आदर्श शिक्षिका, आदर्श मार्गदर्शिका : जयश्री औताडे

कोविडकाळात गट अध्यापन करत असताना औताडे मॅडमने मुलांची घरची हलाखीची परिस्थिती पाहून त्यांना मोफत अन्नधान्य वाटप देखील केले.

आदर्श शिक्षिका, आदर्श मार्गदर्शिका : जयश्री औताडे

गु शब्दस्तु अंधकारः स्यात् रु शब्दस्तन्निरोधकः।
   अंधकारनिरोधत्वात् गुरु इति अभिधीयते ।।

‘गु’कार म्हणजे अज्ञानरूपी अंधकार आणि ‘रु’कार म्हणजे त्या अंधकाराचा नाश करणारे ज्ञानरूपी तेज; म्हणून गुरु म्हणजे अज्ञानरूपी अंधकार घालविणारा एक यज्ञच. असे गुरूरूपी काही माणसं आयुष्यात येतात. आणि आयुष्यातील अंधकार दूर करतात. अशीच एक व्यक्ती म्हणजे आदरणीय श्रीमती. जयश्री औताडे मॅडम. 

श्रीमती. जयश्री औताडे मॅडम शिक्षणक्षेत्रात २१ जुलै २००९ पासून कार्यरत आहेत. त्यांच्या शैक्षणिक कार्याची सुरवात परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यात झाली. सध्या त्या गंगाखेड येथे १६ जून २०१६ पासून जि.प.कें. कन्या प्राथमिक शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. त्या विद्यार्थ्यीप्रिय शिक्षिका असून एक उत्तम कवयित्री देखील आहेत. तसेच त्या एक दर्जेदार स्तंभलेखिका पण आहेत. त्यांचे "अभागिनी" हे पहिले कवितासंग्रहाचे पुस्तक देखील प्रकाशित झाले आहे. त्यांचा आणि माझा परिचय हा अभागिणी कवितासंग्रहामुळेच झाला. त्या मराठी विषयाच्या अभ्यासक असून त्यांचे लेख, कविता या वास्तवाला भिडणाऱ्या असतात. दहा पुस्तके प्रकाशित करण्याऐवजी एकच पुस्तक प्रकाशित करावं. पण त्याला वास्तवाचा स्पर्श असावा. मॅडमचे स्तंभलेखन हे दर्जेदार, वास्तवस्पर्शी आणि नेहमीच काहीतरी शिकवण देणारे असते. समाजातील वास्तव मला मॅडमच्या लेखनामधून नेहमीच दिसतं. 

मी तसं साहित्यक्षेत्रात २००८ पासून कार्यरत आहे. परंतु दर्जेदार स्तंभलेख कसे लिहावे हे मी मॅडमकडून शिकलो. मी लेख लिहिल्यानंतर मॅडम सांगायच्या बाबासाहेब हे वाक्य असं नाही. तसं पाहीजे होतं. त्यात ही सुधारणा पाहीजे होती. तिथे असे वाक्य असते तर लेख वेगळा झाला असता. अशाप्रकारे मॅडम मला नेहमीच मार्गदर्शन करत असतात. मॅडममुळेच मी वेगवेगळे विषय लिहू लागलो. ते विषय वर्तमानपत्रातून प्रसिद्ध होऊ लागल्यामुळे प्रसिद्धीही मिळू लागले. आपण म्हणतो युवावर्ग वाचत नाही. पण आपण जर युवकांना मार्गदर्शन होईल असे लिहिले तर युवक नक्कीच वाचतात. असा माझा स्वानुभाव आहे. माझ्या लेखनामुळे युवावर्ग माझ्याकडे वाचक म्हणून वळू लागला. ही माझ्यासाठी खुप महत्वाची बाब ठरली.

तसे पाहता प्रत्यक्ष भेटिचा योग तर आतापर्यंत आलेला नाही. परंतु इंटरनेटच्या जमान्यात मॅडमचे कार्य मी नेहमीच बघत असतो. शालेय परिसरात ,सार्वजनिक ठिकाणी अनेक मंदिर परिसरात त्यांनी विविध वृक्षाची भेट देऊन एक पर्यावरणप्रेमी म्हणून ओळख निर्माण केली आहे. सामाजिक, शैक्षणिक, तसेच पर्यावरण बाबतीत त्यांचे कार्य वाखानण्याजोगे आहे. मॅडमच्या  आदर्श कार्याची पावती म्हणजे सन २०१० पासून ते आजपर्यंत त्यांना मिळालेले विविध १२ आदर्श पुरस्कार होय.

आदर्श शिक्षिका जयश्री औताडे यांनी लावले शाळेत पन्नास तुळशीचे रोपे

कोविडकाळात गट अध्यापन करत असताना औताडे मॅडमने मुलांची घरची हलाखीची परिस्थिती पाहून त्यांना मोफत अन्नधान्य वाटप देखील केले. तसेच पूरग्रस्त विभागाला त्यांनी पैसे आणि विविध जीवनावश्यक वस्तूंच्या स्वरूपात मदत पाठवण्यात ही सहभाग घेतलेला होता.

तसेच आदरणीय जयश्री औताडे, जयाबाई मुंडे व माझ्या संकल्पनेतून नवोदित साहित्यिकांना लेखक लेखिकेंना न्याय मिळावा, मार्गदर्शन मिळावे म्हणून एका साहित्यपीठाची निर्मिती झाली. ती म्हणजे 'न्याय देणारा संवाद' या साहित्यपीठाच्या माध्यमातून अनेक लेखिकेंना एक हक्काचे व्यासपीठ मिळाले, यासमुहात पूर्ण भारतातील वेगवेगळ्या भागातील मराठी लेखिका लेखन करू लागल्या. त्यात अनेकांचे लेख, कथा, पत्र, कविता व इतर साहित्य दैनिकाच्या संपादकीय पानावर छापून येऊ लागले. त्यात प्रामुख्याने कु. कावेरी गायके, प्रिती भालेराव, पूनम बेडसे, कांचन चव्हाण, संगीता थोरात, नीता भामरे, कविता चौधरी, सुशिला इंगळे, सरला मोते, पूनम सुलाने, मीना राजपूत, सोनाली रसाळ, कु. कोमल डिगे, स्वाती जाधव, सुनीता परदेशी, स्नेहा कोळगे, मनीषा मालपूरे, पल्लवी पवार, सरिता भांड, स्नेहल जगताप, अंजली बांते यांचा नामोल्लेख करणे आवश्यक आहे. 

मॅडमचे असेच मार्गदर्शन मला नेहमीच मिळत राहो. आणि नवनवीन उपक्रम माझ्या हातून घडत राहो, हीच आज शिक्षणदिनी मॅडमकडून अपेक्षा. शिक्षणक्षेत्रात आदर्श कार्य करणाऱ्या, आणि मला वेळोवेळी मार्गदर्शन करणाऱ्या श्रीमती. जयश्री औताडे  मॅडमला शिक्षक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.

बाबा चन्ने, धोंदलगाव,
ता. वैजापूर
९६६५६३६३०३.