भारतीय संस्कृती ही विविधतेने नटलेली आहे. आपल्या देशात विविध जाती, धर्माचे लोक एकजुटीने, सहकार्याच्या भावनेने राहतात. एकजुटीच्या कारणामागे मुख्य कारण सण-उत्सव हे देखील आहे. दिवाळी, दसरा, गणेशोत्सव, पोळा, होळी इत्यादी सण आपण थाटामाटात आनंदाने एकत्र येऊन साजरे करतो. प्रत्येक सण साजरे करण्यामागे नैसर्गिक कारण आहे. निसर्गाच्या होणाऱ्या बदलानुसार व रूढी परंपरेनुसार सण साजरे करणे ठरलेले आहे. जसे की, होळी सण जर कडाक्याच्या हिवाळ्यात आला तर आपण पाण्याच्या रंगाची होळी खेळू शकलो नसतो. थंडीने गारठलेली आपले अंग थंड पाण्याचा स्पर्श सहन करू शकले नसते. म्हणून हा सण उन्हाळ्यात साजरा होतो. यामागे दुसरेही कारण आहे. पण आपण भारतीय प्रत्येक सण-उत्सव थाटामाटात, आनंदात, हर्षोउल्हासाने, सहकार्याच्या भावनांने, एकजुटीने साजरा करतो. आणि सणाचा विषय निघाला की बायकांचा सर्वात आवडता सण असतो "मकर संक्रांत" या सणाला सौभाग्याचा सण देखील म्हटलं जातं.
संपूर्ण भारतभर हा सण वेगवेगळ्या पद्धतीने व वेगवेगळ्या नावाने साजरा केला जातो. जरी पद्धत वेगळी असली तरी समोरच्या व्यक्तीच्या मनातील कटूपणा दूर करणे व सर्वांमध्ये ऐक्य निर्माण करणे हे त्यामागचे मुख्य कारण आहे. मकरसंक्रांत हा भारतातील पौष महिन्यात येणारा शेतीशी निगडित असलेला सण आहे. आपली भारतीय संस्कृती ही कृषिप्रधान आहे. शेती करणे हा आपला मुख्य व्यवसाय आहे. पावसाळा, उन्हाळा व हिवाळा या ऋतूनुसार आपण शेतातून पीक पिकवत असतो. आपली नाळ आपल्या काळ्या मातीशी जुळलेली आहे. शेतकरी बांधव घाम गाळून शेतीतून हिरवं सोन पिकवतात. या दिवसात शेतीमध्ये येणारे धान्य हे हरभरे, ऊस, बोरे गव्हाच्या ओंब्या इत्यादी असतात. आपल्या संस्कृतीमध्ये शेतीतून निघणारे धान्य किंवा सण उत्सवाच्या दरम्यान जे काही आपण घरात बनवतो, शेतीतून पिकवतो ते सर्वप्रथम देवाला अर्पण करण्याची प्रथा आहे. मकरसंक्रांत हा सण तीन दिवस साजरा केला जातो. मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी साजरी केली जाते दुसऱ्या दिवशी मकर संक्रांत आणि तिसऱ्या दिवशी किंक्रांत म्हणजे कर साजरा करण्याची प्रथा आहे. पण ही आपली भारतीय संस्कृती परंपरा आपण आता विसरत चाललो आहोत पूर्वी हा सण तीन दिवस साजरा व्हायचा आता आपण फक्त एकच दिवस मकर संक्रांत हा सण साजरा करतो. भोगीला मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी स्त्रियांनी आणि घरच्या सर्व मंडळीने लवकर उठून अभ्यंगस्नान करण्याची प्रथा आहे. अभ्यंगस्नान केल्याने शरीर बळकट निरोगी व आरोग्यदायी असते. आरोग्याच्या दृष्टीने अभ्यंगस्थान खूप महत्त्वाचे आहे. या दिवशी स्त्रीया लवकर उठून घर अंगण साफ स्वच्छ करतात. अभ्यंगस्नान करतात. त्यानंतर देवाची पूजा करून जवळ असलेले सर्व अलंकार, अभूषणे घालून छान नटतात तयार होतात. या दिवशी खास पदार्थ बनवतात. बाजरीची भाकरी व वांगे, वालाच्या शेंगा, शेंगदाने, ओले हरभरे, गाजर अशी मिळस भाजी बनवतात. बाजरीच्या भाकरीला तीळ लावून बनवतात. या दिवशी मिसळ भाजीसाठी जे पदार्थ वापरले होते, ते सर्व पदार्थ सुवासिनीं गाडग्यामध्ये भरतात. म्हणजे या दिवशी सुवासिनी स्त्रीया पाच छोटी गाडगी पाच मोठी गाडगी आणतात . याला धार्मिक महत्त्व आहे. या गाडगीमध्ये भाजीसाठी जे वापरले होते हे सर्व पदार्थ थोडे थोडे भरले जातात याला वाण पूजन म्हणतात. आणि गाडगीला सुगड म्हणतात. मकर संक्रांतीला वाण दिला जातो. म्हणजे सुवासिनीला घरी बोलून ही गाडगी घेऊन ओटी भरली जाते त्यांना हळदी कुंमकुंम लावलं जातं त्यांना तिळगुळ दिलं जातं. असं म्हटलं जातं की, मकरसंक्रांतीला सुवासिनीला बोलावून हळदीकुंकू लावून, जे घडेल ते वाण देऊन त्यांची ओटी भरून तिळगूळ दिले की, पतीला दीर्घायुष्य मिळते. हा सण घरातील सर्व कुटुंबीयांनी प्रेम, आपुलकी, माया, जिव्हाळा सहकार्याच्या भावनेने साजरा करायचा असतो. या दिवशी कुठल्या प्रकारचे घरामध्ये भांडण किरकिर व्हायला नको असे म्हटले जाते.
मकर संक्रांतीला आपण "तिळगुळ घ्या गोड गोड बोला" असे म्हणतो. यामागचे कारण असे आहे की, समोरच्या व्यक्तीला तिळगूळ देत असतांना आपल्याविषयी समोरच्या व्यक्तीमध्ये जो गैरसमज किंवा तिरस्कार आहे तो नष्ट व्हावा. तिळगुळाच्या सहाय्याने त्याच्या मनातील कडूपणा दूर व्हावा हे कारण आहे. या दिवशी घरातील स्त्रीया सकाळी लवकर उठून घर अंगण स्वच्छ झाल्यानंतर देव पूजा केल्यानंतर सर्वप्रथम देवाला सुकडी अर्पण करतात. तिळगुळ अर्पण करतात व देवाला नमस्कार करताना" हे ईश्वरा तिळगुळ घे माझ्या संसारात गोड गोड होऊ दे माझी संसाराची बाग सुख समृद्धी आरोग्य धनधान्य संपदेने बहरु दे, "असे म्हणून सर्व प्रथम देवाला तीळ गूळ किंवा तिळाचे लाडू किंवा तिळाच्या वड्या अर्पण करतात.
मकर संक्रांतीला सूर्य मकर राशीत प्रवेश करतो हा उत्सव जानेवारी महिन्याच्या चौदाव्या किंवा पंधराव्या दिवशीच येतो या दिवशी सूर्य धनू राशी सोडून मकर राशीत प्रवेश करतो म्हणून याला मकर संक्रांती म्हणतात. भारतात हा सण वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या नावाने साजरा केला जातो यामागे केवळ आनंद, संपत्ती दान धर्म करणे हेच नसून आपापल्या पद्धतीने हा सण साजरा करताना सर्वांनी एकत्र जोडण्याचे काम करणे, आनंद सुसंवाद, तिरस्कार मिटवणे, ऐक्य ठेवणे. मकर संक्रांतीला पतंग उडविणे ही परंपरा आहे. पतंग उडवण्याच्या मागे धार्मिक व वैज्ञानिक कारण आहे. वैज्ञानिक कारणामागे आपण पतंग उडत असताना हाता पायाचा व्यायाम होतो कडाक्याच्या थंडीच्या वातावरणात शरीराला ऊर्जा मिळते, सूर्याच्या प्रकाशात विटामिन डी मिळते सूर्याच्या प्रकाशामुळे थंडी पासून सुटका होऊन खोकला सर्दी पासून आपली रक्षा होते. पतंग उडवणे यामागे धार्मिक कारण असे आहे की, तामिळनाडूच्या तन्दनान रामायणानुसार मकर संक्रांतीला पतंग उडवण्याची परंपरा सुरू केली. जो पतंग श्रीरामाने आकाशात उडवला होता तो सरळ स्वर्गात पोहचला आणि स्वर्गातील इंद्राचा पुत्र जयंताच्या पत्नीला तो पतंग मिळाला तिला तो पतंग फार आवडला तिने तो पतंग तिच्याजवळ ठेवला. तिने विचार केला की ज्याचा हा पतंग असेल तो नक्की पतंग घ्यायला येईल तिकडे श्रीरामाने रामभक्त हनुमानाला पतंग आणण्यासाठी स्वर्गामध्ये पाठवले. हनुमान जेव्हा जयंताच्या पत्नीजवळ पतंग आणायला गेला तेव्हा जयंताच्या पत्नीने श्रीरामाच्या दर्शनाची इच्छा व्यक्त करून त्यांचे दर्शन झाले तरच पतंग देईल असे म्हटले. तेव्हा हनुमानाने हा सगळा प्रकार श्रीरामाला सांगितला तेव्हा श्रीरामाने त्यांचे दर्शन चित्रकूटमध्ये होईल असे सांगून, हनुमानाला पतंग परत आणण्याचा आदेश दिला. तेव्हा हनुमानाने हा श्रीरामाचा आदेश आहे, असे जयंताच्या पत्नीला सांगितले, तेव्हा तिने तो पतंग परत केला.
"नभी यशाचा पतंग उंच उडावा
आयुष्यात तीळाचा गोड गोडवा यावा
कोरोनाकाळाचे भयावह संकट संपून
मनुष्य भयमुक्त होऊन स्वच्छंद जगावा"
धार्मिक व वैज्ञानिक कारणामुळे, निसर्गात होणाऱ्या बदलानुसार आपण आपल्या भारतीय संस्कृतीचे जतन करून, रूढी परंपरेनुसार सण उत्सव साजरे करायलाच हवेत.
सौ. कांचन चव्हाण-पवार,
वरद विद्या मंदिर, औरंगाबाद