नाव नसलेलं नातं मराठी कविता - Marathi Kavita

सौ. प्रिती सुरज भालेराव लिखित प्रेमाच्या नात्याचे वर्णन करणारी कविता नाव नसलेलं नातं ...

नाव नसलेलं नातं मराठी कविता - Marathi Kavita

अचानक माझ्या आयुष्यात
हक्काचे कुणीतरी आले
माझ्या मनातील सारं काही
सर्वकाही त्याला समजले

आपली माणसं देणार नाहीत
इतकं प्रेम कुणीतरी करतं
स्वतःच्या जिवापेक्षा जास्त
आपल्याला जपत असतं

आयुष्याची वाटचाल करताना
एक माणूस हक्काचं हवं असतं
एकट्यानेच आपल आयुष्य जगणं
वाटत तितकं कधीच सोप्प नसतं

आपलं जेव्हा कधी चुकत असतं
हक्काने त्याने आपल्यावर ओरडावं
दोघांमध्ये कितीही भांडणं झाली ना
मनापासून एकमेकांना समजून घ्यावं

एकाच्या पायाला ठेच लागली 
दुसऱ्याच्या डोळ्यात पाणी यावं
एकमेकांच्या आनंदाचं खरं कारण
न सांगता एकमेकांनी ओळखावं

ठाऊक नाही मजला काही
देव म्हणजे काय असतो
कित्येकवेळा आपल्याला
माणसाच्या रूपात भेटतो

हक्काचं हे जे नातं असतं
कधीच त्याला नाव नसतं
समोरच्या व्यक्तीच्या मनात
स्पष्टपणे ते दिसत असतं

मला वाटतं प्रत्येकाच्या आयुष्यात
एक छान व्यक्तिमत्त्व नक्की असावं
नाव नसताना देखील त्या नात्याने
एकमेकांवर जीवापाड प्रेम करावं

सौ. प्रिती सुरज भालेराव, पुणे