीसारखे सामाजिक उपक्रम राबवले, प्रत्येक वेळी बाबाजींचं मार्गदर्शन हे आमच्यासाठी एक आश्वासक छाया होती.
साहित्यक्षेत्रात माझ्यासारखे नवोदित, किंवा गावखेड्यांतून आलेले कित्येक लेखक, कवींना व्यासपीठ मिळवून देणारा एक आधारस्तंभ जर कोणी असेल, तर ते आहेत – बाबाजी सर!
आज माझ्यासारख्या शेकडो नव्हे, हजारो लेखकांच्या यशामागे त्यांच्या मागे उभं असलेलं एक न दिसणारं पण अत्यंत प्रभावी असं नाव आहे – बाबाजी चन्ने! मनामनातील बाबाजी या चरित्रपर काव्य संग्रहात त्यांच्या बद्दल बोलताना संत तुकाराम याच्या " बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले " हे वाक्य लिहले होते कारण या वाक्याची प्रचिती मला त्यांच्याशी ( बाबाजी) ओळख झाल्यावरच आली. बाबा अगदी असेच आहेत. तितकेच समजदार, अभ्यासू, आणि प्रेरणादायी. यामुळेच कदाचित त्यांचे नाव बाबासाहेब असावे. ( खरं तर "बाबा" हे त्यांचे नाव असले तरी नावाप्रमाणे आम्हा नवोदित लेखकांसाठी ते वडिलांसारखेच प्रेरणास्थानी कायम राहतील.)
योगास्पंदन या एका विचारक्रांतीचे खरे जनक म्हणजे बाबासाहेब चन्ने
साहित्याबरोबरच बाबाजींनी योगा स्पंदन या प्रकल्पाच्या माध्यमातून महाराष्ट्रात एक वैचारिक, आरोग्यपूर्ण आणि वैज्ञानिक जागरूकतेची चळवळ उभी केली. योगा हा विषय, जो अनेकांसाठी कंटाळवाणा वाटतो. पण योगाची गरज लक्षात घेऊन त्यांनी "योगास्पंदन ३६५" ही सर्वसमावेशक संकल्पना प्रत्यक्षात साकारली. आणि योग प्रशिक्षक म्हणून मी योगावर लिहलेले लेख ते वाचकांच्या मनस्थिती नुसार दैनिक जनसंजीवनीवर प्रकाशित करत असतात. मी स्वतः त्यांच्या 'योगा स्पंदन'साठी लेख लिहित आहे, पण प्रत्येकवेळी शब्द मांडताना त्यांच्या शैलीची कमतरता असते . सोप्या भाषेत गहन गोष्टी सांगणं हे त्यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य! असल्यामुळे त्यांच्या शब्दात ते लेख सजवले जातात. आणि नंतर त्याचे अंतिम व्हर्जन वाचकांना वाचायला मिळते.
योगाच्या माध्यमातून समाजाला शरीर, मन आणि विचारांनी सजग करण्याचं कार्य बाबाजी सातत्याने करत आहेत तेही फार मोठ्या निःस्वार्थ वृत्तीने.
बाबा शब्दांच्या पलीकडचे का आहेत?
मी अनेकदा म्हणतो – "बाबाजी सर यांच्यावर लिहणं म्हणजे म्हणजे शब्दांना मर्यादा लावणं!"
कारण बाबाजी हे व्यक्तिमत्व शब्दात मावत नाही. (मनामनातील बाबाजी या काव्यसंग्रहत मांडण्याचा प्रयत्न सुद्धा अपुरा पडला, जगदीश संसारे सर अध्यक्ष विश्वभान प्रतिष्ठान यांनी त्यांना नवोदित साहित्यिकांना घडवणारा अवलिया ही उपाधी दिली ती उगाच नाही.) त्यांचं माणूसपण, त्यांच्या डोळ्यातील तेज, त्यांच्या बोलण्यातली सौम्यता आणि मनात असलेली पारदर्शकता – हे सगळं अनुभवायला लागतं... वर्णन करता येत नाही.
बाबाजी म्हणजे एकच वाक्य –
"प्रत्येक नवोदित लेखकाच्या पाठीशी असलेली एक सावली जी त्याला उन्हात चालायचं बळ देते." म्हणूनच त्यांच्याबद्दल लिहताना थोडा संकोच वाटतो. कारण वर सांगितल्या प्रमाणे त्याच्यावर लिहणे म्हणजे शब्दावर मर्यादा घालणे हाच अर्थ होतो..
शुभेच्छांचा शब्दगंध
आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने, मी एकच गोष्ट नम्रपणे आणि प्रेमाने म्हणू इच्छितो –
“बाबा सर, तुमचं अस्तित्व आमच्यासाठी आशीर्वादासारखं आहे. तुमच्यामुळेच पहा नवोदित साहित्यिकांच्या जीवनामध्ये एक आशेचा किरण दिसत आहे. आपण एक ग्रामीण साहित्यिक आहात, पण याच्या पलीकडे आपण असे अनेक साहित्यिक घडवत आहात ही बाब खूप मोठी आहे. आपले हे कार्य असेच चालू राहावे. आपल्या छत्रछायेखाली व आपल्या मार्गदर्शनाखाली अजूनही अनेक साहित्यिक घडवायचे आहेत. त्यासाठी एक शिष्य म्हणून आपल्या प्रत्येक आदेशाचं , आपल्या प्रत्येक सूचनेचा व आपल्या प्रत्येक निर्णयाचं नेहमीच स्वागत असेल... तसेच या वाढदिवसाच्या निमित्ताने एसएमबीटी व राजयोगा व्यसनमुक्ती केंद्राच्या सर्व कुटुंबाकडून, रायटर्स वर्ल्ड साहित्यिक शृंखला,युथ कट्टा साहित्यिक मंच, व्यसनमुक्ती परिषद महाराष्ट्र राज्य, या सर्वांकडून आपल्या सर्जनशीलतेला, विचारांना, आणि माणूसपणाला आमच्याकडून कोटी कोटी प्रणाम!
वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा...!
आपल्या जीवनातील हा खास दिवस, नवे उमंग, नवे संकल्प आणि नव्या प्रेरणांनी भरलेला असो. आपल्याला उत्तम आरोग्य लाभो, दीर्घायुष्य लाभो, आपलं मार्गदर्शन आणि माणूसपण असंख्य हृदयांपर्यंत पोहोचत राहो. आपल्या विचारांची दिशा नव्या पिढ्यांना उजळवो, आपल्या शब्दांना, लेखणीला आणि कार्याला सदैव नवा आयाम लाभो. आपलं व्यक्तिमत्त्व हेच आमच्यासाठी एक आशीर्वाद आहे ते असंच तेजस्वी, निर्मळ आणि प्रेरणादायी राहो हीच मन:पूर्वक पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना...

डॉ. अमर आर. भुंगुर्डे,
