मी ऊसतोड कामगार

जया विनायक घुगे - मुंडे लिखित मराठी कविता मी ऊसतोड कामगार

मी ऊसतोड कामगार

भरला माझा संसार
निघालो मी जगायला.
डोईवरचा कर्जाचा डोंगर 
हसत - हसत सावरायला...

चिलें - पिले माघ ठेवली
अक्षर- अक्षर गिरवायला,
आमच्यावाणी नको त्यांचे
आयुष्याचे गणित चुकवायला...

पोटासाठी निघालो फडात 
कारभारीन गतुड बांधायला,
जवारी, तांदुळ, तेल नि मिठ
सरपण चुलीत घालायला...

दिवाळीचा सण तोंडावर
हातात कोयत्याच्या फुलझाड,
उसाची मोळी डोक्यावर घेऊन
सुखाचा क्षण पापणीआड...

हातावरच्या संसारात
तरीही हसून राबतो,
ऊसतोड कामगार मी
जीवनाचा आनंद घेतो...

नशिबाने केली थट्टा
तरी मी डगमगत नाही,
लेकरांच्या उज्ज्वल भविष्याची
स्वप्न उघड्या डोळ्यांनी पाही...

भरला जरी संसार माझा
मी अजून जिवंत आहे,
उसाच्या फडासंग नात
कष्टाला खंबीर आहे...

Jaya ghuge munde
जया विनायक घुगे - मुंडे
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षिका,
गावंदरा.
परळी वैजनाथ, बीड