घालमेल मराठी लेख - Marathi Article

बहीण भाऊ नात्याचं अतिउत्तम उदाहरण असणारे नीरज आणि लतिका अचानकपणे एकमेकांपासून दुरावल्या गेले होते. लहानपणापासून नीरज अतिशय हलाखीच्या परिस्थितीत जीवनाचा प्रवास करत होता.

घालमेल मराठी लेख - Marathi Article

तो रक्षाबंधनाचा दिवस होता. नीरज लतिकाच्या एका फोनची वाट पाहत बसलेला होता. निदान आज तरी माझ्या ताईचा फोन येईल अशी निरजला मनोमन आशा होती. काय झालं असावं बरं? याचा विचार करण्यातच संपूर्ण दिवस संपला. पण आज लतिकाचा फोन आला नाही. वर्षभर ज्या दिवसाची मनापासून नीरज वाट पाहायचा तो दिवस आला आणि निघूनही गेला, लतिकाला का  वाटले नसावे? आपण निरजला एक फोन करावा, किंवा त्याच्यासाठी एखादी राखी पाठवून द्यावी. 

बहीण भाऊ नात्याचं अतिउत्तम उदाहरण असणारे नीरज आणि लतिका अचानकपणे एकमेकांपासून दुरावल्या गेले होते. लहानपणापासून नीरज अतिशय हलाखीच्या परिस्थितीत जीवनाचा प्रवास करत होता. काबाड कष्ट करून एक साधं आयुष्य जगायचा. सगळ्यांच्या मनाचा अगदी बारकाईने विचार करायचा, समाजकार्य करणे निरजला खूप आवडायचे. कुणी आपल्याशी कसेही वागू द्या, पण आपण सगळ्यांशी नीट वागायचे असे नीरज नेहमी लतिकाला सांगायचा. आपल्या वागण्यामुळे सगळ्यांच्या मनामध्ये त्याने आपले एक वेगळच स्थान निर्माण केलं होते. 

लतिका ही एका सुशिक्षित घराण्यातील मुलगी. लहानपणापासून लतिकाला सर्व काही मिळत होतं. घरची परिस्थिती अगदी छान होती, सुंदर संसार होता. लतिकाला एक भाऊ आणि तीन बहिणी होत्या. अचानकपणे एका आजारामुळे तिच्या भावाचे दुःखद निधन झाले. त्यामुळे लतिकाला भावाची नेहमीच आठवण यायची, पण म्हणतात ना! सख्ख्या नात्यापेक्षा मानलेलं नातं देखील श्रेष्ठ असतं! निरजच्या रूपाने लतिकाला एक जीव लावणारा भावनिक स्वभावाचा भाऊ मिळाला. नीरज हा लतिकाचा केवळ "मानलेला भाऊ." परंतु तो लतिकाला त्याच्या सख्ख्या बहिणीपेक्षा जास्त जीव लावत होता. त्याच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट तो सर्वप्रथम तिला सांगायचा. लतिकाचा सुद्धा निरजवर पराकोटीचा विश्वास होता. तीदेखील निरजला सर्व गोष्टी अगदी मनमोकळेपणाने सांगायची. 

निरजच्या आयुष्यात लतिकासोबतच अजून एक जवळची व्यक्ती आली. ती म्हणजे सानिका. सानिका ही मनाने अतिशय हळवी आणि गोड मुलगी होती. एका कार्यक्रमामध्ये निरज आणि सानिकाची भेट झाली. तेव्हा सानिकाने निरजचा फोन नंबर घेतला. तेव्हापासून निरज आणि सानिका यांचे मेसेज, फोनवर गप्पा असे सत्र सुरू झाले. सानिका ही एकत्र कुटुंबात राहणारी एक साधी आध्यात्मिक स्वभावाची गृहिणी होती. अर्थातच एकत्र कुटुंबपद्धतीमुळे सानिकाच्या घरी कधी-कधी छोटे-मोठे वाद व्हायचे. तेव्हा सानिका मनातून खूप दुखी असायची आणि एक हक्काचा मित्र म्हणून निरजला आपल्या मनातील व्यथा सांगायची. का? कोणास ठाऊक पण लतिका जेव्हा-जेव्हा निरजसोबत बोलायची तेव्हा तिला सगळं दुःख विसरल्याची जाणीव व्हायची. हळूहळू निरज आणि सानिका यांचं एक खूप छान नातं निर्माण झालं. त्याचप्रमाणे निरजदेखील सानिकाला त्याच्या आयुष्यातील सर्व गोष्टी सांगायचा. अर्थात लतिकाताईबद्दल सानिकाला सर्व काही माहित होतं. लतिकाबद्दल ऐकल्यावर सानिकाला तिचा खूप हेवा वाटायचा, खरचं! लतिकाताई किती सुंदर व्यक्तिमत्त्व आहे. निरजला किती जीव लावते, असं सानिकाला वाटायचं. कधी-कधी सानिका निरजला खूप चिडवायची, लाडक्या बहिणीचा लाडका-दोडका भाऊ आहेस बाबा तू! असं ऐकलं की, निरजला खूप हसू यायचं. अर्थातच निरजने हसावं, म्हणून सानिका त्याला मिश्किलपणे बोलायची.

कधी-कधी आपण न केलेल्या गोष्टीची शिक्षा आपल्याला मिळते आणि आपण स्वतःलाच दोष देत बसतो. "गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मी" असा विचार नीरज रात्रभर करत होता. सख्ख्या बहिणीपेक्षा खूप जीव लावलेल्या बहिणीने नकळतपणे निरजच्या मनावर एवढा मोठा खोलवर घाव करुन कधीच न भरून येणारी जखम दिली. असा काय गुन्हा झाला असेल माझ्याकडून हाच विचार निरज करत होता, अचानकपणे निरजला खूप ताप भरून आला आणि टेंशनमुळे तो अत्यवस्थ झाला.

साखर ही गोड असते, पण ती प्रमाणात असावी लागते. साखरेचे प्रमाण जास्त झाले तर त्याचा अतिरेक होऊन 'मधुमेह'सारखा आजार उध्दभवतो. तसेच प्रेमाचेदेखील असते. आपण एखाद्या व्यक्तीवर खूप प्रेम करतो, खूप जीव लावतो परंतु त्या व्यक्तीने आपली किंमत शून्य करावी. असच काहीतरी निरजसोबत घडले होते. तो दिवस निरजसाठी अतिशय दुःखाचा ठरला. निरजची अशी काय वेगळी अपेक्षा होती हो? फक्त रक्षाबंधन आणि भाऊबीज या दिवशी लतिकाने त्याला एखादा फोन अथवा मेसेज करून बोलावं. दिवसभर लतिकाच्या फक्त एका फोनची वाट निरजने बघितली. प्रेम हे प्रेमच असतं, मग ते बहीण भावाचे का असेना. आत्तापर्यंत घडलेल्या सर्व गोष्टीचा विचार करत दिवसभर निरज रडत होता. माझ्याच बाबतीत असं का घडावं? मी एवढा वाईट आहे का? असं निरजला वाटत होतं, अशा वेळी दिवसभर मनात साठलेलं दुःख निरजने सानिकाला सांगितलं. घडलेला सर्व प्रकार ऐकून सानिकाला पण अतिशय वाईट वाटलं. मनातून पूर्णपणे तुटलेल्या निरजला सानिकाचा खूप मोठा आधार होता. त्या दिवशी निरजला इतका त्रास झाला की रात्री त्याला दवाखान्यात ऍडमिट करावं लागलं. नीरज सानिकाच्या मेसेजला उत्तर देत नव्हता, तिच्याशी बोलतही नव्हता.

अचानकपणे सानिकाच्या मोबाईलची बेल वाजली आणि पाहते तर काय? सानिकाला निरजचा फोन आलेला होता. आणि थरथरत्या आवाजात नीरज तिच्याशी बोलत होता. निरजचा आवाज ऐकून सानिकाच्या लक्षात आले, नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम झालेला असावा. क्षणाचाही विलंब न करता सानिकाने निरजला विचारले. तेव्हा केवळ नाईलाज म्हणून घडलेला सर्व प्रसंग निरजने सानिकाला सांगितला त्यावेळी सानिकाच्या पायाखालची जमीन सरकली. बहीण भावाच इतकं सुंदर नातं आता राहिलेलं नाही. हा विचार सानिकाला सुखाने बसू देत नव्हता. 

स्वप्नातदेखील कुणाचा वाईट विचार न करणारा निरज आज लतिकामुळे दवाखान्यात ऍडमिट आहे. ही कल्पनाच मुळात सानिकाला सहन झाली नाही. निरजसोबत फोनवर बोलताना सानिकाचे हात पाय गळून गेले आणि ताबडतोब सानिका आहे तशाच परिस्थितीत निरजला भेटण्यासाठी दवाखान्यात गेली. निरजला सलाईन व ऑक्सीजन  लावलेले होते. त्यामुळे त्याला गुंगी लागली होती. सानिकाची चाहूल लागताच काही वेळात निरजने डोळे उघडले, तेव्हा त्याच्यासमोर सानिका उभी होती. तिचे डोळे भरून आलेले होते. सानिकाला पाहिल्यानंतर निरजचे देखील डोळे भरून आले. आणि निरज रडू लागला. निरजच्या डोळ्यातील एक-एक अश्रू त्याच्या मनात चाललेली घालमेल सांगत होता. अन् सानिका ती घालमेल ऐकत होती. सानिकाने निरजला खूप मोठा मानसिक आधार दिला. तू कशाला काळजी करतोस, मी कायम तुझ्यासोबत आहे! अगदी माझ्या आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत. हे वाक्य ऐकून निरजला मनापासून आधार वाटला. आणि तोंडाला लावलेला ऑक्सीजन बाजूला करत दोघंही एकमेकांच्या गळ्यात पडून दायमोकळून रडू लागले. 

लतिकाच्या वागण्याचा एवढा त्रास होईल. असे निरजलादेखील कधीच वाटले नव्हते. सानिकाने त्याला खूप समजून सांगितले, आणि "तू पण कधीतरी थोडासा कठोर वागत जा" असा सल्लादेखील दिला. अरे काळ फार वाईट आलाय बाबा! इथे कुणीच कुणाचं नाही. तू का बरं त्या लतिकाताईंचा विचार करून स्वतःला एवढा त्रास करून घेतलास? जीचा तू रात्रंदिवस विचार केला जिचे सुख दुःख वाटून घेऊन जीला तू आधार दिला तिच लतिकाताई आजच्या रक्षाबंधनच्या दिवशी तुला विसरली. तू काय जगावेगळी अपेक्षा केलीस का? फक्त एक फोन करण्याची सुद्धा गरज तुझ्या ताईला वाटली नाही. आज ही जी तुझी अवस्था झाली आहे. ती लतिका ताईमुळेच. अशा कठोर शब्दात सानिका बोलली. अर्थातच निरजला ते मान्य नव्हते. इतकं सगळं होऊन सुद्धा नीरज लतिकाचाच विचार करत होता, कदाचित मी भाऊ म्हणून कुठेतरी कमी पडलो असेल, हाच विचार नीरज करत होता. तेव्हा सानिकाने निरजला अगदी कठोर शब्दात समजून सांगितले आणि त्याची कानउघडणी देखील केली. आपण एखाद्यावर जीवापाड प्रेम करतो, जीव लावतो सख्या नात्यापेक्षा श्रेष्ठ मानतो, आणि त्याच नात्यामुळे कधी-कधी आपल्याला खूप त्रास सहन करावा लागतो, ही गोष्ट सानिकाने निरजच्या लक्षात आणून दिली. 

आजही नीरज लतिकाताईच्या फक्त एका फोनची वाट बघतोय. कधीतरी माझ्या ताईचा फोन येईल, आणि मी मन भरून तिच्याशी बोलेन, या खोट्या भ्रमात तो जगतोय. एक बहिण म्हणून नाही, तर एक माणूस म्हणून का होईना लतिकाताईने निरजला एक कॉल करायला हवा होता. असे निरजला मनापासून वाटते. एवढी माणुसकी सोडून कुणी कसं काय वागू शकतं? याचा विचार आजही निरजला शांतपणे झोपू देत नाही. शेवटी इतकचं, माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे का वागू नये. परेश्वराने सर्वात सुंदर वस्तू बनवली, ती म्हणजे माणूस. मग माणूसच माणसाशी असं का वागतो? असा प्रश्न मला देखील स्वस्थ बसू देत नाही. अशी घटना घडली की, मला एका कवी बाबा चन्ने यांच्या पुढील ओळी नेहमीच आठवतात. त्या म्हणजे...

 फार भीती वाटते आता 
 'इथे' असणाऱ्या लोकांची 
 केव्हा असत्याची कुऱ्हाड 
 सत्याच्या मानेवर पडेल
 शाश्वती नाही त्याची 

सद्यपरिस्थितीतील एकुण घटना पाहता, कुठेतरी माणुसकी लोप पावत चाललीय असेच म्हणावे लागेल.

 

सौ. प्रिती भालेराव, पुणे