ती च्या सोबतची ती रात्र...!

आमच्यात हद्दी बाहेर प्रेम झालं होतं त्यातच मला स्थळं यायला सुरुवात झाली होती ,मी बघायचे तो खुप निराश असायचा त्याच्या लिखाणातुन बोलण्यातून जाणवायचं ते कधी कधी खुप भावूक व्हायचा

ती च्या सोबतची ती रात्र...!

बिडवरुन श्री राजाभाऊ सोनवणे व सौ भारतीजी बिडकर या दांपत्या सोबतची धावती अविस्मरणीय भेट उरकुन मी संध्याकाळी चारच्या शिवशाही या बसने पुण्याकडे रवाना झालो गाडी अगदी वातानूकुलीत होती जवळपास सगळ्याच सिटवर माणसे आरुढ झाली होती मी ज्या सिटवर बसलो होतो तिथे बाजूला कुणीच नव्हते कानांच्या पटलाला हेडफोन अर्पण करुन संगिताला ते मौन बहाल केलं आणि नेत्र बंद करुन निद्रेच्या हिशोबाने पडून राहीलो...थोड्या वेळाने जाणवलं जवळ येऊन कुणीतरी बसले आहे एक अर्धवयस्क महिला विराजमान झाल्या होत्या केसांवर निसर्गाने रंगवलेली पांढरी झालर स्पष्ट दिसत होती..मला तेव्हढ्यात एक कॉल आला आणि संगित समाधी भंग झाली समोरुन मित्र विचारत होता अरे त्या गणपती पुळ्याच्या संमेलनाचं काय झालं..मी म्हटलं अरे बारामतीला लग्नं आहे एका मित्राचं त्याचं सुत्रसंचालन मी करणार आहे त्यामुळे मी ते काव्यसंमेलन अटेण्ड नाही करु शकणार प्रवासात आहे नंतर बोलतो आणि कॉल कट झाला..पाऊस नुकताच हजेरी लाऊन गेल्यामुळे थंडीचे वातावरण मी म्हणत होते...गारव्याचं सम्राज्य चांगलच पसरलं होतं...आणि तेव्हढ्यात त्या महिला एकदमच बोलल्या तूम्ही कवी आहात का म्हटलं हो त्या म्हणाल्या नाही म्हणजे तूम्ही आता कॉलवर कुणाशी तर बोलत होताना काव्यसंम्मेलना बद्दल म्हटलं हो अगदीच ते रद्द झालं एक दुसरा कार्यक्रम असल्यामुळे...त्या म्हणाल्या अच्छा असं...मी विचारलं तूम्ही सुद्धा लिहीता का त्यावर गोड हसल्या अगदी आणि म्हणाल्या छे छे मी प्रयत्न केला पण कागदं खुप वाया गेली नाहीच जमले पण मला वाचायला खुप आवडतं मी सारखं काहीना काही वाचत असते आणि कवितेशी माझा खुप जवळचा संबंध आहे...या वाक्यावर मी विचारलं जवळचा संबंध म्हणजे मी नाही समजलो तर त्या म्हणाल्या मी सांगितलं तर विश्वास ठेवाल म्हणजे आजवर फक्त नातेवाईकात हे माहीत आहे आज प्रथम त्या नात्यांच्या पट्टी बाहेर मी हे तुम्हाला शेअर करते कारण तूम्ही कवी आहात म्हणुन त्या आधी मी तुमची परिक्षा घेऊका छोटी  म्हटलं हो चालेल ना काय घ्याल परिक्षा तर म्हणाल्या मी एक शब्द देते त्यावर मला चार ओळी शिघ्र लिहून द्याल म्हटलं हो बोलाना सांगा त्यांनी शब्द दिला स्त्रीमन माझ्याकडे कागद नव्हता म्हटलं मी टाईप करतो थांबा वेट अ सेकंद आणि मी लिहीलं....

स्त्री मन कधी कळले कुणाला
त्याची गती कुणी ओळखली हर एक क्षणाला
प्रेमापुढे शुल्लक वाटे ज्याला तन आणि धन
असं विधात्याने बाईला अर्पण केलेलं ते स्त्रीमन.......

   त्यांनी वाचलं आणि म्हणाल्या बापरे किती जलद लिहीलत सलाम तुमच्या लेखणीला तो पण अशाच कविता लिहायचा म्हटलं तो? तो कोण म्हणे सांगते सगळं सांगते ब-चाच वर्षापुर्वी तो माझ्या आयुष्यात आला असाच उंचापुरा देखणा बोलका हसवणारा रुसलं की मनावणारा हर एक भाव न सांगता ओळखणारा माझ्यासाठी रोज काहीना काही लिहीणारा तेव्हा व्हाट्सअप नव्हते पत्रव्यवहार चालायचा आमच्या गावात तो पहिलाच डॉक्टर म्हणुन आलेला माझे वडील आबांनी त्याला आमची एक खोली किरायाने दिली तो तिथेच रहायचा गावातल्या माणसांचे इलाज करणे तपासणे औषधे देणे सकाळ संध्याकाळ फेरफटका मारणे हा त्याचा नित्यक्रम एकदा मला खुप खोकला येत होता खोकून खोकून माझी अवस्था खुप बेकार झाली होती आबांनी त्याला सांगितले रमेश पोरीला योग्य औषधे द्या फरक पडला पाहीजे खुप खोकलत आहे ती मी त्याच्या समोर बसले होते तो अगदी कमल हसन सारखा दिसत होता त्याने विचारलं कधीपासुन होतय हे म्हटलं झाला आठवडा ते बोलतानाही मी खोकतच होते त्याने एक शुभ्र चपटी गोळी दिली व म्हणाला हि घे आणि हे ग्लासभरुन पाणी पि लगेच गोळी सोबत जसा ग्लास हाती घेतला खोकल्याची उबळ आली आणि धाडकन ग्लास त्याच्या अंगावर बाजूला बसलेल्या अक्का म्हणजे आई मी आईला अक्का म्हणायचे आम्हाला हसुच आवरेना तो ही हसला आणि नजरा नजर झाली डोळे बोलुन गेले कारण प्रेमपर्वाला सुुरुवात झाली होती दोन तीन दिवसात मला फरक पडला मग काय त्याच्याशी बोलण्याचे बहाणेच शोधायची मी..त्याला काहीतरी खायला घेऊन जायचे तो खुप घाबरायचा आबांना, एकदा त्याने मला एक कागद दिला व म्हणाला वाच हे निवांत मी वाचलं त्याने खुप सुंदर कवीता लिहीली होती ति पहिली कविता मग रोज असं काहीना काही लिहायचा तो गावात फेरफटका मारायला जाताना नित्य एकमेकांना हात करायचो आम्ही, एके संध्याकाळी आबा घरी नव्हते अक्का कामात होती आणि मी गेले त्याच्या त्या खोलीत ते पावसाळ्याचे दिवस अंधारुन आले होते आभाळ, आणि जरा जरा हवा ही सुटली होती, मी गेल्यावर तो दचकलाच अरे बापरे या वेळी आबा पाहतील तू जा ईथुन, म्हणाले नाही आबा नाहीत घरी, एकमेकांना पाहतच राहीलो आम्ही खुप थरथरत्या हाताने मी हात पकडला त्याचा, तसा तो कावराबावरा झाला माझं धाडस पाहुन, म्हणाले घाबरु नको कुणी नाही येणार आणि दुस-याच क्षणी मिठीत बुडून गेलो आम्ही, पहिला पुरुषी स्पर्श अंतरी जाणवलेली भावना किती तिक्ष्ण मनावर परिणाम करते हे पहिल्यांदा जाणवलं ,मग त्यानंतर तो ही धाडसी बनला वेळ भेटेल तसं आम्ही भेटायचो, कधी खोलीत ,कधी परसात, कधी माळवदावर, तसं आमच्यात काहीच झालं नाही फक्त भेटायचो मिठीत आणि काय आमच्या काही मनात ही नव्हते, आमच्यात हद्दी बाहेर प्रेम झालं होतं त्यातच मला स्थळं यायला सुरुवात झाली होती ,मी बघायचे तो खुप निराश असायचा त्याच्या लिखाणातुन बोलण्यातून जाणवायचं ते कधी कधी खुप भावूक व्हायचा तो मग मला ही राहवत नसायचं मी त्याला धिर द्यायचे पण तो एकच गोष्ट बोलायचा तुझ्याशिवाय अपुर्ण राहील गं मी अगदी पानझडून गेलेल्या वृक्षासारखा;.प्रत्येक भेटीच्या निरोपाला तो मायेने चेह-यावरुन हात फिरवायचा, त्याच्या स्पर्शात कधीच मला वासना वाईट हेतू जाणवलाच नाही ,नेहमी डोळ्यात ईज्जत दिसली त्याच्या डोळ्यात डोळे घालुन बघण्याची हिम्मतच होत नसे ईतकी बेधूंद ती नजर असायची..मी त्याला म्हणाले मी अक्काला नी आबाला आपल्याबद्दल सांगु? मला खात्री तर नाही पण समजून सांगितलं तर नक्की ऐकतील ते; तो म्हणाला नको जीव घेतील माझा आणि तुझा ही, माझे वडील आबा हे एक बारा गावांमधे आदबीने ओळखले जाणारे ईनामदार, कुणाची टाप नसायची त्यांच्या समोर थांबण्याची, रस्त्याने चालताना किती तरी हात उंचायचे नमस्कारासाठी असे माझे शिस्तप्रिय आबा हे नातं मान्य करतील का हि भिती होती माझ्या मनात, म्हटलं अक्काला सांगते कदाचीत ती आबांना तिच्या भाषेत समजावेल आणि रमेशला न विचारता मी एके रात्री अक्काशी बोलले अक्का माझ्या अंगावरच आली अगं हे काय केलस बकुळ तू ?आपण ईनामदार आहोत !!अगं तो कोण कुठला ?ते काही नाही त्याला ईथुन जायला सांग! नाहीतर अनर्थ होईल बाई ,अगं लाज कशी वाटली नाही तुला? मला नव्हतं वाटलं अक्का असं बोलेल !!मी तर लटलट कापत होते काहीच सुचत नव्हतं दोन दिवस मी रमेशला भेटलेच नाही ,एके रात्री आबा माझ्या खोलीत आले व म्हणाले बकुळ आम्ही ऐकलय ते खरय का? माझे शब्दच बाहेर निघेनात मला आबांचा क्रोध माहीत होता, तरी मी पुर्ण ताकद एकवटून म्हणाले आबा तो माणुस वाईट नाहीऐ मी जाणलय त्याला ,आबा  शांतपणाने म्हणाले ठिक आहे ऊद्याच बोलतो त्याच्या बरोबर तुम्ही विश्रांती घ्या, आबांची ती कमालीची शांतता पाहुन मी अजूनच घाबरले ,हा विषय ईतक्या सहज घेतील ते आबा नव्हेच आणि दुस-या दिवशी आबा सकाळीच कुठेतरी निघून गेले ,अक्काही शांतच होती रमेशची खोली ही बंद होती, संध्याकाळ झाली तरी ना आबांचा पत्ता ना रमेशचा,,,
   रात्री ऊशिरा आबा आले माझ्यावर एकच कटाक्ष टाकला आणि त्यांच्या खोलीत निघून गेले, त्या नजरेत सुढाची भावना दिसली ,मला ते रोजचे आबा वाटलेच नाहीत, त्यावर पाच सहा दिवस निघून गेले मी भयंकर बेचैन होते काही सुचत नव्हते मला विचारु तरी कसं माझा रमेश कुठेय मी माळवदावर जाऊन गावभर नजर फिरवायचे पण तो कुठेच दिसत नसायचा, जड पावलांनी मी खाली यायचे व माझ्या खोलीत जाऊन पुन्हा प्रश्नार्थक विचारात बुडून जायचे...
  रडून रडून शुद्ध हरवून गेली होती बस सगळीकडे रमेश आणि रमेशच दिसत होता, एके सकाळी अक्का आणि आमची मदतनीस गुंफाताई यांचं निसटतं बोलणं मी ऐकलं आणि पायाखालची जमीनच सरकली घराचं छत अंगावर पडतं की काय अशी गत झाली होती, गुंफा म्हणत होती बरं झालं आबांनी ते केलं नाहीतर गेला असता बकुळ ला घेऊन औकात विसरला तो गेला त्याच्या कर्माने...
  संध्याकाळी आबा खोलीत आले आणि म्हणाले बकुळ तुला पाहण्यासाठी पाहुणे येत आहेत दोन दिवसात ऊरकायचं आहे, असं बोलुन जात असताना मी धाडस करुन आबांना विचारलं तुम्ही म्हणाल तसं करेन मी मला एकदाच सांगा रमेश कुठेय ?!बोला आबा सांगाना रमेशचं काय केलं तूम्ही.?..आबांनी माझ्याकडे भयाण क्रोधात पाहीलं आणि विज कडकडावी असं ते बोलत होते ईनामदारांच्या पोरीवर डाव टाकतो काय ?कापुन फेकला जंगलात !!!श्रीपत आबा म्हणतात; मला त्या दिड दमडीच्या वैद्याच्या हातात तुझा हात द्यायचा असता मी अगं सगळीकडे माझी झालेली बदनामी सहन करायची असती मी  ,हं विसरुन जा त्याला आणि तयार हो....
   माहीत नाही कुठून माझ्यात बळ आले आणि मी म्हणाले आबा केवळ तुमच्या ईज्जतीमुळे मी त्याच्या सोबत पळुन नाही गेले मी फक्त प्रेम केलं आबा एका चांगल्या माणसासोबत, त्याने कधीही माझ्या सोबत वेडंवाकडं केलं नाही नेहमी निरागस स्पर्श देत राहीला तो, माझ्याकडून गुन्हा झाला मी अक्कासोबत बोलले, येथेच चुकले मी ,नव्हतं वाटलं माझा निर्णय माझ्या रमेशचा बळी घेईल म्हणुन, प्रेम हरलं आबा तुमच्या प्रतीष्ठे पुढे प्रेम हरलं ,पण माझं ही एक ऐकाच तूम्ही मी लग्नच करणार नाही !!!मी अशीच रहाणार आहे कुमारी किंवा त्याच्या नावाची विधवा.,..आबांची सणसणीत अशी कानावर पडली कि समजलेच नाही मला पुन्हा मारणार तोच अक्का धावली म्हणाली चला ईथुन तिला काही बोलु नका व त्यांना घेऊन गेली...स्थळे यायची जायची मी मात्र पाषाणासारखीच समोर थांबायचे एखाद्या दुकाना समोर ठेवलेल्या वस्तु सारखी..वर्षावर वर्ष गेली आबा गेले अक्का आता म्हातारी झालीये अजूनही रमेशची आठवण ताजी आहे या उरात...व अजूनही कुमारीच आहे मी त्याची विधवाच....माझ्या सोबतच्या सगळ्या मैत्रीणींचे लग्न झाले कुणाकुणाला नातू पणतू आहेत..पण मी अजूनही तशीच आहे.....त्याची एक अशी न संपणारी कवीता जिचं प्रकाशन अजून झालच नाही....
  अश्वत्थाम्याने जसं क्षणा क्षणाचं जिवंत महाभारत पर्व सांगावं तसं ती घडाघडा बोलली पदराने खळखळुन भरलेले डोळे पुसुन माझ्याकडे पाहीलं मी निशब्दच अगदी स्तब्ध तिच्या त्यागापुढे ...म्हणालो काय प्रेम आहे खरच कधी ना वाचण्यात ना ऐकण्यात आलेलं प्रेम...नक्कीच रमेशने हे शब्द ऐकले असणार आणि पुढील जन्मी कडकडून भेटणार तूम्ही ह्या शुभेच्छा देतो मी तुम्हाला...बघता बघता कधी शिक्रापुर आले कळलेच नाही...जाताना त्या म्हणाल्या एक सांगु कविराज म्हणालो बोलाना बिन्धास्त, तुमचे डोळे आणि बोलण्याची शैली अगदी रमेशसारखी वाटली...आमचा जर मुलगा असताना तर तो सेम तुमच्यासारखा असता...माझ्या तोंडातून शब्द गेेले नक्कीच आईसाहेब नक्कीच...तुम्हाला भेटून खुप बरे वाटले कधीही बिडला आलोना तुम्हाला भेटल्याशिवाय जाणार नाही...त्या म्हणाल्या यावर लिहा हं नक्की मी वाट पाहीन आणि काळजी घ्या...डबडबलेल्या डोळ्यांनी मी सिट सोडली खाली उतरलो...आणि त्या त्यागयोगिनीला जगावेगळ्या कुमारीला घेऊन जाणा-या त्या शिवशाही बसच्या पाठमो-या आकृतीला कधी सलामी देण्यासाठी हात उंचावला हे कळलेच नाही.
  Gajanan Ufade  
गजानन उफाडे, चाकण, पुणे