तू... मराठी कविता

सौ. सारिका बद्दे लिखित मराठी कविता तू...

तू... मराठी कविता

मळू दे क्षितिज,
गोठू दे चाहूल
गळू दे पाऊल..अभ्रकाचे 

ढवळू दे रंग
वाऱ्याचे अभंग
ओसांडू दे गंध..सुमनांचा 

मिटवू दे पंख
घरटी बोलू दे
पापणी खुलु दे..निशिगंधा

फुलू दे सांजोळी
ओली थरथर
तम अंगभर...पसरू दे

ढळू दे पाकळ्या
भ्रमर गुंतू दे
वाट अडवू दे..सावल्यांना

वेडावू दे चन्द्र
तारका मोहू दे 
मग तू साद दे..माझ्या कानी

Sarika badde

सौ. सारिका बद्दे, छत्रपती संभाजीनगर