गणपती विसर्जन कसं करावं?

एके दिवशी मी मनात विचार केला की गणपतीला निरोप देताना आपल्याला कसं वाईट वाटतं. तसच बाप्पाला वाटत नसावं का बरं? तर हो त्यालादेखील खूप वाईट वाटत जेव्हा आपला बाप्पा आपल्याला सोडून जातो.

गणपती विसर्जन कसं करावं?

वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ ।
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ॥

प्रत्येक शुभ कार्यात वरील श्लोक वरील श्लोक आवश्यक म्हटला जातो. श्लोक संस्कृत असला तरी खुप अर्थपूर्ण आहे. श्लोकाचा अर्थ म्हणजेच "वाईट मार्गाचे आचरण करणार्‍यांना सरळ मार्गावर आणणार्‍या, विशाल शरीर असलेल्या, कोटी सूर्यांची प्रभा लाभलेल्या हे देवा श्रीगणेशा माझी सर्व कार्ये नेहमी निर्विघ्नपणे पार पडू दे."

दहा दिवसांचा पाहुणचार घेऊन आपल्या सर्वांचे बाप्पा आता आपला निरोप घेण्यासाठी सज्ज झाले. गणपती विसर्जाच्या आधी आपल्या बाप्पाची थोडीशी पार्श्वभूमी सांगावी वाटते. भाद्रपद शुद्ध चतुर्थी या तृतीयेला आपल्या लाडक्या गणरायाचे घरोघरी आगमन होत असते. चराचरात चैतन्य निर्माण झालेले असते. सकल कलांचा अधिपती आपला लाडका गणपती बाप्पा आपल्या सर्वांच्या भेटीसाठी येतो. थोरामोठ्यांपासून सगळेच त्याची आतुरतेने वाट बघत असतात. त्याचे आगमन झाल्यावर काय करावं काय नको असं होत असतं. लाडक्या गणरायाचे विसर्जन म्हणलं तरी डोळ्यात टचकन पाणी येतं.

गावागावात वेगवेगळया प्रकारे गणपतीचं विसर्जन करण्याची पद्धत असल्याचे आपल्याला दिसून येते. कुणी ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढतात. कोणाचे लेझीम पथक असतात. कुणी डीजे वाजवत बाप्पाला निरोप देतात. मला तर वाटतं निरोप म्हणाल्यावर आपण हरी भजनाच्या गजरात आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप घ्यायला हवा. ते कर्णकर्कश आवाज, ती रंगांची उधळण हे सगळ कशासाठी हो? टाळ मृदुंगाच्या गजरात किंवा साधी घंटी वाजवून जरी आपण त्याला निरोप दिला ना तर तो त्याला जास्त आवडेल. आपण आपल्याला आवडतं ते करतो, पण आपल्या बाप्पाला काय वाटत असेल, त्याला आपल्या अशा वागण्याचा किती त्रास होत असेल याचा विचार कधीच कुणी करत नाहीत. 

वर्षभर आपण गणेश उत्सवाची वाट बघतो. फक्त दहाच दिवस तो आपल्या घरी राहतो. पाहुणचार घेऊन आपला निरोप घेतो. तो विसर्जनाचा दिवस उगवला की अंगावर काटा उभा राहतो. तो आपल्याला सोडून जाणार हा विचार आपल्या मनाला पटतच नाही. आज आपल्या घरातील आपल्या बाप्पाचा शेवटचा मुक्काम असतो, म्हणजे त्याचं वास्तव्य आपल्या घरात कायमच असणार परंतु मुर्तिरूपी बाप्पाच त्या दिवशी विसर्जन असते. लाडक्या बाप्पाला निरोप देताना अगदी भरून येत. तळणीचे मोदक, उकडीचे मोदक, लाडू, पेढा या पदार्थांचा सुगंध प्रत्येक घरात दरवळत असतो. घराघरात विसर्जनाची तयारी केलेली आपल्याला दिसून येते. 

प्रत्येक गावातील प्रशासनाने गणपती विसर्जनाची तयारी केलेली असते. शहराप्रमाणे आज काल खेडेगावात देखील विसर्जन तलाव बांधल्याचे आपल्याला दिसून येते. कृत्रिम तलाव सगळीकडे बांधलेले आसतात. अलीकडे तर निर्माल्य कलश देखील उभे केलेले दिसतात. कोणत्या मार्गावरून कोणता बाप्पा जाणार विसर्जनाचा मार्ग ठरवणे, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हवी ती खबरदारी घेणे, महिलांना त्रास होऊ नये म्हणून विशेष महिला पोलिस पथकांची नियुक्ती करणे या अशा एक व अनेक कामांचा आढावा घेत बैठका घेऊन अगदी सुरेख नियोजन करणे. अशी अनेक कामे पोलिस प्रशासनाकडून  जबाबदारीने आणि अगदी चोखपणे पार पाडली जातात. 

एके दिवशी मी मनात विचार केला की गणपतीला निरोप देताना आपल्याला कसं वाईट वाटतं. तसच बाप्पाला वाटत नसावं का बरं? तर हो त्यालादेखील खूप वाईट वाटत जेव्हा आपला बाप्पा आपल्याला सोडून जातो. विसर्जनाच्या दिवशी त्याची पाऊल सुद्धा खूप जड होतात. पण मला वाटतं गणपती बाप्पाचे विसर्जन करताना आजकाल कुणीच पुरेशी काळजी घेत नाहीत. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपण सर्वांनी विसर्जनाची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. जरी आपण विसर्जनासाठी बाहेर पडलो तरी प्रत्येकाने दक्षता घेणे गरजेचे आहे. मास्क आणि स्यानिटायजर यांचा वापर करावा. सुरक्षित अंतर ठेवून गणपतीचे विसर्जन करावे. 

काय सांगावं! गणपती विसर्जनाच्या दिवशी सगळे लोक उत्साहात तर असतात. पणं कुठेही मूर्ती विसर्जन करणं काळजी न घेणं हा खूप मोठा गुन्हा आहे असं मला वाटतं. जेव्हा गणपती विसर्जन होते. त्या दिवशी घाटावर जी परिस्थिती असते ना तीचे वर्णन आपण करू नाही. अहो! खूप वाईट प्रकार पाहायला मिळतात त्या दिवशी. दहा दिवस जीव तोडून त्याची सेवा करायची आणि शेवटच्या दिवशी त्याला विसर्जन केलं की खरं चित्र खूपच विचित्र असतं. अनेक मूर्तींची विटंबना झालेली असते. हात पाय भंगले असतात. निर्माल्य सगळीकडे अस्थाव्यस्थ पडलेले असते. नदी नाले तलाव सगळीकडे घाणीचे साम्राज्य पसरलेले असते. एक दैवत म्हणून आपण त्याची मनोभावे सेवा करायची आणि शेवटच्या दिवशी उघड्या डोळ्यांनी हे दृश्य पहायचं? फार वाईट वाटतं हो सगळं पाहिल्यावर. म्हणून मला वाटतं आपण शांततेमध्ये आणि योग्य ती दक्षता घेऊन आपल्या गणरायाला निरोप देऊया. हल्ली बाप्पाच्या इको फ्रेंडली मूर्तीसुध्दा सगळीकडे मिळतात. जर आपण अशा मूर्ती घेतल्या तर त्या मूर्तींचे विसर्जन आपण घरच्या घरी करू शकतो. सगळयांना वाटतं त्या मूर्ती खूप महाग असतात. हो! ते अगदी खरं आहे. पण अशा मूर्ती विकत घेणं आपल्याला जमलं नाही तर घरच्या घरीच आपण आपल्या बाप्पाची मूर्ती बनवू शकतो. साध्या लाल मातीपासून देखील आपण गणपतीचे रूप साकारू शकतो. अशा मूर्तींचे विसर्जन आपण घरच्या घरी करून तेच पाणी आपल्या घरातील झाडांना देऊ शकतो. मला वाटतं तो बाप्पाचा आशिर्वाद कायम आपल्यासोबत राहील. म्हणून विसर्जनाच्या दिवशी जोरजोरात डॉल्बी आणि डीजे वाजवण्यापेक्षा शांत आणि मधुर आवाज असलेली वाद्य घेऊन किंवा हरी भजनाच्या गजरात आपण बाप्पाला निरोप देऊया.

प्रिती सुरज भालेराव, पुणे