सध्याचे युग हे २१ वे शतक म्हणून ओळखले जाते. आणि या शतकातील स्त्रीया 'माॅर्डन' म्हणून ओळखल्या जातात. आणि तो एक १६ व्या शतकाचा काळ होता. ज्या वेळी जिजाऊ मातेच्या गर्भात जगाला स्वराज्य निर्माण करून देणारा 'सुर्य' जन्माला येणार होता.जिजाऊंनी आपल्या गर्भावरती असे संस्कार केले की, बाळही त्यारूपानेच जन्माला आले. समाजातील लोकांना स्वतःचे छत देण्याचे स्वप्न त्यांनी गर्भावस्थेतच बघितले. आणि ते शिवरायांनी साध्य करून दाखविले. जिजाऊंच्या गर्भसंस्कारामुळेच असा बलाढ्य वीर पुरूष जन्माला घातला. म्हणून ती फक्त शिवरायांची माता न राहता. संपूर्ण महाराष्ट्राची राजमाता बनली.
हल्लीच्या स्त्रीयांना गर्भधारनेपासूनच मोबाईल, टीव्ही यासारख्या गोष्टींचा एवढा लळा लागला की, त्यांना ग्रंथ व पुस्तके यांचा विचार करायला वेळ राहिलेला नाही. त्यामुळे मुलंही तसेच जन्माला येतात. त्यांना जन्मल्यापासून प्रत्येक गोष्ट मोबाईलच्या माध्यमातून शिकवली जाते. आईपेक्षा जास्त सहवास मुलांना मोबाईलचा मिळतो. म्हणूनच "आजच्या काळात जिजाऊ निर्माण होणे शक्य नाही." कारण आजची जिजाऊ ही समाजातील आकर्षक असणाऱ्या गोष्टींकडे आकर्षित झालेली दिसून येत आहे.
जिजामातेने गर्भावस्थेतच माझा पुत्र या समाजाला स्वतःचे राज्य स्थापन करून देईल. असे स्वप्न बघितले होते. तसेच त्यांनी त्या दिशेने शिवरायांना मार्गदर्शन व संगोपन केले. शिवरायांची संगोपनाची जबाबदारी स्वतःवर घेतली. आणि स्वराज्य स्थापनेसाठी अशी किर्तीवंत मूर्ती निर्माण केली.
आताच्या स्त्रीयांना हे कसे जमेल. कारण मुलांना जेवण करण्यासाठी सुध्दा मोबाईल जवळ लागतो. म्हणजे स्वतःचे पोट भरण्यासाठी आम्ही त्यांना मोबाईलचा सहारा देतो. तर दुसऱ्यांचेही मुलं काय विचार करतील, आणि कुठून जिजाऊ निर्माण होईल.
जिजाऊंच्या काळजात पारतंत्र्याची सुई नेहमीच टोचायची. त्यामुळे त्यांनी स्वतंत्र्याचे स्वप्न पाहणारी शिवरायांसारखी मुर्तीमंत व्यक्ती निर्माण केली. मातेचे ध्येय स्पष्ट होते, म्हणून गर्भाने तसा आकार घेतला. आणि स्वराज्याची स्थापना झाली. रामायण, महाभारत, गीता या ग्रंथाचे सार जिजाऊंनी शिवरायांना बालपणातच पाजले. म्हणूनच करूणा, प्रेम, सहानुभूती, दया-माया, स्वातंत्र्य, धर्म, सत्ताकारण हे सर्व गुण शिवरायांच्या नसानसात भिनले आणि स्वराज्य निर्माण झाले.
सर्व गोष्टी फक्त प्रेमाने होत नसतात. त्यासाठी त्याग, संघर्ष, क्रोध, निर्भिडता, साहस व धैर्य यागोष्टी देखील तितक्याच महत्वाच्या असतात. जिजाऊंच्या प्रत्येक शिकवणीत वरील सर्व गोष्टी भरलेल्या होत्या. आताच्या मुलांना माता इतक्या नाजूक बनवून ठेवतात की, त्यांना स्वतःचे काम करण्यासाठी पण आईच लागते. आयता चहा, पाणी, नाश्ता, जेवण या छोट्या छोट्या गोष्टीसाठी सुध्दा मुलांना आळस येतो, आणि असं असेल तर कशी जिजाऊ निर्माण होईल, आणि कसे शिवराय निर्माण होतील.
जिजाऊ निर्माण होण्यासाठी नजरेत सूर्यासारखं तेज हवं असतं. मनात ध्येय निश्चित असावे लागते. आणि ह्रदयात नुसते प्रेम असून चालत नाही तर धाडस देखील हवे असते. तेव्हा कुठे "जिजाऊ निर्माण होऊ शकते." नुसत्या चार भितींच्या आत मोबाईल, टीव्ही व परिवाराच्या सुख दुःखामध्ये गुरफटलेली स्त्री जिजाऊ होऊ शकत नाही.
सौ. मनीषा उत्तमसिंह महेर,
परसोडा, ता. वैजापूर, जि. औरंगाबाद