प्रत्येकाच्या आयुष्यात एक निस्वार्थी मार्गदर्शक असावा

कोणत्याही व्यक्तीच्या जीवनात मार्गदर्शन आणि पाठिंबा देणारी व्यक्ती ही अनमोल ठरते. अनेकवेळा आपल्या आयुष्यात असे बरेच प्रसंग येतात जेव्हा आपल्याला नेमक काय करावं, हे समजत नाही.

प्रत्येकाच्या आयुष्यात एक निस्वार्थी मार्गदर्शक असावा

आपल्याला आपल्या आयुष्यात अनेक व्यक्ती भेटतात. परंतु त्यातील एखादीच व्यक्ती अशी असते की ती व्यक्ती आपल्या खूप जवळची होऊन जाते. त्या व्यक्तीशी असणारी आपली ओळख ही केवळ ओळख नसून त्याचे रुपांतर एका सुंदर नात्यांमध्ये झालेले असते.

गर्दीत माणसांच्या एक माणूस असा ही असावा जे आपल्या हक्काचा असेल, डोळे झाकून त्याला आपल्या आयुष्यातील सर्व गोष्टी हक्काने सांगता याव्यात, हक्काने त्याच्यावर ओरडता यावं, रागवता यावं, रुसता यावं, वेळप्रसंगी त्या व्यक्तीची कानउघडणी देखील करता यावी. असतात ना! अशा काही व्यक्ती ज्यांना मनापासून आपली प्रगती झालेली पाहायचे असते. आपल्या यशासाठी ते काहीही करण्यास तयार असतात. आपल्या आनंदामध्येच ते त्यांचा आनंद मानतात. जवळ नसले तरी दूर राहूनही आपल्याला मानसिक सपोर्ट करतात, आधार देतात, पुढे जाण्यासाठी आपल्याला चालना देतात. 

आयुष्यात आपल्याला अनेक व्यक्ती भेटतील पण प्रत्येकाची आपल्याविषयी असणारी भावना ही केवळ शुद्धच असते, असे नाही बरं का! ते म्हणतात ना, पोटात एक आणि ओठात एक असे अनेक व्यक्ती आपल्याला भेटत असतात. काही माणसं जी फक्त तोंडावर कामापुरते आपल्याशी गोड बोलतात, आणि त्यांच काम झालं, त्यांचा मतलब त्यांनी साधला की आपल्या मागे नावे ठेवत असतात. असो ते म्हणतात ना, निंदकाचे घर असावे शेजारी. अशा व्यक्तींना कदाचित कळत नसेल की जरी त्यांनी निंदा केली तरी समोरच्या व्यक्तीवर त्याचा काहीच परिणाम होत नसतो. त्या गोष्टींकडे लक्ष न देता आपण आपली प्रगती करत रहावी असं मला मनापासून वाटतं. 

एखादी व्यक्ती आपल्याशी अतिशय नम्रपणे, प्रेमाने, आदराने बोलत असेल त्या व्यक्तीच्या मनात आपल्या विषयी प्रचंड आदर असतो. आपल्या सुखासाठी आणि आनंदासाठी ती व्यक्ती काहीही करू शकते. कोणत्याही व्यक्तीला आयुष्यात पुढे जाण्यासाठी एका भरगच्च पाठिंब्याची आवश्यकता असते आणि अशी ती व्यक्ती आपल्या आयुष्यात जेव्हा येते तेव्हा आपले आयुष्यच बदलून जाते. त्या व्यक्तीने दिलेला पाठिंबा आपल्यासाठी बहुमोल ठरतो आणि आपल्याला प्रगतीची नवीन दिशा मिळते. कोणत्याही व्यक्तीच्या जीवनात मार्गदर्शन आणि पाठिंबा देणारी व्यक्ती ही अनमोल ठरते. अनेकवेळा आपल्या आयुष्यात असे बरेच प्रसंग येतात जेव्हा आपल्याला नेमक काय करावं, हे समजत नाही. अशावेळी देवदूताप्रमाणे जर एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यात आली तर आपल्यातील कलागुणांना देखील वाव मिळतो. तसेच त्या व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली आपण अशक्य गोष्टीही साध्य करू शकतो, असं माझं स्पष्ट मत आहे.

प्रिती सुरज भालेराव, पुणे