लहानांपासून मोठ्यांपर्यंत
सर्व होतात नटण्यात मग्न
सर्वांनाच आवडते हो
मनापासून लग्न
वराती येतात लग्नात
मिरवण्यासाठी, खाण्यासाठी
भांडण लावण्यासाठी
अन् कुरापती काढण्यासाठी
या मंगल सोहळ्यात
दोनच व्यक्ती येतात
एकमेकांसाठी
नवरा येतो नवरीसाठी
नवरी येते नवऱ्यासाठी
बिऱ्हाड असते अक्षता टाकून
आशीर्वाद देण्यासाठी
सदैव त्यांच्यापाठी
मौजमजा, आनंद येतो खूप
लग्नाचे असते वेगळेच रूप
नवरीकडील मंडळी असतात चूप
नवऱ्या मुलाकडचे मागतात सोने खूप
असतात प्रत्येकाच्या चालीरिती
अनंत अन् वेगवेगळ्या
सकलांच्या अपेक्षा अन्
मागण्या असतात निरनिराळ्या
अपेक्षांचे ओझे वाहता वाहता
नवरी कडीलमंडळीची होते
दमछाक सूचनेनुसार पळता पळता
वर पक्षातील मंडळी असतात ऐटीत
हुंडा, दागिने कोंबून ठेवतात पेटीत
लग्नात कपडे घालायला नवे-नवे
वातावरण वाटते सर्वांना हवे-हवे
बायांचा मोर्चा वळतो पार्लरकडे
माणसांचा मोर्चा वळतो सलूनकडे
सर्व दिसतात टापटीप आणि चक-पक
मेकअप सर्व करतात भक-भक
प्रत्येकाला असते हौस
काही ना काही करण्याची
वाट पाहतात सर्व फक्त
लग्न संधी मिळण्याची
काहींची होते सारी हौस पूर्ण
काहींची राहते हौस अपूर्ण
स्वप्न पाहतात सर्वजण
स्पप्न होतात फक्त
काहीजणांचीच पूर्ण
लग्न पहावे करून
थाटामाटत एकदा
खर्च मात्र व्हावा
सासरवाडीतून समदा
लग्नात येते मजा
लय लय भारी भारी
चेहरे पाहायला मिळतात
चित्रविचित्र न्यारी न्यारी
लग्नात रुसण्याचे प्रकार
होतात जास्तीत जास्त
रुसवा काढण्यात होते
वधू घर पूर्ण व्यस्त
वधूकडील मंडळी होतात
पाहुणचार करण्यात मग्न
वराकडील मंडळी मात्र
करतात स्वप्न त्यांचे भग्न
काढतात ते सतत
प्रत्येक कार्यात चुका
वधूकडील मंडळी
मात्र ऐकतात होवून मुका
वधूकडील मंडळी
करतात मागण्या पूर्ण आदराने
वराकडील मंडळी वाढवतात
मागण्या पूर्ण हुशारीने
लॉकेट, अंगठी, गाडी, नगदी रक्कम
त्या मागण्याची पूर्तता करता करता
वाढते कर्जाची भरपूर मोठी रक्कम
चालीरिती नावाखाली जगतात तत्सम
वराकडील मंडळी असतात
आनंदात आणि सुखात
कारण नवीन एक सदस्य
वाढणार असतो घरात
वधूकडील मंडळी असतात
वियोगाच्या दुःखात
कारण काळजाचा तुकडा
काढून देतात लोकांच्या हातात
बालपणापासूनच रम्य आठवणी
आठवतात आई बाबांना
नयनी येते ओसंडून पाणी
पाठवणीच्या क्षणाला सर्वांना
असा कसा क्षण वधूच्या जीवनी येतो
एकीकडे जन्मदात्या आई बाबांचा
वियोग दुःख अती होऊन जाते
त्या दुःखाने होते गुंग वधूमती
दुसरीकडे असते
नव्या नात्याची ओढ
पण माहीत नसते कशी
असेल त्याची खोड
लग्नानंतरचे प्रारब्ध कसे
निघेल माहीत नसते कुणालाच
काय काय होतो आनंद वेदना
माहीत असते फक्त वधू मनाला
लग्नानंतरचे चित्र असते
कोणाकोणाचे खूप विचित्र
दिसते डोळ्यांना सर्वांना
समोरचे विसंगत सचित्र
लग्नानंतरच्या मागण्यानी
होतात वधूचे खूप हाल
सर्वांचाच मार खावून
सुजतात तिचे गोरे गाल
माहेरच्या आठवणीने
डोळे तिचे पाणवतात
जीवाभावाच्या गोड गोड
आठवणी मग तिला आठवतात
कुणाकुणाच्या जीवनात
लग्नानंतर येते खूप सुख
सासरीही जीव लावणारी
माणसे मिळतात खूप खूप
सासू बनते आई
सासरा बनतो बाबा
नणंद बनते बहीण
दीर घेतो भावाची जागा
कोणा कोणाच्या जीवनात
सासू, सासरे, नणंद , दिर
छळून देतात मानसिक त्रास
मग मात्र वधूच्या गळ्यात
बसतो त्रासाचा फास
सांगत नाही ती कोणाला
कुढते ती मनातल्या मनात
तिला वाटते सांगून काय होणार
घरातील गोष्टी पसरतील लोकांत
हसे होवून बसेल जनात हेच म्हणते ती मनात
लग्नानंतर होतो कायापालट सर्वांचाच
कोणाला मिळतो वर्षाव प्रेमाचा
तर कोणाच्या गळ्यात पडतो
रोजच मरणयातना देणारा फास...
सौ. जयश्री अर्जुन मुंडे,
अंबाजोगाई
