आला श्रावण... मराठी कविता

सौ. शितल बाविस्कर राणेराजपूत लिखित मराठी कविता आला श्रावण...

आला श्रावण... मराठी कविता

ऊन पावसाचा सोहळा
खेळण्या आला श्रावण
साऱ्यांच्या जीवनी लाभले
सुंदर आनंदाचे क्षण ||१||

थेंब टपोरे पावसाचे
नाचतो मयूर रानात
सृष्टीची किमया न्यारी 
चैतन्य येई पानांफुलात ||२||

 हिरवळ दाटली चहुकडे
 होई सुख-समृद्धीचा वर्षाव
 मनमोहक दृश्य सृष्टीचे
 मन घेई निसर्गाकडे धाव ||३|

 रिमझिम पाऊस धारा
 स्पर्श सोनेरी थेंबांचा
 श्रावण असे मनभावन
 हर्ष आणि उल्हासाचा ||४||

श्रावणात पर्वणी खास
व्रतवैकल्ये नि सणांची 
भाव पावित्र्यतेचे मनात
नांदी सुख समाधानाची ||५||

सृष्टी नटली हिरव्या रंगी
गीत गाण्या प्रीत स्पर्शाचे
श्रावणात सारे मिळून
जतन करूया निसर्गाचे  ||६||

Shital Baviskar

सौ. शितल बाविस्कर राणेराजपूत,  जळगाव