वैशाख शुद्ध तृतीयेला 'अक्षय्यतृतीया' म्हणतात. याला वसंतोत्सवाचा दिवस असेही म्हणतात. हा चार मुहुर्तापैकी अर्धा मुहुर्त समजला जातो. हा श्राध्द दिवस मानला जातो. हा दिवस पितरांचा सण आहे. वास्तुशांती करिता पण मुहुर्त या दिवशी असतो.
बुधवार आणि रोहीणी नक्षत्र ज्या अक्षय्य तृतीयेला येईल ती सर्वात महत्वाची चांगली व महापुण्यकारक मानली जाते. अक्षय्य तृतियेच्या दिवशी कोणतेही नवीन काम सुरू करण्यास मुहूर्त पाहण्याची गरज नाही. या दिवशी केलेले दान, हवन, तर्पण, पूजा, जप इ. पुण्यकर्म अक्षय्य टिकते. म्हणून 'अक्षय्यतृतीया' ही पुण्यतिथी आहे. थोडक्यात पितरांचे ऋण फेडण्याचा हा दिवस. तसेच हा दिवस 'परशुराम जयंती' म्हणूनही ओळखला जातो.
अक्षय्य तृतीया हे नाव कसे पडले ?
या दिवसानिमित्त जप, होम, पितृतर्पण, दान पूजा वगैरे पुण्यकर्म केल्याने ते अक्षय्य पुण्यदायक होते म्हणुन या दिवसाला 'अक्षय्यतृतीया' हे नाव पडले.
श्रीकृष्ण हा पांडवांचा सखा तसाच पाठीराखा आणि त्यांचा मार्गदर्शक पण होता. पांडव कोणत्याही अडचणीत, संकटात सापडोत, श्रीकृष्ण सखा त्यांच्या रक्षणासाठी तिथे लगेच हजर व्हायचा. त्यांना संकटातून सुटण्यासाठी सल्ला द्यायचा. युक्तीच्या चार गोष्टी सांगायचा, कृष्णाचे त्यांच्यावर सदैव प्रेमच होते. पांडवांच्याही मनात ध्यानात कृष्ण असायचा. ते सुखात असोत किंवा दु:खात, त्यांना कृष्णाची आठवण व्हायची. लढाई अगर दानधर्माची बाब असो भगवान श्रीकृष्ण त्यांना योग्य ते उपदेश करायचे.
एकदा पांडव गंगेवर स्नानाला गेले. श्रीकृष्णही होतेच. पांडव रथ दूर सोडून गंगेच्या काठी • आले. तिथे एक सुंदर मंदीरात जाऊन ते बसले. सहज बोलणी निघाली. धर्मराज फार धार्मिक, त्याला नेहमी दानधर्म करावासा वाटायचा, यावेळी त्याच्या मनात आले माणसाने केलेले पुण्य कायम कसे टिकेल? त्याने लगेच कृष्णाला विचारले. श्रीकृष्णाने सांगितले "वैशाख शुद्ध तृतीयेला दान करावे, या दिवशी होमहवन करावे, यज्ञात आहुती द्याव्यात, देवाच्या नावाने दानधर्म करावा. आपल्या परलोकात गेलेल्या पितरांकरीता, वाडवडीलांकरिता त्यांच्या नावाने पुण्यकर्म तर्पण, दानधर्म करावे. अशाप्रकारे या दिवशी केलेले कर्म कायम टिकते. सदैव अक्षय्य राहते. " धर्माला ते ऐकुन फार आनंद झाला. त्याला हवी असलेली चांगली गोष्ट समजली. वैशाखाच्या पहिल्या पंधरवाड्यात येणारी तिसरी तिथी ही शुध्द तृतीया, म्हणून या तिथीला नाव पडले 'अक्षय्यतृतीया'
या दिवसाला एवढे महत्व का आले ?
चार युगे आहेत- कृत, त्रेता, द्वापार आणि कली.
यातले पहीले जे कृतयुग यात लोक फार सुखी होते. सर्वत्र शांतता, समाधान नांदत होते. अशा कृतयुगाचा आरंभ या दिवशी म्हणजे वैशाख शु. तृतीयेला झाला. कोणत्याही युगाचा आरंभ शुभ मंगल मानला जातो म्हणून हा दिवस महत्त्वाचा आहे.
तापलेल्यांना थंड करावे, भुकेले, तहानलेल्यांना तृप्त करावे असा प्रघात आहे. या दिवशी जलकुंभदान करतात. पितरांना उदककुंभदान करतात, तसेच ग्रीष्मऋतुमध्ये होणान्या सर्व प्रकारच्या धान्यांचे यादिवशी दान करावे. या दिवशी श्राध्द करतात म्हणजेच परलोकांत गेलेल्या वाडवडीलांना पाणी देतात. त्यांची आठवण म्हणुन पूजा करतात.
हा दिवस आणखी एका कारणासाठी लक्षात ठेवण्यासारखा आहे, कारण या दिवशी परशुरामाचा जन्म झाला. उन्मत्त झालेल्या क्षत्रीयांना या ब्राह्मणाने चांगला धडा शिकवला. सर्व पृथ्वी जिंकली पण आपल्या ब्राह्मणपणाला विसरला नाही. त्याने पृथ्वी जिंकली आणि सारी दान करून टाकली. अखेर आपण स्वतः तपश्चर्या करण्यासाठी निघून गेला.
अक्षयचा अर्थ
'अक्षय' म्हणजे कधीही न संपणारे, अखंड टिकणारे. या दिवशी केलेले दान हे अक्षय राहते, कधीही संपत नाही म्हणून या तिथीला आपणास जे जे शक्य असेल ते ते दान करावे. यादिवशी दान केलेले अक्षय तर राहतेच पण त्याचबरोबर दान देणाऱ्यास यामुळे शांती, सुखसमृध्दी यांचाही लाभ होतो. म्हणुन आपणास जे शक्य असेल असे एखादे पुण्यकृत्य करावे असे पूर्वज सांगतात. या दिवशी केलेले सत्कृत्य अखंड टिकणारे असते हे सर्वात विशेष.
दानाचे महत्व
गोरगरीब, पददलित, उपेक्षितांना मदत करण्याची प्रेरणा देणारा, त्यासाठी प्रवृत्त करणारा हा सण आहे यामुळे समता बंधुभाव ऐक्य टिकण्यास मदत होते. अनाथ विद्यार्थ्यांना मदत करावी. अन्नदान वस्त्रदान करावे.