तुकोबा मराठी कविता Marathi Kavita, Poem

बाबा चन्ने लिखीत संत तुकाराम महाराजांची वास्तव परिस्थिती मांडणारी कविता "तुकोबा"

तुकोबा मराठी कविता Marathi Kavita, Poem

तुकोबा,
आम्ही तुम्हाला 
मंदिरात बंदिस्त केले
त्यातच खरी गल्लत झाली

तुकोबा,
तुम्हाला एक माणूस म्हणून, 
प्रत्येक घराघरात पोहचविण्यास 
कुठेतरी आम्ही खरच कमी पडलो

तुमच्या गाथ्याचे आम्ही 
फक्त पारायणच केले,
तो समजून घेण्यास आम्ही 
खरच कमी पडलो

तुमच्या पाच-पंचवीस 
अभंगाशिवाय, 
किर्तनकार बुवाही कधी 
पुढे बोललेच नाही

चारचाकीत फिरणाऱ्या अन् 
सर्व सुखसोयी उपभोगणाऱ्या बुवांनी 
अनवानी फिरणाऱ्या तुकोबांच्या
पाऊलखुणा कधी जपल्याच नाही

आम्ही जातो आमुच्या गावा 
आमुचा राम राम घ्यावा 
हेच आम्हाला बुवांनी 
किर्तनातून समजविले 

तुकोबा, अगदी तुम्ही म्हणता तसच,
लावूनि कोलित। माझा करितील घात।।
या तुमच्या वेदनेवरच 
आम्ही पडदा टाकला...

खरच तुकोबा,
आम्ही कपाळ करंटेच,
तुमच्या वेदना, आक्रोश, विद्रोह
आम्हाला कधी ऐकूच आला नाही.

Baba Channe

बाबा चन्ने, धोंदलगाव,
ता. वैजापूर