कर्नाटकच्या एका खेडेगावात लहानाची मोठी झालेली उमा १८ व्या वर्षी लग्न होऊन सासरी येऊन आता जवळजवळ दहा वर्षे झाली होती. नाही म्हणायला खाऊन पिऊन ती सुखी होती. पदरात दोन मुलं, त्यांचं करता करता तिचा दिवस कसा जायचा कळत नसे. जोडीला सासू-सासरे कामात मदत करायचे. तिचा नवरा किसन एक ड्रॉयव्हर होता . ट्रक स्वतःचा असल्याने तो माल घेऊन मुंबईला जात असे. आठ दिवसांनी गावी परतत असे. तसं ती स्वतःला सुखी आहे असं मानायची. पण मनात एक इच्छा असायची की मुंबई पाहायची. तिने तस बऱ्याच वेळा नवऱ्याला सांगितले होते. पण किसन नंतर जाऊ असं सांगायचा.
अलीकडे या वर्षात किसन पंधरा दिवसांनी तर कधी एक महिन्यांनीच घरी येतोय, असं व्हायला लागल्यामुळे तिने तिची काळजी सासू -सासऱ्याना बोलून दाखवली. त्यांनीही तिची बाजू घेऊन मुलाला म्हणजे किसनला विचारणा केली तर किसनने उत्तर म्हणून मला आता खूप काम मिळालं आहे असं सांगितले. तसंच त्यामुळे मी मुंबईला एक रूम घेतली आहे. लवकरच उमाला व मुलांना घेऊन जाणार आहे. हे ऐकून उमा व सासू-सासरे एकदम खुश झाले. उमाला तर काय करू आणि काय नको असं झालं होत. तिचं मुंबई पहायचं स्वप्न पूर्ण होणार होत. आणि मुंबईला राहायलाही मिळणार होत. तिने आवश्यकच तेवढंच सामान बांधून ठेवलं. येत्या रविवारी ती स्वतःच्या ट्रकमधून नवऱ्यासोबत पहिल्यांदा मुंबईला जाणार होती.
रविवारच्या दोन दिवस आधी किसन गावी आला होता. तो पण तिला मुंबईची माहिती व मुंबईला कसं राहायचं याच्या सूचना देत होता. ती मुंबईच वर्णन ऐकून सुखावत होती. रविवार उजाडला. सासू सासऱ्यांनी भरलेल्या डोळ्यांनी किसनला, सुनेला व दोन नातू यांना निरोप दिला. मुलापेक्षा त्यांना सुनेची जास्त माया लागली होती. खूप प्रेमानं करायची ती त्यांचं.
प्रवास सुरु झाला. ट्रकच्या पुढच्या केबिन मध्ये ती, मुले व नवऱ्याचा एक मित्र. जो सोबत म्हणून नेहमीच असायचा त्याच्याबरोबर. दुपारी एका धाब्यावर किसनने ने सगळ्यांना मनसोक्त खायला घातलं. कर्नाटक बॉर्डर पास करायला संध्याकाळ झाली. तरीही उजेड होताच. गाडीने महाराष्ट्र राज्यात प्रवेश केला. तिला तो सारा परिसर नवा होता. ती फार कौतुकाने आजूबाजूला बघत आनंदून किसनला काही प्रश्न विचारत होती. तोही तिला प्रत्येक गावाचे नाव त्याचं वैशिष्ट्ये सांगत होता. तिला मराठी अजिबात येत नव्हतं. त्यामुळे मराठी पाट्याबद्दल ती नवऱ्याला विचारत होती. आता रात्र व्हायला लागली होती. मुले पेंगळून गेली होती. मुलांना अशा प्रवासाची सवय अजिबात नव्हती. त्यामुळे नवऱ्याने पुन्हा एका हॉटेल समोर ट्रक ऊभा केला. रात्रीचे दहा वाजत आलेले. वातावरणात थोडासा गारवा होता. सगळे आनंदाने जेवले. मुलेही हॉटेल मध्ये जेवायला मिळाले म्हणून खुश होती.
गाडी पुन्हा रस्त्याला लागली. आता हायवेचा रस्ता होता. नवऱ्याचा मित्र गाडी चालवत होता. भरधाव गाडी जात होती. तिला झोप येत होती. मुले तर केव्हाचीच मागील बाजूला जिथे जागा होती तिथं गाढ झोपली होती. आता ती ही आडवी झाली. अगदी विश्वासानं तिने नवऱ्याच्या मांडीवर डोकं टेकवलं व ती शांत झोपली. नवऱ्यानेही ती झोपताना हसऱ्या मुद्रेनं तिच्याकड पाहिल्याने ती आणखीनच हसत गाढ झोपली होती. अचानक तिला कसल्यातरी आवाजाने जाग आली. तर किसन व त्याचा मित्र काहीतरी कुजबुजत असल्याच तिच्या लक्षात आलं. ती तशीच शांत पडून होती. तिचे डोळे बंद होते. फक्त कानांत प्राण आणून ती त्यांचे बोलणे ऐकण्याचा प्रयत्न करत होती.
मित्र विचारत होता, "आता तू काय करणार वहिनीचं? कोठे ठेवणार आहेस त्यांना? मुंबईच्या रूमवर तर विमल आहे ना? मग यांना कशाला घेऊन निघाला आहेस? "किसनच्या उत्तराने उमाच्या पायाखालची जमीन सरकली. तिला उठून ट्रकमधून उडी मारावी वाटली. किसन म्हणत होता," अरे हिला, मुलांना मारून टाकतो. आणि देतो पुढच्या घाटात दरीत ढकलून.नको आहे ही मला."
अरे असं करू नकोस तिने, मुलांनी काय गुन्हा केलाय? दे सोडून कुठेतरी रस्त्यात. नाहीतरी त्यांना मराठी कुठे येतंय? "यावर किसन म्हणाला, "बघू पुढे कुठंतरी गाडी थांबवून देऊ सोडून." तिला आता घाम फुटत होता. ज्याच्या मांडीवर आपण विश्वासाने डोकं ठेवून झोपलोय तोच आपल्याला मारायला निघालाय यावर तिचा विश्वास बसत नव्हता. ती पुढे काय होतंय त्याची वाट पाहू लागली. परिस्थिती तिच्या लक्षात येऊ लागली.
रात्रीचे दीड दोन वाजले असतील तसं अचानक गाडी थांबत असल्याच तिला जाणवलं. तस नवऱ्याने तिला जाग केलं व आपल्याला थोडा वेळ खाली उतरावं लागेल गाडी बिघडली आहे असं सांगितले. तिच्या सार लक्षात आलं. पण तिने काहीच न समजल्यासारखं करून मुलांना उठवून निमूटपणे खाली उतरली. समोर एक चहाची टपरी चालू असल्याचं दिसलं. ती तिथं गेली व जमिनीवर मुलांना मांडीवर घेऊन स्वतःला देवाच्या हवाली करून शांत बसली.
तितक्यात गाडी सुरु होऊन निघून जात असल्याचा आवाज तिच्या कानावर आला, पण ती जागची अजिबात हलली नाही. मात्र टपरी वाल्याच्या ही बाब लक्षात आली. तो ट्रक मागे थोडा ओ... ओ... म्हणत पळाला. पण काहीच उपयोग झाला नाही. तिनेही टपरीवाल्याला हातानं थांबण्याचा इशारा केला. चहावाल्याने तिला जवळ जाऊन विचारायचा प्रयत्न करणार इतक्यात ती जोरात ओरडून रडू लागली. तिचा आता कोणावरच विश्वास राहिला नव्हता. त्यानं तिला समजावण्याचा प्रयत्न केला पण तिला त्याची मराठी भाषा अजिबात कळली नाही. आणि ती तिच्या भाषेत रडून काही सांगू लागली तर त्यालाच काही कळलं नाही. तितक्यात दोघेजण मोटार सायकलवरून तिथून जात होते. त्यानी तो प्रसंग पाहिला व गाडी थांबवून काय झालंय याबद्दल चहावाल्याला विचारलं. त्यानं झालेला प्रसंग व त्या बाईला मराठी समजत नसल्याचं सांगितले.
प्रसंगाचं गांभीर्य ओळखून त्यातील एकाने त्याच्या मित्राला फोन लावला व तिथं बोलावून घेतलं. तो मित्र दहा मिनिटात आला. उमाला तर काय चाललंय हे कळत नव्हतं. पण जो मित्र तिथं आला त्यानं तिला भाषेत प्रश्न विचारले तेव्हा तिने सगळा प्रसंग सांगितला. तोपर्यँत पोलीस तेथे येऊन पोचले होतेच. दुसऱ्याने पोलिसांना कळवले होते. पोलिसांनी तिला धीर दिला व पोलीस गाडीतून शहराच्या ठिकाणी घेऊन गेले. मुले तर खूपच गांगरून गेली होती.
तिथून सकाळी तिच्या घरी जाणाऱ्या बस मध्ये बसवून कर्नाटकच्या पोलिसांनाही कळवले गेले उमाने मात्र माहेरी जाण्याचा निर्णय घेतला होता. ती सुखरूप तिच्या घरी पोचल्यावर तिथल्या पोलिसांनी कळवलं. मग या चहाच्या टपरीवर जमलेल्या चौघांना या बातमीने आनंद झाला. उमा मात्र आजही विचार करते आहे ज्या नवऱ्याला देव मानले त्याने असा धोका दिला. तर ऐनवेळी मदतीसाठी आलेले ते चौघे व महाराष्ट्रातील पोलीस हे माझ्यासाठी देवदूत आहेत.
जर माझ्या नवऱ्यासारखे हिंस्त्रश्वापद असतील तर हो, देवदूत आहेत मनुष्य रूपात...
सौ. जयश्री अविनाश जगताप,
मु. पो. सायगाव,
ता. जावली, जि. सातारा