गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा
गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरुवे नमः
आषाढ महिना सुरू झाला की आठवण येते ती गुरुपौर्णिमेची. वेदव्यासांनी आपल्या संस्कृतीचा महाभारत हा महान ग्रंथ लिहिला. म्हणून व्यासांच्या कार्याची आठवण ठेवण्यासाठी आषाढ महिन्यातील व्यासपौर्णिमा ही गुरुपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. लहानपणी आई वडील आपले गुरु असतात .आई वडिलांच्या वागण्या बोलण्यातून आपण शिकत जातो, घडत जातो .उदाहरणार्थ साने गुरुजी असेच घडले. शाळेत शिक्षक आपले गुरु असतात तर वेगवेगळे कला कौशल्य शिकविणारे वेगवेगळे गुरु असतात उदाहरणार्थ संगीत गुरु, चित्रकला गुरु, नृत्य गुरु इत्यादी या सर्व गुरूंचे आपल्यावर अनंत उपकार असतात त्यांचे स्मरण करण्यासाठी, आपल्यात नम्रता येण्यासाठी, मोठ्यांविषयी आदरभाव निर्माण होण्यासाठी आपण गुरुपौर्णिमा साजरी करतो. गुरु हे दीपस्तंभाप्रमाणे असतात आपल्याला योग्य ती दिशा मार्ग दाखविण्याचे कार्य करतात, सर्वच बाबतीत मार्गदर्शन करतात व आपली जीवननौका योग्य किनाऱ्यावर लावतात म्हणून जीवनात गुरूंचे खूप महत्त्व आहे.
मातृदेवो भव पितृ देवो भव आचार्य देवो भव असे आपले धार्मिक बोधवचन आहे म्हणून गुरु हे देवासारखे असतात ते आपल्या जीवनातील अज्ञान, अंधकार दूर करतात. कुंभाराप्रमाणे आपल्या जीवनाला आकार देतात, संस्कार करतात, सुसंस्कृत बनवितात. फिरत्या चाकावरती देती मातीला आकार विठ्ठला तू वेडा कुंभार आपल्या जीवनात गुरुचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे कारण गुरु आपल्यात आत्मविश्वास, जिज्ञासा, नम्रता, सेवाभाव निर्माण करतात. चौकसता, जागरूकता, तेजस्विता, उत्साह, चैतन्य, निर्माण करतात. ज्ञान+ ध्यान + एकाग्रता निर्माण करतात. प्रेरणा वादी, ध्येयवादी, कर्तव्यवादी बनवितात म्हणून आपले जीवन चांगले घडते.
गुरु जसे आपल्याला चांगल्या गोष्टी सांगतात, प्रोत्साहन देतात, त्याचबरोबर चांगले वाईट कोणते हे ही सांगतात, वाईट गोष्टींपासून परावृत्त करतात, सुविचारी, सदाचारी, चारित्र्यसंपन्न बनवितात म्हणून आपल्या जीवनात गुरूंना अनन्यसाधारण महत्त्व आहे. तसेच गुरु आपल्यात you can do म्हणजे तुम्ही सर्व काही करू शकतात, चांगले बनू शकतात असा आत्मविश्वास निर्माण करतात. आत्मीयता, आपुलकी निर्माण करतात म्हणजेच गुरु बौद्धिक विकासाबरोबरच मानसिक, सामाजिक, विकास म्हणजेच सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न करतात.
ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ती
द्वंद्वातीतम गगनसदृश्यम तत्वमत्सादी लक्षणं
मानवी जीवन विकासात जे मदत करतात ते कोणीही आपले गुरु असू शकतात उदाहरणार्थ दत्तगुरूंनी 21 गुरु मानले होते. शिवाजी महाराजांनीही आईला आपले गुरु मानले होते तसेच तर रामाचे गुरु वशिष्ठ आणि विश्वामित्र, श्रीकृष्णाचे गुरु सांदीपणी ऋषी, ज्ञानेश्वरांचे गुरु निवृत्तीनाथ, विवेकानंदांचे गुरु स्वामी रामकृष्ण परमहंस, शिवाजी महाराजांचे आध्यात्मिक गुरु तुकाराम, एकनाथांचे गुरु जनार्धन स्वामी, चंद्रगुप्त मौर्यचे गुरु आर्य चाणक्य इत्यादी. त्यामुळे हे सर्व महापुरुष महापुरुष बनू शकले. परंतु एकदा एका विचित्र शिष्याने गुरूंची परीक्षा घ्यायचे ठरविले त्यांनी एक फुलपाखरू आपल्या दोन्ही हातांमध्ये धरले व गुरूंना विचारले की हे जिवंत आहे की मेलेले आहे गुरूंना वाटले की आपण जिवंत आहे असे म्हटले तर तो तो त्या फुलपाखराला मारू शकतो म्हणून गुरु म्हणाले की ते तुझ्या हातामध्ये आहे म्हणजेच गुरु अशाप्रकारे अहंकार दूर करण्याचे काम करतात आणि गुरूंनी दिलेली विद्या किंवा ज्ञान किती घ्यायची आणि कुठे वापर करायचा हे शिष्यावर अवलंबून असते.
गुरुंच्या ठिकाणी बुद्धीप्रामाण्य, स्थिरत्व, अचलत्व, दूरदर्शिता, चारित्र्य असते उदाहरणार्थ ऋषीमुनींना- व्यासांना पुढे काय होणार कलियुगात काय होणार हे अगोदरच माहीत होते म्हणून जनतेला मार्गदर्शन करण्यासाठी त्यांनी रामायण महाभारतासारखे श्रेष्ठ ग्रंथ लिहिले व आजही संपूर्ण जगाला ते मार्गदर्शन करतात. गुरु हे निर्लेप असतात, समाजातील दुर्गुण आपल्यात येऊ देत नाहीत, दूषित गोष्टींचा परिणाम होऊ देत नाहीत, म्हणून म्हणतात की गुरु हे चिकूच्या बी प्रमाणे असतात कारण चिकूच्या बी ला गर लागत नाही तसेच सद्गुरु हे अंधश्रद्धा नष्ट करून डोळस बनवितात परंतु हल्लीचे काही गुरु मात्र याला अपवाद आहेत.
जीवनात गुरूंचे महत्त्व खूप असते परंतु असेल हरी तर देईल खाटल्यावरी असे म्हटले तर विकास होत नाही तर गुरूंचे विचार आमलात आणण्यासाठी स्वतःमध्ये जिद्द, महत्त्वाकांक्षा, चिकाटी निर्माण करावी लागते, कष्ट प्रयत्न, साधना यांची जोड द्यावी लागते व सतत कार्यरत राहून त्यात सातत्य ठेवावे लागते, चांगले अनुभव घेऊन कौशल्य संपादन करावे लागते, तेव्हाच मानवाचा विकास होऊ शकतो व मानव जन्माचे सार्थक होते.
पूर्वी शिकण्यासाठी गुरुकुलमध्ये जावे लागायचे, ऋषींच्या सानिध्यात राहावे लागायचे, त्यानंतर शाळा महाविद्यालय यामध्ये जावे लागते परंतु आता गुगलवर आपल्याला एका क्षणात माहिती मिळते तसेच युट्युब वगैरे अनेक गोष्टींमुळे ही आपल्याला माहिती मिळते म्हणजेच आता तांत्रिक युगामध्ये गुरूंचे स्वरुपही बदलले आहे. गुरूंच्या ऋणाशी कृतज्ञ राहावे. चरणी त्यांच्या नतमस्तक व्हावे.
म्हणून गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला सर्वांना म्हणजे विद्यार्थी सगळ्यांना गुरूंची आवर्जून आठवण होते. गुरूंना विचारल्यास आपल्याला काय गुरुदक्षिणा हवी तर ते म्हणतात की चांगले बनावे, यशस्वी व्हावे, मोठे व्हावे आणि ज्ञानदानाचे काम सतत करावे हीच आमची गुरुदक्षिणा. सचिन तेंडुलकर सारखे यशस्वी होऊन गुरुंचे नाव निघावे ही ही एक प्रकारे गुरुदक्षिणाच असते. दिव्यत्वाची जेथे प्रचिती म्हणून तेथे कर माझे जुळती.

सौ. मंगला राजपूत, धुळे
