प्रेम ठरवून करता आलं असतं तर...

मी जगत गेले माझं आयुष्य.. मला हवं तसं.. आणि तू.. माझ्या स्वभावातला प्रत्येक रंग आपलासा केलास..

प्रेम ठरवून करता आलं असतं तर...

प्रेम ठरवून करता आलं असतं तर.. सगळ्याच घटना ठरवून नाहीच घडत कधी.. जिथून तू मला पाहत असशील.. तिथून मी वाटत असेल तुला.. गुन्हेगार.. भावविहीन.. सगळं मान्य आहे मला.. अगदी कुठलाही विरोध न करता..  

मी जगत गेले माझं आयुष्य.. मला हवं तसं.. आणि तू.. माझ्या स्वभावातला प्रत्येक रंग आपलासा केलास.. तुझं अस्तित्व विसरून.. माझ्या नजरेतून स्वतःच जग पाहिलंस.. . तसंच जगत गेलास मला हवं तसं.. कधी कोणती तक्रार केली नाहीस.. 'ब्र' देखील काढला नाहीस.. . तुझ्या होणाऱ्या घुसमटीबद्दल..

येणाऱ्या प्रत्येक परिस्थितीला सामोरं गेलास.. एकटाच चाललास प्रेमाच्या वाटेवर .. वेळ पुढे सरकत गेली..   वाटा कधीच एक नव्हत्या आपल्या.. कारण समांतर चालणाऱ्या रेषा कधीच एकरूप होत नाहीत..   हे निर्विवाद सत्य आहे..   आणि ते तू मान्य केलं होतंस.. मान्य नसताना..

तुझा एकांत.. . तुझ्यासोबतच राहतो.. माणसं आजही आहेत .. . तुझी तुझ्यासोबत.. ऐकलंय, तू पूर्वीसारखा हसत नाही.. . मनापासून.. तुझे डोळे हल्ली फक्त बघतात.. . पूर्वीसारखे बोलत नाहीत.. . काहीतरी हरवल्यासारखे.. तरीही कणखरपणाचा खोटा आव आणणारे.. .

ही तर फक्त एक बाजू आहे.. तुझी.. सर्वांनी माझ्यासमोर मांडलेली.. .'मी चुकीची ठरले'.. अस शांततेत ओरडून सांगणारी.. असेलही मी चुकीची.. . सर्वांच्या नजरेत.. बहुधा तुझ्याही नजरेत.. . 

मी मात्र जपत असते. मौनाचा वसा.. कारण मला 'अव्यक्ततेचा शाप' असावा.. . नाही बांधता आलं भावनांना शब्दात.. . कारण त्यांचं वेगळेपण तुला सहन होणारं नव्हतं.. शांत राहणंच नेहमी पसंत केलं मी.. तुझ्याबद्दलचा आदर कालही होता.. आजही आहे.. आणि सदैव राहील..

खूप 'महान' वाटायला लागतोस तू.. या माणसांच्या जगात.. कोणी करतं का?.. कोणासाठी इतकं?.. मागे वळून पाहताना मी तुझ्या 'ऋणानुबंधात' गुंतत जाते.. अन तुझ्या बद्दलचा आदर दुणावत जातो.. इतका की.. तुझं दैवतीकरण मन स्वीकारत.. पण तुझं 'माझ्या आयुष्यातलं व्यक्तिस्वरूप अस्तित्व' नाकारतं..

येते अशीही वेळ..   जिथे 'खरं प्रेम'.. असा शब्द  उच्चारला जातो.. . मला मात्र तू आठवत जातोस.. माझ्याही नकळत..   तू जपत असतोस..   तुझं प्रेम.. .  आणि मी तुझ्या प्रेमात कधीच न पडलेली.. पण ऋणानुबंधात अडकलेली.. . 

Sneha Kolge

स्नेहा कोळगे, मुंबई