वैष्णवी विठ्ठल मनाळ लिखित तसेच छत्रपती संभाजीनगर येथील 'वर्डलॅन्ड पब्लिशिंग हाऊस'ने प्रकाशित केलेला 'मी अजून कोसळलेले नाही' हा काव्यसंग्रह म्हणजे मानवी मनात सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याचे माध्यमच होय. प्रत्येक कविता वाचत असतांना मानवी मनाला झालेले दुःख आणि त्या दुःखातून बाहेर कसं पडावं? हे जाणवतं. तसं बघायला गेलं तर साहित्य प्रकारातील अवघड प्रकार म्हणजे कविता लिहणं, असं मला वाटतं. कारण कमीत कमी शब्दांत हिमालयासारख्या विषयाला हात घालण्याचे काम कवी करत असतो. कमी शब्दांत कविता कशी लिहावी, यावरून कवीची प्रतिभा समाजासमोर येत असते.
'मी अजून कोसळलेले नाही' हा कवयित्री वैष्णवी विठ्ठल मनाळ यांचा पहिलाच कवितासंग्रह असून त्यांनी संग्रहात 'दुःख' हा विषय समोर ठेऊन त्याच दुःखाला ठणकावून सांगितले आहे, तू कितीही माझा पाठलाग केला, मला कितीही त्रास दिला तरी मी कोसळणारी नाही. मी हार माणणारी नाही. वैष्णवीला एवढ्या कमी वयात दुःख कळणं, हे मला खरच खूप विशेष वाटतं.
'मी अजून कोसळलेले नाही' हा काव्यसंग्रह म्हणजे प्रत्येक माणसाला धैर्य, जिद्द प्रदान करणारी जणू काही 'शब्द सरिताच' आहे. काव्यसंग्रह वाचता वाचता खडकाळ माळरानी मळा फुलवण्याचं अप्रतिम सामर्थ्य या रचनेतून पाझरत जातं. वैष्णवी मनाळ या नवोदित कवयित्री नसून एक अनुभवसंपन्न कवयित्री आहेत. त्यांच्या कवितेचा एकेक शब्द वाचत असतांना एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात आली, कितीही दुःख असलं, कितीही वेदना असल्या तरी फिनिक्स पक्षासारखी आपलेला भरारी घेता-घेता जगाला एक संदेश देता आला पाहीजे, 'मी अजून कोसळलेले नाही.'
कवीवर्य फ.मुं. शिंदे एका ठिकाणी म्हणतात, "कविता निर्मितीचे मुळच वेदनेत असते." वेदना ही कवितेची जन्मोजन्मीची प्राणसखी असते, यात दुमत नाही. कवयित्री वैष्णवी मनाळ यांच्या अनेक कविता वेदनेचे प्रतिनिधित्व करतांना आपल्याला दिसतात. वेदनेतून मुक्त होण्याचं बळ देखील कविताच प्रदान करतात. असे म्हणतात, ज्याला वेदना कळाल्या त्याला वेद कळाले, ज्याला दुःख कळाले त्याला देव कळाला. एवढ्या कमी वयात वैष्णवीला वेदना कळाल्या, दुःख कळाले, ही खरच खूप श्रेष्ठ बाब म्हणावी लागेल.
काव्यसंग्रहात एकूण २९ कविता असून सर्वच कविता वास्तविक असून दुःखातून सकारात्मक विचाराची पेरणी करतात. त्यापैकी मी संकटांना आव्हान करते, माझ्या वास्तवातील आई बाप, नियती तू कलह ऐक माझा, रे जीवना, भावना भिजवलेला पाऊस, मी अजून कोसळलेले नाही, आयुष्याच्या वाटेवर, आता जिंकायचंय, अलिप्त रहावं, संदर्भ माझ्या भावनांचा, स्त्री... समाज... संस्कृती, या कविता मन स्तब्ध करतात. एखादी साहित्यकृती जर अभ्यासकाचे मन स्तब्ध करत असेल तर ती साहित्यकृती साहित्य वर्तुळात अव्वल दर्जाची ठरते, असे मला वाटते. वैष्णवी विठ्ठल मनाळ या भविष्यात साहित्यक्षेत्रात खूप मोठं नाव कमावतील असे मला मनापासून वाटते.
वैष्णवी विठ्ठल मनाळ या गंगापूर तालुक्यातील वाहेगाव या गावातील शेतकरी कुटुंबातील असून त्या मराठवाड्यातील एक नामवंत व्याख्यात्या देखील आहेत. शेतकऱ्याचे दुःख, समाजाचे दुःख त्यांनी बघितलेले आहे, अनुभवलेले आहेत. तेच त्यांच्या व्याख्यानातही उतरतं, लेखनातूनही पाझरतं, अन् दुःखातून मार्ग काढायला देखील भाग पाडतं. "मी अजून कोसळलेले नाही" हा काव्यसंग्रह समाजातील अनेक दुःखीतांसाठी नवसंजीवनी ठरेल, यात तीळमात्र शंका नाही.
बाबा चन्ने,
(ग्रामीण साहित्यिक)
मु.पो. धोंदलगाव, ता. वैजापूर