माझी ती पहिली मातीची पाटी, ज्यावेळी शाळेची सुरुवात झाली, अक्षर ओळख करतांना शिक्षणाची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. त्यावेळी पाटीवर पेन्सिल फिरवतांना स्वर्णमालेतील पहिले अक्षर 'अ' लिहिले... त्यानंतर आ, इ असं ज्ञ... पर्यंत... तोच माझ्या लेखनाचा पहिला प्रयोग ठरला.
शिक्षण घेत सुसंस्कृत आणि हुशार होण्यासाठी शिकत राहिले. हेच शिक्षण अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून सदैव शैक्षणिक लिहित राहिले... शैक्षणिक लेखनाचे अनेक प्रयोग परीक्षेच्या माध्यमातूनच पूर्ण झाले... आणि मी एक सुशिक्षित व्यक्ती म्हणून नव्याने जन्मास आले.
समाजाच्या जडणघडणीतील यशस्वी व्यक्ती म्हणून मी पेन, पेन्सिल यातून जन्माला जरी आले तरी त्या लेखनाच्या प्रयोगात फक्त शैक्षणिक भावार्थाचा ओलावा होता, ज्याने मी समाजात रुजण्यास समर्थ बनले. पुढे मात्र सामाजिक प्रवास सुरू झाला, त्याक्षणी मात्र समाजातील अनेक विषय पटण्या न पटण्यासारखे होते. त्याक्षणी अनेक समस्यांचा प्रत्यक्ष सामना झाला. त्यातूनच माझ्या मानवी मनाचा गोंधळ इथून सुरू झाला.
सत्य-असत्य, चांगले-वाईट, पाप-पुण्य यांचा काहूर माझे मानसिक असंतुलन करायला लागले, नेमके त्याचक्षणी मानवी जीवन एवढं सहज आणि सोप्प आहे, ते आपणच किती कठीण आणि असह्य करतो, याची मला जाणीव होऊ लागली... आणि मग वाटलं काहीतरी करावं?
मग काय करावं? तर वाटलं लिहावं... असं काहीतरी जे हृदयाला पिळून जाईल, विचारांना भिडून जाईल, मानवी मूल्यांना तपासून पाहिल, नैतिक तत्त्वांना कोरून करून जाईल... आणि हाच तो क्षण ठरला , जिथून पुढे माझ्या लेखनाचा सत्यार्थ प्रयोग ठरला. आज तो "शब्दांकन" या नावाने नावारूपास आला आपणा सगळ्यांच्या साक्षीने आशीर्वादाने मी फार काही मोठी तत्त्ववेत्ता नाही. कवी नाही. लेखक ही नाही. मात्र मी मानवी जीवन प्रवासाची अभ्यासक आहे. वाचक आहे. मारक आहे. तारकही आहे.
मी माझ्या दैनंदिन जीवनामध्ये जे अनुभव घेत आहे. माझ्या सभोवताली जे घडते आहे. त्याच अनुभवांच्या आधारे माझ्या काळजाला कधी वेदना तर कधी सुखाची अनुभूती होते. आणि त्यातूनच मला माझे "शब्दांकन" सुचतात... तेच शब्दांकन मी माझ्या लेखणीने आपणा सर्वांसमोर मांडते. हाच माझ्या लेखनाचा खरा प्रयोग आहे.
ज्यांना पटेल त्यांनी स्वीकारावं... ज्यांना न पटण्यासारखं आहे त्यांनी नाकाराव... हट्ट नाही. अट्टाहास तर मुळीच नाही. मी जाणते आहे, मी समजते आहे. व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती. जीवन प्रवासाचे प्रत्येक व्यक्तीचे अनुभव हे वेगवेगळे असूच शकतात. सुख आणि दुःखाच्या अनुभवाला माझ्या लेखणीचे "शब्दांकन"रुपी भाव आहे. हाच माझ्या लेखनाचा प्रयोग आहे.
सौ. अश्विनी दिलीप भिवगडे,
मु.पो.ता. लाखनी, जि. भंडारा