गुपित जीवनाचे

जया विनायक घुगे - मुंडे लिखित मराठी कविता गुपित जीवनाचे

गुपित जीवनाचे

आयुष्याच्या पुस्तकात
काय, काय तरी दडलंय,
जीवनाचे गुपितच जणू
क्षणाक्षणात लपलय...

सुख - दुःखाची भाषा
आठवणींचे शब्द,
जीवनाच्या पुस्तकात
लिहिलंय सारं प्रारब्ध...

मनातील भावना जणू
अधोरेखित केल्या,
जीवनाच्या पुस्तकात
व्यक्तिरेखा साकारल्या...

प्रसंगरुप बदलणारी
माणस आहेत त्यात,
स्वभाव ही भिन्नभिन्न
काही काल्पनिक काही सत्यात

संपलेले चॅप्टर आठवणी झाले
एकांत क्षणी ओघळणारे,
काही प्रश्न निरुत्तर राहिलेले
क्षणाक्षणाला छळणारे...

काही कविता आजही गुणगुणते
काही चाली हुकलेल्या,
आयुष्याच्या पुस्तकात
पुन्हा, पुन्हा चाळलेल्या ...
 
रंगी बेरंगी कव्हर घालून
सजवण्याचा प्रयत्न असतो,
आयुष्याच्या पुस्तकात
शेवटी सारांश मृत्यू असतो...
सारांश मृत्यू असतो...

Jaya Vinayak Ghuge
जया विनायक घुगे - मुंडे
परळी वैजनाथ, बीड