आपल्या आयुष्यात असे अनेक प्रसंग येतात की ज्यामुळे आपण नाराज होतो हतबल होतो. माझ्याच पदरी हे अपयश का यावं? याचा आपण विचार करत बसतो. पण खरे पाहता ते अपयश का आलं, याचा बारकाईने विचार कुणीच करत नाही. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. असे मला वाटते. आपल्याला आलेले अपयश हे नवीन यशाची वाट दाखवणारे स्टेशन असू शकते. जेव्हा पदरी अपयश येतं तेव्हा आपण मनातून खूप निराश झालेला असतो, पण अशावेळी निराश न होता तीच गोष्ट पुन्हा नव्याने जोमात सुरू करायला हवी. पुन्हा एकदा नव्याने गती पकडायला हवी. कदाचित यावरच आपले यश अवलंबून असावे, अपयश आले म्हणून खचून न जाता ती गोष्ट न सोडता आपण ती गोष्ट मिळवण्यासाठी अजून जोरात प्रयत्न करायला हवे. कदाचित आधीपेक्षा जास्त खूप मोठे यश आपल्या नशिबात लिहिलेले असावे म्हणून आपण न डगमगता आयुष्याची वाटचाल चालू ठेवावी.
आपण सतत कार्यशील आणि कृतीशील असायला हवं तरच आपल्याला हवे ते यश आपण संपादित करू शकतो. अन्यथा अपयशाच्या भीतीने आपण प्रयत्न करणेदेखील सोडून देतो, जेव्हा आपण यश गाठण्याच्या दृष्टीने आपले प्रयत्न चालू ठेवतो तेव्हा अपयशाला देखील आपले ऐकावेच लागते, म्हणून कधीही आपल्या कामाचा वेग आणि गती वाढवून जोमाने पुढच्या तयारीला लागावं. मनात कुठल्याही प्रकारचा राग शंका येता कामा नये या गोष्टीसाठी आपण अथक परिश्रम घेतलेले असतात. कदाचित आपण घेतलेले कष्ट कुठेतरी कमी पडत असावेत म्हणून आपल्याला अपयश येत असावं.
आयुष्यात कष्टाशिवाय पर्याय नाही. यशस्वी माणसांच्यामागे त्यांची त्यांच्या अपयशाची खूप मोठी कहाणी किंवा रहस्य दडलेलं असतं. का कोणास ठाऊक ते कायम त्यांच्या अपयशाचीच उदाहरणे सांगत असतात. मला वाटतं त्यांना आलेले वाईट अनुभवच त्यांना कदाचित शिकवत असावेत. एकदा का यश संपादन केले की त्याचा परिणाम आपल्यावर होतो, आपला आत्मविश्वास अधिकाधिक वाढत जातो. हळूहळू एक दिवस असा येतो की यशाच सर्वोत्तम शिखर आपण गाठलेलं असतं जिथून आपल्याला कुणीच खाली खेचू शकत नाही. ते कायम अबाधित राहतं म्हणून 'प्रयत्नांती परमेश्वर' असं म्हणतात. केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे असं का म्हणलं तर आपण आपले प्रयत्न सातत्याने केले पाहिजेत. तरच आपण देखील आपले ध्येय गाठू शकतो. आपण आपली वाटचाल चालू ठेवली आणि प्रयत्न कायम चालू ठेवले की एक ना एक दिवस आपल्याला यश हे येणारच अशी खात्री मला वाटते.
प्रिती भालेराव, पुणे