कवियित्री पूनम सुलाने यांची भव्या फाउंडेशन सामाजिक संस्था जयपुर यांच्यातर्फे राष्ट्र गौरव पुरस्कार 2022 साठी निवड करण्यात आली आहे. हा पुरस्कार त्यांना मार्च महिन्यामध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय मैत्री संमेलन 2022 जयपुर येथे देण्यात येणार आहे.
पुनम सुलाने ह्या जालना जिल्ह्यातील जाफराबाद मधील गोकुळवाडी या छोट्याशा गावातल्या असून सध्या राहण्याचे ठिकाण हैदराबाद आहे. पुनम सुलाने यांची साहित्य क्षेत्रातील ओळख आता फक्त महाराष्ट्रापुरती मर्यादित राहिलेली नसून देशातील अनेक राज्यातील प्रसिद्ध हिंदी वृत्तपत्रातून त्यांच्या कविता प्रकाशित होत असतात तसेच USA च्या साप्ताहिक पत्रिकेतून देखील त्यांच्या या अनेक कविता प्रकाशित झाल्या आहे.
पुनम सुलाने यांना आतापर्यंत ऑनलाइन कार्यक्रमाच्या माध्यमातून 50 पेक्षा जास्त पुरस्कार प्राप्त असून त्यापैकी 2021 मध्ये विक्रमशिला हिंदी विद्यापीठ गांधिनगर भागलपुर (बिहार) प्रादेशिक शाखा महाराष्ट्र यांच्यातर्फे हिंदी साहित्यात विशेष कामगिरीबद्दल कविरत्न या पुरस्काराने पुरस्कृत करण्यात आलेले आहे. त्याच बरोबर कलानगरी वेल्फेअर सोसायटी अमरावती द्वारा देखील कविरत्न पुरस्कार 2021 त्यांना प्राप्त झाले असून त्यांच्या साहित्य क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीची दखल घेऊन त्यांची निवड तेजभूषण ज्ञानदीप राज्यस्तरीय पुरस्कारासाठी करण्यात आली होती..
त्याचबरोबर आता राष्ट्रीय स्तराचे राष्ट्र गौरव आवार्ड या पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल सर्व स्तरातून चर्चा होत आहे. सुलाने यांची दोन पुस्तके प्रकाशित झाली असून येणाऱ्या काही दिवसात त्यांचा मराठी कविता संग्रह प्रकाशित होणार आहे त्याच बरोबर पुनम सुलाने ह्या विविध ऑनलाईन साहित्यिक कार्यक्रमात नेहमी भाग घेत असतात. विविध दिवाळी अंकातून लेखन तसेच मासिक पत्रिकेत देखील त्यांचे लेख प्रसिद्ध होत असतात. सोशल मीडिया वरती त्यांच्या हिंदी मराठी कविता, लेख, चारोळी यांना वाचकांचा प्रचंड प्रतिसाद नेहमीच मिळत असतो. राष्ट्र गौरव पुरस्कार 2022 या राष्ट्रीय पुरस्काराची निवड झाल्याबद्दल अनेक मान्यवर साहित्यिकांनी, सर्व मित्र परिवारांनी तसेच समाजातील अनेक प्रतिष्ठित व्यक्तींनी पुनम सुलाने यांचे अभिनंदन करून पुढील साहित्य वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.