या दुःखाला जाण नसावी
फक्त असावे डोळे
घळघळणाऱ्या प्राजक्तासम
मुके असावे सोहळे
पायांना ही भेद नसावा
फक्त असाव्या वाटा
सागरातल्या श्रद्धेसमान
स्तब्ध रहाव्या लाटा
शब्दांना पण बोल नसावे
फक्त असावी प्रीती
जगण्यामधल्या प्रश्नांसाठी
स्पर्श उरावे हाती
या काळाला पाठ नसावी
फक्त असावी खूण
थरथरलेल्या हृदयामधुनी
नित्य वहावी धून
नात्यांना ही गाव नसावे
फक्त असावी ओढ
या तिमिरातुनी तेजाकडे
स्वप्नांची साखळजोड.
सारिका बद्दे, छ. संभाजीनगर