बुध्दीला प्रेरणा व जगण्याला ऊर्जा देणारी सुंदर भावना म्हणजे प्रेम

प्रेम खूप सुंदर आहे. फक्त ते समजून घेता आलं पाहिजे, पारखता आलं पाहिजे, सगळं आयुष्य सुंदर बनून जाईल फक्त प्रेमाला योग्य दृष्टिकोनातून समजून घेतले पाहिजे.

बुध्दीला प्रेरणा व जगण्याला ऊर्जा  देणारी सुंदर भावना म्हणजे प्रेम

मी अनेक वर्षापासून साहित्य क्षेत्रात कार्यरत असल्यामुळे विविध विषयांवर नेहमीच लेखन करत असतो. मी आतापर्यंत ऐतिहासिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक, औद्योगिक, राजकीय अशा विविध विषयांवर लेखन केले. त्या लेखनाला वर्तमानपत्र, फेसबुक, वाॅटस् ॲप, इंस्टाग्राम, अशा माध्यमावर हजारो वाचकांनी माझ्या लेखनाचा पसंती दिली.
         
मी ऑक्टोबर २०२० च्या आधी 'प्रेम' या विषयावर कधीही लेखन केलेले नव्हते. परंतु ऑक्टोबर २०२० पासून मी 'प्रेम' या विषयावर लेखन करू लागलो. अनेक लेख मी प्रेम विषयावर लिहिले, अनेक कविता लिहिल्या. वाचकांनी माझ्या लेखनाला मनापासून पसंती दिली. मी 'प्रेम' या भावनेला वेगवेगळ्या अंगाने मांडू लागलो. अनेक वाचक मला फोन किंवा इमेलच्या माध्यमातून विचारू लागले. सर, तुमच्या माध्यमातून खरं प्रेम हे काय असतं हे आम्हाला तुमच्या लेखणीने दाखवून दिले.
        
माझं नेहमीच एक मत असतं. ते म्हणजे, प्रेम ही खुप सुंदर भावना आहे. त्या भावनेला मनापासून जपले पाहीजे. खरे आणि पवित्र 'प्रेम' माणसाच्या मनात उत्साह निर्माण करण्याचे काम करत असते, बुद्धीला चालना देण्याचे तसेच जगण्याला ऊर्जा देण्याचे देखील काम करत असते. खरे प्रेम ज्याच्यासोबत आहे. तो कधीही पराजित होत नाही.
       
एखादी व्यक्ती जेव्हा मनापासून प्रेम व्यक्त करत असते. तेव्हा काय प्रतिक्रिया द्यावी किंवा त्यांचे आभार कसे मानावे, हे आपल्याला समजत नाही. खरे खुरे प्रेम मिळवण्याची क्षमता, प्रेम दिल्याने, प्रेम वाटल्याने प्राप्त होते. जेवढे तुम्ही केंद्रित होत जाल तेवढे तुम्हाला तुमच्या अनुभवांच्या आधारावर हे ज्ञात होत जाते. प्रेम निव्वळ भावनाच नाही तर प्रेम तुमचे शाश्वत देखील अस्तित्व आहे.
       
खरे प्रेम कायम मनात रहाते. उडते ती वासना. प्रेमाचे बंध आयुष्यभरासाठी असतात, ते प्रेमात पडलेल्यांना प्रगतीकडे नेतात. मागे कधीच खेचत नाहीत. 
       
बालिश प्रेम म्हणजे, मला तुझी गरज आहे, म्हणून मी तुझ्यावर प्रेम करतो. परिपक्व झालेले प्रेम म्हणजे, मी प्रेम करतो म्हणून मला तुझी गरज आहे. तुमच्या आयुष्यात कुणी यावं, हे तुमच्या कपाळावरची नशीबाची रेषा सांगते, पण तुमच्या आयुष्यात कुणी थांबायचं हे तुमचे ह्रदय ठरवते. प्रेमकथा महत्त्वाच्या नसतात, महत्त्वाची असते, ती तुमच्यातील प्रेम करण्याची क्षमता आणि शेवटी, ज्यांचा देवावर विश्वास असतो, ते भूतलावर असतात. आणि देव मात्र स्वर्गात असतो. पण जे देवावर प्रेम करतात. ते नेहमीच देवासमोर असतात. आणि देव त्यांच्यासमोर असतो. याचे अप्रतिम उदाहरण आपलेला संत चरित्रातून मिळेल. प्रेम म्हणजे रोज फोनवर बोलणं, भेटणं किंवा फिरणं नसून हजारो मैल दूर असले तरी फक्त एका आठवणीने मिळालेला आनंदाचा क्षण म्हणजे प्रेम होय.
       
'प्रेम' खूप सुंदर आहे. फक्त ते समजून घेता आलं पाहिजे, पारखता आलं पाहिजे, सगळं आयुष्य सुंदर बनून जाईल फक्त प्रेमाला योग्य दृष्टिकोनातून समजून घेतले पाहिजे.

 Baba Channe

बाबा चन्ने, धोंदलगाव, ता. वैजापूर