पाण्याचा अतिवापर आपल्याच डोक्यावर आपल्या चुकीचे फुटेल खापर

आता उन्हाळा कुठे सुरू झाला आहे पाणी काय आहे? त्याची जीवनाला किती गरज आहे ते कळायला सुरूवात होईल.

पाण्याचा अतिवापर आपल्याच डोक्यावर आपल्या चुकीचे फुटेल खापर

उन्हाळा सुरू झाला म्हणजे उन्हाची कडच झळ आता सोसावी लागणार, गरमीला  सामोरे जावे लागणार, महत्त्वाचे म्हणजे पाण्यासाठी काहींना हातही जोडावे लागणार. जे सूर्याची  किरणे थंडीत हवेशी वाटायची तिच आता नकोशी वाटायला लागणार कारण प्रत्येक गोष्टींची किंमत ही वेळ आली की मगच कळणार. तसही आपण ठरवलेच असते जे होईल ते होईल बघू पुढच्या पुढे. बरं! मी  स्वतः म्हणत असते हं की आज मध्ये जगले पाहिजे पण तहान लागली की विहीर खोदायची वेळ येईल असा त्याचा अर्थ नाही बरं! जगण कसे दिलखुलास असावे पण आपल्या मुलभूत गरजा भागल्या पाहिजे येवढी तरी काळजी आज मध्ये आपण घेतली पाहिजे. 

"जल है तो कल है" ही ओळ अनेक ठिकाणी आपल्याला वाचायला मिळते. पाण्याचा गैरवापर व्हायला नको जेणेकरून भविष्यात त्रास होणार नाही हे अनेकजण आपल्याला सांगत देखील असतात. पण मानवी  वृत्तीच अशी आहे की स्वार्थी पणाने जगत असते. स्वतःचे भागले की जीवनात कुणाचाही विचार करायची गरज नाही असे अनेकांना वाटते. स्वार्थी नावाचा प्राणी कोणता असेल तर, तो म्हणजे मनुष्यप्राणी म्हणता येईल. आज पर्यंत अनेक ठिकाणी ऐकले होते मनुष्यापेक्षा जनावरांना कुठल्याही गोष्टीची किंमत असते ते मी स्वतः डोळ्याने पाहिले म्हणून माझी लेखणीने पळायला सुरूवात केली.

रोज मला एक आगळावेगळा संदेश देणारे मॅसेज, व्हिडिओ मला माझ्या शाळेचे शिक्षक पाठवीत असतात त्यातून मला खूप काही नवीन शिकायला मिळते. पण आजचा व्हिडिओ बघून मी खरोखर विचारात पडले. बुद्धिवान प्राणी कोण?  माणूस की जनावर? हा प्रश्न माझ्या डोळ्यासमोर अनेक प्रश्न निर्माण करत होता. हे सर्व अचानक नाही घडले बरं! व्हिडिओमध्ये बघत असताना एक जनावर तहान लागली म्हणून पाण्याचा नळ चालू करून पाणी पीत होते हे एकूण काही वेगळेपण वाटणार नाही पण त्या जनावराची तहान भागल्यानंतर नळ चालू न ठेवता तो बंद करणे म्हणजे आहे की नाही आश्चर्याची गोष्ट! ज्या मानवाला बुद्धीमान प्राणी म्हणून ओळखले जाते तोच माणूस तहान भागली की पाण्याचा नळ चालू ठेवून तसाच निघून देखील जातो. मग या मुक्या जनावरांना बघून पडतात की नाही प्रश्न? जनावर कुणाला म्हणावे आणि माणूस कुणाला! हाच मोठा प्रश्नचिन्ह आहे. थेंब थेंब तळे साचे यावर प्रत्येकाचा विश्वास असतो पण थेंब वाचवायला  पुढाकार कुणाचा नसतो.

आता उन्हाळा कुठे सुरू झाला आहे पाणी काय आहे? त्याची जीवनाला किती गरज आहे ते कळायला सुरूवात होईल. कारण पुर्ण पावसाळ्यात कोणी कितीही सांगितले तरी आपला पाण्याचा प्रमाणाच्या बाहेर वापर चालूच असतो कारण तेव्हा सहज मिळते ना..... उन्हाळ्यात अनेक ठिकाणी पाण्याचे प्रमाण कमी होत जाते मग पाणी नाही मिळाले की दुसऱ्यांना दोष देऊन सहज मोकळा होणार प्राणी म्हणजे मनुष्य! उन्हाळ्यात अनेकांना पाण्यासाठी वनवन भटकावे लागते तेव्हा तर कळते पाण्याचे तळे साठवायला हवे. आपण लहानपणापासून भूगोल शिकत आलो त्यामध्ये आपल्याला माहित आहे पृथ्वीतलावर पिण्यायोग्य पाण्याचे प्रमाण फक्त ३% आहे. यावरून पाणी किती जपून वापरायला हवे याचे ठळक कारणे तर आपल्याला दिसतात.

पाण्यासाठी वणवण भटकणाऱ्या महिला आजूबाजूला दिसतात तसेच आपणही उन्हामध्ये गेल्यावर तहानेने व्याकूळ होतो तरी पाण्याचा अतिवापर गरज नसताना होतो तो टाळला की डोक्याला हात लावायची वेळ येत नाही. तहानलेला कावळा सर्वानी पुस्तकात अनुभवलेला आहे तरिही प्रत्यक्षात बघण्याची वेळ यावी असे का वाटावे! हवे तिथे साठवणूक करता आली की जीवनाची सुत्रे बरोबर जुळतात. आता मुक्या प्राण्यांना देखील पाण्याचे महत्त्व समजले आहेत तसेच बुद्धीचा वापर करून मनुष्याने जलसाठा करायला हवा तेव्हा कुठे मनुष्य असल्याचा स्वताला पुरावा देता येईल. जेव्हा झोपलेला मनुष्य झोपेतून जागेल  तेव्हाच कुठे जमिनीवरील प्रत्येक प्राण्याची तहान भागेल. समजदार असूनही समजदारीचा दाखला स्वतःला आपण देवू शकलो नाही तर खरंच मनुष्य म्हणावे का? पाणी अडवा पाणी जिरवा तेव्हाच मनुष्य असल्याचा अभिमान मिरवा.

writer-kaveri-gayake

कावेरी आबासाहेब गायके
भिवगाव, ता. वैजापूर
जि औरंगाबाद