साहित्य क्षेत्रात वय कधीच महत्वाचे नसते, महत्त्वाचा असतो तो अनुभव. याचा प्रत्येय मला आला. म्हणतात ना, पुताचे पाय पाळण्यात दिसतात हे अगदी रास्त आहे. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे माझी मानसकन्या कु. कावेरी आबासाहेब गायके हे होय. ही विसीतील तरूणी वैजापूर तालुक्यातील भीवगाव या छोट्याशा खेडेगावातील. गाव तसं पाहिलं तर खुपच छोटं. त्यातही कावेरी शेतकऱ्याची मुलगी असल्यामुळे राहायला शेतवस्तीवर. तीचे शिक्षण भिवगावजवळील परसोडा या गावी जि. प. शाळेत झाले. शाळेचा आणि वस्तीचा अंतर चार किलोमीटरचा. आता सध्या ती लासूर ता. गंगापूर येथे बी.एस्सी करत आहे. अशा खडतर परिस्थितीत कावेरीचे शिक्षण सुरू आहे. कावेरी शेतकऱ्याची मुलगी असल्याचा नेहमीच अभिमान बाळगते. शेतकरी पैशाने कधीच श्रीमंत नसतो. परंतू मनाने श्रीमंत त्याच्याइतका दुसरा कोणीच नसतो. हे तीचं वाक्य मनात घर करून जाते.
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे काय प्रश्न असतात. पीक आले तर भाव नसतो, भाव असला की पीक नसते. निसर्गाचा लसरीपणा, ग्रामीण भागातील रस्त्यांचे झालेले वाटोळे हे कावेरीने अगदी जवळून पाहीलेले आहे. अनुभवलेले आहे. म्हणून तिच्या लेखनातून ग्रामीण भागाचे प्रश्न प्रामुख्याने जाणवतात. 'कोरोनाचा शेतमालावर झालेला परिणाम' हा कावेरीचा लेख अनेकांचे डोळे ओले करून गेला. शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्याकरिता शेतकऱ्यांचाच मुलगा किंवा मुलगी पाहीजे असते तरच त्या प्रश्नाला न्याय मिळू शकतो. नाहीतर काही जन वातानुकूलित कार्यालयात बसून शेतकऱ्यांविषयी लिहितात. तर ते कधीच वाचकाच्या ह्रदयाला भिडू शकत नाही. ह्रदयाला भिडणारं लेखन करणारा हा शेतकऱ्याच्याच कुटूंबातील असला पाहिजे तरच ते लेखन ह्रदयाला भिडते. उदाहरण द्यायचे झाले तर जेष्ठ ग्रामीण साहित्यिक डाॅ. भीमराव वाघचौरे यांची "रानखळगी" ही कादंबरी वाचकाचे डोळे ओले करते. तर का? डाॅ. वाघचौरे यांचे तरूणपण १९७२ च्या दुष्काळात होरपळून निघाले. आणि त्यांच्या त्या होरपळीचे प्रतिबिंब त्यांच्या साहित्यात उमटले. त्याचप्रमाणे कावेरीचे बालपण गरीबीत गेले आणि कोरोनात शेतकऱ्यांची झालेली दुरावस्था तिने जवळून पाहिली. म्हणून त्या अवस्थेचे प्रतिबिंब तिच्या लेखनातून उमटते. हेच कावेरीच्या लेखनाचे वैशिष्ट्ये म्हणावे लागेल.
कावेरी काव्यलेखन पण खुप प्रभावीपणे करत असते. अलिकडेच तिची 'भेगाळलेली मने' या कवितेने तर सोशल मिडीयावर अगदी धुमाकूळ घातलेला आहे. ती कवितेत लिहिते,
नात्यात जरासे कमी
होत चालले शब्दांचे वाहने,
मग कसे तुुप्त होईल
हे भेगाळलेली मने...
म्हणजे ती सध्या चाललेल्या 'चायनीज नात्याचा' बरोबर आणि नेमकेपणाने वेध घेते हे विशेष. 'चायनीज' हा शब्दप्रयोग मी यासाठी केला की सध्या कुठलेच नाते हे परिपक्व राहिलेले नाही. कोण कोणाला कधी धोका देईल आणि नातं कधी संपुष्टात येईल, याचा अजिबात नेम नाही. म्हणून कावेरी त्या नात्यांचा बरोबर वेध घेते. तसेच ती 'कोणासाठी तरी देव बना', या कवितेत लिहिते,
शाब्दिक आधार देऊ आपण
मोडणार नाही समोरच्याचा कणा,
माणुसकीचे दर्शन घडवत
कोणासाठी तरी देव बना...
वरील काव्यपंक्ती वाचल्यानंतर एक लक्षात येते, कोणी दुःखी, कष्टी असेल तर त्याला सकारात्मक शाब्दिक आधार द्यायला पाहीजे. जेणेकरून त्याचे जीवन सुखकर होईल. प्रत्येक माणसाने एका माणसाला जरी आधार दिला तर आपोआपच माणूसकीचे दर्शन घडेल. आणि आपल्याला देवत्व प्राप्त व्हायला वेळ लागणार नाही.
तसेच सीमेवर लढणाऱ्या सैनिकाची भावना काय असतात. त्या भावना 'भुमीपूत्र' या कवितेतून कावेरी आपल्या शब्दांत व्यक्त करते,
परिवाराची आठवण येऊन
भावनेचा बांध फुटायला येतो,
पुन्हा नव्याने उभे राहायला
भारत मातेचे नाव घेतो...
अशाप्रकारे कावेरी गायके हिचे लेखन हे वास्तव मांडणारे आहे. हे मराठी साहित्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण आहे.
वैजापूर तालुक्याला संत कवयित्री बहीनाबाई पाठक, जेष्ठ साहित्यिक रा.र. बोराडे, डाॅ. भीमराव वाघचौरे, धोंडिरामसिंह राजपूत, कथाकार उत्तम बावस्कर, ना. वि. पटारे, ग्रामीण कवी अशोक गायकवाड, या साहित्यिकांचा अनमोल वारसा लाभलेला असून तोच साहित्याचा वारसा कावेरी पुढे नेत आहे. ही माझ्या दृष्टीने महत्वाची बाब आहे. भविष्यात कावेरी गायके महाराष्ट्राच्या साहित्य क्षेत्रातील एक महत्वाचे नाव असेल. असा मला पूर्ण विश्वास आहे.
संत तुकाराम महाराज आपल्या एका अभंगात लिहितात,
आपुलिया हिता जो असे जागता ।
धन्य माता पिता तयाचिया ।। १ ।।
कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक ।
तयाचा हरिख वाटे देवा ॥ २ ॥
वरील संत तुकाराम महाराजांच्या दोन ओळी वाचल्यानंतर कावेरीच्या आई-वडिलांची किती पुण्याई असेल. म्हणून त्यांच्या पोटी कावेरी नावाचे रत्न जन्माला आले. असे मला मनापासून वाटते. आज कावेरीचा जन्मदिवस त्यानिमीत्ताने तिला माझ्याकडून मनःपूर्वक शुभेच्छा.
बाबा चन्ने, धोंदलगाव,
ता. वैजापूर, जि. औरंगाबाद