तिच्या चेहऱ्यावर हास्य फुलावे

खरं नातं कसं असावं, खरं प्रेम कसं असावं तर ते भुंगा आणि कमळाच्या फुलासारखे असावे. भुंग्याचे कमळाच्या फुलावर इतके अतूट प्रेम असते की भुंगा मृत्यूला कवटाळतो परंतु फुलाला कुठलिही इजा होवून देत.

तिच्या चेहऱ्यावर हास्य फुलावे

खरे प्रेम कसे असावे हे ज्ञानेश्वरी ग्रंथ अभ्यासल्यानंतर आपल्या लक्षात येईल. संत ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरीतील अध्याय क्रमांक १ व ओवी क्रमांक २०१ मध्ये प्रेमाचे वर्णन पुढीलप्रमाणे करतात.

जैसा भ्रमर भेदी कोडे!
भलतेसे काष्ठ कोरडे!
परि कळिकेमाझी सापडे!
कोवळिये!!
तेथ उत्तीर्ण होईल प्राणे !
परि ते कमलदल चिरून नेणे !
तैसे कठीण कोवळेपण !
स्नेह देखा !!

खरं नातं कसं असावं, खरं प्रेम कसं असावं तर ते भुंगा आणि कमळाच्या फुलासारखे असावे. भुंग्याचे कमळाच्या फुलावर इतके अतूट प्रेम असते की भुंगा मृत्यूला कवटाळतो परंतु फुलाला कुठलिही इजा होवून देत. एकदा भुंगा कमळाच्या फुलावर बसून प्रेमाचा निखळ आनंद घेत होता. फुलाप्रती आसणा-या प्रेमात तो भुंगा इतका मग्न झाला की केव्हा रात्र झाली हे भुंग्याला कळलेच नाही. दिवसभर फुललेले फुल रात्री मिटले गेले आणि त्या फुलात भुंगा अडकल्याने त्याला आँक्सीजन मिळणे अशक्य झाले. त्यामुळे फुलातच भुंग्याचा मृत्यू झाला. वास्तविक पाहता लाकडाला छिद्र पाडणारा भुंगा एका क्षणात फुलातून बाहेर येऊ शकत होता. परंतु फुलावर असलेल्या अतूट प्रेमापाटी फुलाला इजा होऊ नये म्हणून त्या भुंग्याने फुलातच मृत्यू पत्करला परंतु फुलाला इजा होऊ दिली नाही. असे प्रसंग माणसाच्या जीवणातही घडत असतात. 
          
एके दिवशी सोशल मिडीयाच्या माध्यमातून एका साहित्यविषयक समुहावर सागरने एका कवयित्रीच्या कविता वाचल्या. कविता वाचल्यानंतर त्या कवितेत त्याला दुःख जाणवले. कित्येक वर्षापासून त्या दुःख भोगत असाव्यात असे त्याला मनापासून वाटू लागले. मात्र त्या कवयित्रीचा आणि सागरचा  काहीच परिचय नव्हता. एके दिवशी त्या कवयित्रीचा ग्रुपवर परिचय द्यायची वेळ सागरवर आली त्यावेळी तिचे नाव त्याला समजले. तिचे नाव होते धनुश्री. धनुश्री ही लोकसेवा आयोगाच्या परिक्षाचा अभ्यास करणारी हुशार विद्यार्थीनी. त्यानंतर तिचा आणि सागरचा परिचय हळूहळू वाढू लागला. तिचा स्वभाव खुप शांत आहे. ती काही जास्त बोलत नाही. परंतु तिच्या चेहऱ्यावरील दुःख बघितले की सागरचे मन कासावीस होत जाते. सागरला मनोमन वाटत होते मी तिच्या चेहऱ्यावर हसू फुलवावे. म्हणून  सागर तिच्यासोबत ओळख वाढवत गेला. 
      
सागर आणि धनुश्री दोघेही समवयस्क असल्यामुळे त्याने एके दिवशी बोलता बोलता तिला दुःखाचे कारण विचारले. त्यावेळी तिचे अंतःकरण नक्कीच जड झाले असेल; असे त्याला वाटले. तिने त्याला सांगितले की, मी एक शिक्षिका असून माझ्या विवाहानंतर अडीच वर्षात माझ्या पतीचा अपघाती मृत्यू झाला. तेव्हापासून माझ्या नशीबात दुःखच आहे. सुखाची जुळूकही कधी माझ्यापर्यंत पोहचली नाही. दुःख काय असते ते सागरने जवळून पाहिलेले असल्यामुळे तो तिचे दुःख समजू शकला.
         
त्यानंतर त्याने पूर्णपणे विचार केला की, मी तिच्या चेहऱ्यावर हास्य फुलवेल, आणि तो त्यानुसार प्रयत्न करू लागला. तिचा स्वभाव आध्यात्मिक असून उपवास करणे, देवपूजा करणे, गंगास्नान करणे हे तिचे महत्त्वाचे व्रत आहे. त्यामुळे सागर तिची वेळोवेळी चौकशी करत असे. फराळ झाले का? उपवास सोडला का? देवपूजा झाली का? काय करत आहे ? मुलगा काय करतोय? अशी चौकशी त्याची नेहमीच चालू असते; आणि अधूनमधून तिला हसवण्याचा ही तो प्रयत्न करत असतो. तसेच त्याने तिच्यासाठी "दुःखाशी संवाद" ही कविता लिहिली आणि तिला पाठविली,

दुःखात हो तुमच्या
मला ही सामावून घ्या
दुःखाची तुमची जागा
थोडीशी मला ही द्या.

संवाद सुखाचा 
असतो सुखाशीच 
दुःखाचा मात्र संवाद 
असतो दुःखाशीच

कित्येक वर्षाचे दुःख 
साचले असेल मनात 
संवाद करा माझ्याशी
मन रिते होईल क्षणात 

घुसमट तुमची बघून
डोळे माझे पाणवतात
दुःखाचा विचार केला की
वेदना तुमच्या जाणवतात 

माझ्याकडून कधीही
होणार नाही निराशा 
चेहऱ्यावर फुलावे हास्य 
हीच आहे एक आशा

वरील कविता वाचल्यानंतर तीचे डोळे भरून आले, आणि ती सागरशी मनमोकळेपणाने संवाद साधू लागली. सागरच्या आतापर्यंतच्या आयुष्यात कधीही कुठल्या स्त्रीविषयी त्याच्या मनात कधीच आकर्षण, प्रेम किंवा जिव्हाळा निर्माण झाला नव्हता. परंतु का कोणास ठाऊक तिच्याविषयी त्याच्या मनात ओढ निर्माण झाली. तिचे दुःख त्याला त्याचेच वाटू लागले. तिचे प्रत्येक प्रश्न जणू काही त्याचेच वाटू लागले. ती पण सागरवर विश्वास करू लागली. तिचा स्वभाव शांत आहे. बुद्धीमत्ता अलौकिक असून तिचे मनही कोमल आहे. स्वभावही मनमोकळा आहे. असे तिच्या बोलण्यातून त्याच्या लक्षात येत होते. 
        
दोघांत साहित्यविषयक चर्चा होत असे. परंतु मैत्री निर्माण कशी करावी हा ही प्रश्न सागरसमोर उभा होता. कारण मैत्रीतूनच 'प्रेम' जन्माला येत असते, असे म्हणतात.  म्हणून सर्वप्रथम मैत्री करणे आवश्यक होते. तिच्यात आणि त्याच्यात काही दिवसानंतर मैत्री झाल्यामुळे संवाद वाढत गेला. ते दोघे नेहमीच वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करू लागले. कविता कशा असतात. कथा कशा असतात. लेख कसे लिहितात. अशा विविध चर्चा दोघांत होत असे.
          
सागरने जीवनात कधीच कुठल्या मुलीवर किवा स्त्रीवर प्रेम केलेले नव्हते. परंतु धनुश्रीवर सागरचे मनापासून प्रेम होते. अगदी ज्ञानेश्वरीतील ओवीमधील भुंग्याप्रमाणे. मात्र एक अडचण होती. ती म्हणजे प्रेम व्यक्त कसे करावे? व्यक्त केले तर ती रागावेल का? रागवल्यामुळे ती बोलणे बंद करेल का? असे असंख्य प्रश्नांचे वादळ त्याच्या डोक्यात घोंघावत होते. त्यामुळे माझे तुमच्यावर प्रेम आहे. असे म्हण्याची हिंमत त्याची होत नव्हती. त्यामुळे तो तीला म्हणायचा की, 'मला तुमचा स्वभाव खुप आवडतो', तर त्यावर ती म्हणायची हं! त्यानंतर तो तीला म्हणायचा, मला तुम्ही पण आवडतात. ती पुन्हा म्हणाली हं! मनात नेहमीच एक विचार घोंघावत असे, आपले प्रेम सत्य आहे. भुंग्यासारखे निर्मळ आहे. आपण आपले प्रेम व्यक्त करायला पाहिजे. परंतु सागरला तिला दु:खवायचे नव्हते. त्यामुळे आजही त्याच्या मनात विचाराचे काहूर घोंघावत आहे. अन् घोंघावत राहणार. सागरला तिचे प्रेम मिळो अथवा न मिळो, त्याची फक्त एकच अंतिम इच्छा आहे. ती म्हणजे  'ती'च्या चेहऱ्यावर हास्य फुलावे. आणि नेहमीच फुलत रहावे.
          
(वरील कथा रंग प्रीतिचे या कथासंग्रहातून साभार) 

Baba Channe
बाबा चन्ने, धोंदलगाव,
ता वैजापूर ९६६५६३६३०३.