कविता Marathi Kavita, Poem

सौ. पूनम सुलाने लिखित मराठी कविता यामध्ये कविता या शब्दाचा अर्थ कवितेतून सांगितलेला आहे

कविता Marathi Kavita, Poem

शब्द शब्दाला जोडून नाही
तर अनुभवाने बनते ती कविता
एका हृदयातून निघालेली
दुसऱ्या हृदयापर्यंत पोहोचते ती कविता

सहज नजर फिरविताना
डोळ्यात भरते ती कविता
चौफेर पेटलेल्या वनव्यात
गारवा देते ती कविता

अन्यायाच्या विरोधात जाऊन
 न्याय मिळवून देते ती कविता
स्वप्नांच्या पलीकडे जाऊन
एक नवे विश्व शोधते ती कविता

अर्थाचा अनर्थ न करता
सहज समजते ती कविता
शुष्क झालेल्या जीवनाला
एक नवी उभारी देते ती कविता

विस्कळीत झालेल्या विचारांना
एकत्र बांधते ती कविता
जोडुनी शब्दरूपी फुलांना
विजयमाला बनते ती कविता

poonam-sulane

पुनम सुलाने, जालना