प्रेम सगळं काही नसतं, पण चुकून जर चुकीच्या व्यक्तीवर झालं, तर सगळं काही हिरावून घेतं

प्रेमानं जसं जगावर राज्य करता येते तसं आपलं प्रेम जर आपल्यासोबत असेल तर जगाबरोबर भांडण करायची ही तयारी असते. इतकी सर्वश्रेष्ठ भावना आहे प्रेम.

प्रेम सगळं काही नसतं, पण चुकून जर चुकीच्या व्यक्तीवर झालं, तर सगळं काही हिरावून घेतं

प्रेम ही जगातील सर्वश्रेष्ठ भावना आहे. प्रेमाने जगावर राज्य करता येते, प्रेम ही खूप सुंदर भावना आहे. जीची बरोबरी जगातली कुठलीच गोष्ट करू शकत नाही.

पण हल्लीचं प्रेम जरा बदलेलं  दिसतंय, आजच्या तरुणाईने प्रेमाला चौकटीत बसवलंय, प्रेमाची आपण व्याख्याच नाही करू शकत, कारण प्रत्येकाचं प्रेम वेगळं असतं, प्रेम ही निस्वार्थी भावना आहे. आपण एखाद्या व्यक्तीवर जर प्रेम करत असलो, तरी त्या बदल्यात त्या व्यक्तीनेही आपल्यावर प्रेमच करावं असं मुळीच नाही. प्रेम म्हणजे ती व्यक्ती सुखात राहिली पाहिजे, मग ते कुणीही असू शकतं, आई, बाबा, दादा, ताई, मित्र-मैत्रीण, प्रेयसी-प्रियकर अथवा कुठलंही प्रेमाचं नातं असो, प्रेमाच्या नात्याला बंधन नसतं. एक मुलगी मुलीवर किंवा मुलगा मुलावर प्रेम करू शकतो. कारण प्रेमाचे नियमच नाहीये, जसं आईचं लेकरावर अन् गाईचं वासरावर असतं .

हल्ली प्रेम व्यक्त करायला दिवस निवडले जातात मान्य आहे प्रेम व्यक्त करावं पण दिवस ठवरून गिप्ट द्यावं? दिवस ठवरून फुल द्यावं? खरंतर ज्या दिवशी आपण आपल्या प्रेयसीवरचं किंवा प्रियकरावरचं प्रेम व्यक्त करू त्या दिवसापासून आयुष्यातला प्रत्येक दिवस तितकाच खास असला पाहिजे. आपण एखाद्या व्यक्तीवर प्रेम करत असलो, तरी ती फक्त माझीच असावी असं नाही. ती कुठेही असली तरी खुश असावी, तिचं सुख बघणं म्हणजे प्रेम, आपण प्रेम करत असलेली व्यक्ती आपल्यासोबत बोलत नसली, ती आपल्यापासून दूर असली तरी फरक पडत नाही. कारण प्रेमाचं नातं हृदयातून असतं ज्याला घट्ट विणलेलं असतं. प्रेमात कधी दुरावा येत नसतो. प्रेमात अंतर काहीच करू शकत नाही कारण प्रेमच निरंतर आहे.

आपण प्रेम करत असलेल्या व्यक्तीचा क्षणाचा सहवास जरी लाभला तर त्या आठवणी काळजाच्या गाठीला बांधून आयुष्याचा प्रवास असावा लागतो, आपल्या हृदयात असलेली व्यक्ती तिच्या आयुष्यात खुश आहे ना! ही अचानक आलेली आल्हाददायक गोड आठवण वाऱ्याची झुळूक अंगावरून जावी असा स्पर्श मनाला होणं अन् तो स्पर्श झाल्यावर चेहऱ्यावर आलेलं गोड हसू म्हणजे प्रेम. आपल्याला कधी कधी आयुष्य हसायला लावतं तर तेव्हा आपल्यावर प्रेम करणारी व्यक्ती आपल्या सुखासाठी प्रार्थना करत असते.  प्रेम पहिलं, दुसरं किंवा शेवटचं नसतं. ते एकदाच शेवटचं होतं. त्याला वयाचंही बंधन नसतं कधीही होऊ शकतं, कारण प्रेम प्रेमच असतं.

हल्ली तरुनपिढी प्रेम करते, एखादी प्रेयसी किंवा एखादा प्रियकर असतो. ते प्रेम करतात नंतर लग्नाच्या बंधनातही बांधले जातात पण बरेच लोकं संसार टिकवण्यासाठी अयशस्वी ठरतात. पण याउलट शेवटपर्यंत साथ देणारेही खूप असतात. जे एकमेकांना अर्ध्यावर सोडून जातात, ते प्रेम असतं का? नसतंच आकर्षण संपत तेव्हा नात्याला पूर्णविराम दिला जातो. मग भांडण  होतात एकमेकांना दोष देणं, एकमेकांच्या चुका जगाला सांगणं, एकमेकांबद्दल राग निर्माण होणं, मग व्यसनाच्या आहारी जाऊन आकर्षणाच्या नावाखाली प्रेमाला नाव ठेवणं, मुळात प्रेम नसतंच ते. आकर्षण चकरव्युहासारखं असतं. त्यामुळं माणूस स्वतःच्या आयुष्यातील गुंता वाढवतो.

प्रेमामध्ये भेटवस्तू देणं गरजेचं नसतं कारण कुणाच्या भावना किंवा मन आपण पैशाने विकत नाही घेऊ शकत. आपल्याला आपल्या प्रिय व्यक्तीचा सहवास हवा असतो. न सुटणारी साथ हवी असते, एक असं नातं असावं त्या नात्यामध्ये विश्वास असावा, प्रेम म्हणजे आय लव यु सारखी वाळूवर लिहलेली अक्षर नव्हेत की जी जीवनातल्या वादळामध्ये भरती ओहोटीच्या वेळेस पुसून जातील, आपल्या आयुष्यात कितीही वादळं धडकली तर आपण एका व्यक्तीचा हात पकडू शकतो. अन् त्या व्यक्तीने तितकाच घट्ट आपला हात पकडून ठेवण हा विश्वास म्हणजे प्रेम.

प्रेमानं जसं जगावर राज्य करता येते तसं आपलं प्रेम जर आपल्यासोबत असेल तर जगाबरोबर भांडण करायची ही तयारी असते. इतकी सर्वश्रेष्ठ भावना आहे प्रेम. त्या एका व्यक्तीत एवढी ताकद असते आपल्या सर्व नकारात्मक विचारांचं रूपांतर सकारात्मक विचारात होऊ शकतं, ते विचार, तो आधार आपल्याला जिंकायला प्रेरणा देत असतो,  आपलं प्रेम आपल्यासोबत असलं तर आपण यशस्वी ठरू शकतो, अन् कधी जीवनात आलंच वादळ, आपण मोडून पडलो तर पुन्हा नव्याने आपण सावरू शकतो इतकी ताकद असते. प्रेमात खरंतर साथ देणारी, समजून घेणारी व प्रेम करणारी व्यक्ती जेव्हा आयुष्यात येते, तेव्हाच आपण जिंकलेलो असतो. पण याउलट जर झालं, जीवनसाथी निवडतांना चूक झाली किंवा चुकीची व्यक्ती आपल्या आयुष्यात आली तर त्या चुकीची शिक्षा आपल्याला उर्वरित आयुष्य दुःख भोगावं लागतं, प्रेम सगळं काही नसतं पण चुकून जर चुकीच्या व्यक्तीवर झालं, तर सगळं काही हिरावून घेतं, अन् आयुष्यात हार मानावी लागते. सगळं काही प्रेमावरच चालू आहे.

झाला तर मेळ आहे आयुष्याचा,
चुकला तर खेळ आहे आयुष्याचा.

snehal-laxman-jagtap

स्नेहल लक्ष्मण जगताप 
ता. वैजापूर, जि. औरंगाबाद