आपल्या समाजातील सर्वात मोठा संस्कार तो म्हणजे विवाहसंस्था. पण सध्या या संस्काराला काळाची पाश्र्चात्य संस्कृतीची दृष्ट नजर लागली आहे. पाश्चात्यांचा पाठलाग करता करता आम्ही आमची मौल्यवान संस्कृतीचं जणू हरवत चाललोय. आता तर असं वाटायला लागलेय की खरंच बऱ्या होत्या त्या जुन्याच चालीरीती ज्यात विवाह जपली जायची. बरा होता तो धर्माचा पगडा ज्याच्या नावाखाली मनात एक वेगळीच भिती असायची. कळत नसलेल्या बालवयात लग्न होत असे तरी देखील ते हा जन्म तर सोडाच पुढची सात जन्म टिकवायचे. आमच्या लहानपणी आम्ही पाश्र्चात्य देशातील विवाहसंस्थेंविषयी काही गोष्टी ऐकल्या होत्या. त्या म्हणजे तीथे घटस्फोट अगदीच सहज देतात-घेतात. घटस्फोट घेता देता कसलीही खंत मनात नाही. जराही दुःख नाही मनात आनंद मुक्त होण्यासाठीचा.
याउलट आपल्याकडे लग्न म्हणजे जन्मोजन्मीची साथ असायची पण आता असं प्रकर्शाने जाणवतं की ते फक्त एक कधीही सत्य न होणारे स्वप्न आहे की काय?
लग्न करतांनाच्या मागण्या...
१) मुलाची बाजू बघूया...
लग्नासाठी मुलगी कशी हवी तर त्याचे उत्तर दहा वर्षे पुर्वी लग्न करतांना गोरीपान, स्वयंपाकात सुगरण, साध्या स्वभावाची, लांब केसाची, उंच सडपातळ बाध्याची, उच्च शिकलेली, घरकाम करणारी, सुसंस्कारित मुली पाहिल्या जायच्या. आता या विचारसरणीत बदल होत आहे. म्हणजेच केस लांब नसले तरी चालेल, गोरी नसली तरी चालेल पण नाकी डोळी चरचरीत असावी. लग्नासाठी मुलींमध्ये असणारे सगळे गुण रेडीमेड पाहिजे. सगळं माहेरीच शिकून आलेली, सासरी फक्त सेवा देणारी मुलगी पाहिजे असे. बरोबरच आहे तेव्हा मुलींची संख्या ही जास्तच होती आणि हा सिद्धांतच आहे की पुरवठा जास्त आणि मागणी कमी असेल तर वस्तूची किंमत घसरते आणि हा सिद्धांत स्त्रीयांच्या बाबतीत खरा ठरला... असचं रेडीमेडचा विचार जर ज्योतीबांनी केला असता तर कदाचित लग्नाआधी अशिक्षित अडाणी असलेली सावित्री लग्नानंतर सुशिक्षित झालीच नसती.
काही पुरुषांना तर बायको नकोय तर वेगवेगळ्या कार्यक्रमात आपली शोभा वाढवायला शोभीवंत नटी हवीय. मग घरात किती ही अंधार असू दे... फक्त कार्यक्रमात उजेड पडला पाहिजे. घरात एकमेकांकडे पाठ असलेले नवरा-बायको कार्यक्रमात एकमेकांच्या तोंडाला तोंड लावून सेल्फी काढतांना दिसतात. मग क्षणाचाही विलंब न करता लगेच फोटो what's up status ला झळकतो. जगापुढे फक्त प्रदर्शन मांडायचं आहे बाकी टिकवायचे किती ते पुढे पाहिल्या जाईल... आजकाल तर नातं what's up status वरूनच कळतं?
२) आता मुलीची बाजू बघूया...
लग्नासाठी मुलगा कसा असावा तर तो उच्च शिकलेला, उच्च विचारांचा असो अथवा नसो, मात्र उच्च मिळकतीचा असावा म्हणजेच भलामोठा पगारीचा असावा. मग तिकडे त्याने दारूचे व्यसन केले तरी चालेल. मन जपणारा, मन समजून घेणारा असावा. ह्या गोष्टी आता कालबाह्य होत चालल्या आहेत. आपले मन आपणच कधी समजून घेऊ शकत नाही. तर आपण दुसऱ्याकडून ते समजून घेण्याची अपेक्षा करणे चुकीचे आहे. भावना समजून घेणारा असावा. आजकालची पीढी ही इंग्रजी माध्यमातून शिकलेली इंग्लिश बोलणारी आहे. इंग्लिश भाषेला भावना नाहीत. ती भावना विरहीत भाषा आहे. त्यामुळे आपणही भावना शुन्य होत चाललो आहोत. मग आपण दुसऱ्याकडून भावना समजून घेण्याची अपेक्षा करणे चुकीचे आहे. दूर-दूर फिरायला नेणारा, बिनधास्त जगू देणारा, घरकामात मदत करणारा, दर आठवड्याला माहेरी नेणारा असावा... या सर्व परिस्थितीला कुठेतरी आपण, सोशल मिडीया, आताचे येणारे चित्रपट देखील जवाबदार आहेत. बाॅलीवूडमधील बऱ्याच चित्रपटातून लिंव्हिग रिलेशनशिपसारख्या मुद्द्याचे समर्थन दाखवल्या गेले. तेव्हा ते चित्रपटात पाहतांना देखील मनाला पटले नव्हते. पण ते फक्त चित्रपटापुरते मर्यादित आहे. असा विचार मनात होता. पण आता हेच चित्रपट सत्यात उतरत चालेल आहेत. पुणे मुंबईसारख्या शहरात लिंव्हिग रिलेशनशिपमध्ये राहणे अगदींच एक सहज बाब आहे. असं म्हणतात की चित्रपट, नाटके हे समाजाचं एक प्रातिनिधिक स्वरूपाचे रूप असते. आज जे समाजात घडतं ते उद्या चित्रपटात दाखवतात. आज जे चित्रपटात दाखवतात ते उद्या समाजात घडतं. divorce, break up, living relationship यासारख्या चित्रपटांतील गोष्टी समाजाला घातक आहेत.
नवरा-बायकोचा वाद झाला आणि तो टोकाला गेला तर आपण अवती भवती निरिक्षण करतो. एकल पालक कसे जीवन जगत आहेत याचा शोध घेतला जातो. ते एकटे जीवन जगू शकतात तर आपण का नाही? असा प्रश्न उपस्थित करून विभक्त पालकांना आपण आदर्श मानण्याचा प्रयत्न करतो उदा.. अमृता अरोरा-अरबाज खान. १८ वर्षे लग्न टिकवल्यानंतर... ॠतिक रोशन-सुझेन चौदा वर्षे लग्न टिकवल्यानंतर... अमिर खान-किरण राव पंधरा वर्षे लग्न टिकवल्यानंतर... सैफअली खान-अमृता सिंग चौदा वर्षे लग्न टिकवल्यानंतर... आणि आता धनुष्य-एश्वर्या (रजनीकांतची मुलगी) पाच, दहा, पंधरा, वीस वर्षे संसार केल्यानंतर मोडायचा नसतो. पण ते घडतंय समाजात एक सुजाण नागरिक एक सुखी कुटुंब करू शकतो. असे अनेक समाधानी, सुखी कुटुंब मिळून एक निकोप समाज निर्माण होत असतो पण समाज बदलत चालला आहे. कारण इथला नागरिक बदलत आहे. आपल्या अवतीभवती असे आदर्श समोर असतील तर कसा समाज घडेल? एकटा व्यक्ती जीवन जगू शकतो त्यात काही वाद नाही. पण विवाह करून ते निभावून नेण्यात, त्यात अडथळे दूर करण्यात, नात्यातील गुंता सोडवण्यात, कधी कधी जोडीदाराला विनाकारण छळण्यात, वाकवण्यात आपण स्वतः वाटण्यात, लेकरांचे संगोपन करण्यात जो आनंद मिळतो तो एकट्यात नाहीच.
वाद होतील, भांडणे होतील, कधी कधी तर चक्क मारामारी देखील होईल होऊ देत, शेवटी चार एक महिने वेगळे (माहेरी) राहण्याची देखील वेळ येईल येऊ देत. राग ओसरेपर्यंत पुढच्याला आपले महत्त्व पटेपर्यंत या गोष्टी चालायच्याच. त्याच्यावर विभक्त होणे हा पर्याय नाही. अपवादात्मक ठिकाणी ते योग्य असेलही पण फक्त पटत नाही एक म्हणून वेगळं... नको; जेव्हा दोन भिन्न स्वभावाचे व्यक्ती जवळ येतील भिन्न मताचे, तेव्हा वाद होतील, आपण आपल्या आई बाबा,भाऊ बहीण यासमवेत जरी आयुष्यभर रहायचे ठरवले तरी वाद हे होतीलच. म्हणून पटत नसेल तरी पटवून घ्यावेच लागेल.
सिंधुताई सपकाळ म्हणतात की, नवरा-बायको हे सायकलीच्या दोन चाकाप्रमाणे असतात पुढचे चाक नवरा त्याला नेतृत्व दिले आहे तर मागचे चाक बायको. पुढच्या चाकावर लक्ष ठेवण्याचे काम मागच्या चाकाने करावयाचे आहे. सायकलीला थांबण्यासाठी ब्रेक हा मागच्या चाकाच्या नियंत्रणात... सायकलची कॅरिअर म्हणजेच ओझेवाहायचे मागच्या चाकाने... स्टॅंड मागच्या चाकावर... कुठे थांबायचे त्यासाठी. ते मागच्या चाकाने ठरवायचे... कुलूप मागच्या चाकावर...
आपली संस्कृती ही एक आदर्श आहे. तीला जपलं पाहिजे. पर्यायाने विवाहसंस्थेला जपलं पाहिजे... याचे धडे आपण आपल्या कुटुंबातून दिले पाहिजे.

सौ. माधुरी गेडाम-दिवे
सहाय्यक शिक्षिका
जि. प. उच्च. प्राथ. शाळा,
शिंदोला, ता. वणी, जि. यवतमाळ
