'मनामनातील बाबाजी' साकारतांना...

ग्रामीण साहित्यकार बाबाजी चन्ने यांचा वाढदिवस साहित्यिक समुहावर मोठ्या उत्साहाने साजरा झाला.  नवोदीत कवींसह अनेक अनुभवी कवींनी बाबाजींच्या जन्मोत्सवात स्वलिखीत कविता सादर केली. ज्यावेळी मी या कविता वाचल्या तेव्हा या कविता मनाला खूप भावल्या.

'मनामनातील बाबाजी' साकारतांना...

'मनामनातील बाबाजी' हे पुस्तक तयार करण्याच्या पाठीमागे एक उद्देश पण होता. तो म्हणजे या स्पर्धेमध्ये अनेक नामांकीत सारस्वतकारांनी अष्टाक्षरी या प्रकारात केलेल्या अप्रतिम अशा रचना जो कोणी वाचेल त्याच्या मनाला भावल्याशिवाय राहणार नाहीतच शिवाय या पुस्तकाची प्रस्तावना जगदीश संसारे सरांनी अगदी भावपूर्वक लिहिली असून, प्रसिद्ध चित्रकार शशांक पाटील सर यांनी बनवलेलं या पुस्तकाचे मुखपृष्ठही सगळ्यांच्याच मनात बसेल असेच आहे. तसेच बाबाजीसारखं अद्भुत व्यक्तिमत्व रेखाटताना अनेक साहित्यिकांनी अगदी मनातून आपल्या अष्टाक्षरीत बाबांना यथाशक्ती मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला म्हणुनच या पुस्तकाचेही नाव 'मनामनातील बाबाजी' हे सर्वानुमते ठरवण्यात आलं...
  
बाबा हे नेहमीच नवोदित साहित्यिकांनाच नाही तर तरुणांनाही मार्गदर्शनाचं काम करतात. विविध वर्तमानपत्रातून नेहमीच अध्यात्मिक, साहित्यविषय, सामाजिक तसेच प्रेम व आकर्षण यांसारख्या विषयावर आपल्या निर्भिड‌ आणि निपःक्ष  लेखणीने लिहित असतात. शिवाय बाबांचा मित्र परीवारही खूप मोठा आहे. विविध क्षेत्रातील दिग्गजांना भेटणं तसेच अनेक विषयावर त्यांच्याशी तासनतास चर्चा करणं हे बाबांच आवडतं काम, बाबांबद्दल बोलण्यासारखं खूप काही आहे. एवढ्या साहित्यकारांनी तसेच प्रस्तावणेच्या निमित्ताने मा. संसारे सरांनी बाबांना आपल्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न केला पण बाबा या सगळ्यात मावणारं व्यक्तीमत्व नाहीत हे मात्र नक्की. 
  
बाबांकडे पाहिलं किंवा त्यांच्याशी बोललं की नेहमीच मला संत तुकारामांचे अनेक गुण त्यांच्यात दिसतात. शिवाय संत तुकारामांच्या ओळीही आठवतात. 

बोले तैसा चाले । त्याची वंदावी पाऊले ॥
अंगे झाडीन अंगण । त्याचे दासत्व करीन ॥
त्याचा होईन किंकर । उभा ठाकेन जोडोनि कर ॥
तुका म्हणे देव । त्याचे चरणी माझा भाव ॥

वरील ओळींचा अर्थ म्हणजेच जो 'जसा बोलतो त्याप्रमाणेच वागतो' त्याच्या पाऊलांचे मी वंदन करतो.
त्याच्या घराचे अंगण मी स्वतःच्या अंगाने झाडीन, त्याचा दास बनून कायमस्वरूपी राहीन. त्याचा दास होऊन त्याच्या सेवेसाठी नेहमी त्याच्यासमोर हात जोडून उभा राहीन.
माझ्यासाठी तोच देव आहे आणि त्याच्या चरणीच माझा प्रेम भाव आहे." अगदी असच व्यक्तीमत्व मला बाबांतून नेहमीच जाणवतं.
 

आमदार सुभाष झांबड सोबत बाबाजी 

बाबा हे पण असच व्यक्तिमत्व जसं बोलतात, जसं लिहतात, अगदी तसच वागतात... म्हणुनच हे पुस्तक फक्त साहित्यप्रेमींनाच नाही तर सर्व स्तरातील व्यक्तींना या पुस्तकाच्या माध्यमातून एक नवी प्रेरणा मिळेल शिवाय अष्टाक्षरी या लोक‌प्रिय प्रकाराची माहितीही होईल आणि बाबांना मनामनातून समजून घेण्यास मदत होईल. खरं तर अशा व्यक्तिमत्वाबद्दल अनेक जन लिहत असतात. पण एकाच प्रकारच्या कवितेच्या माध्यमातून अनेक नामांकीत कवींनी एकत्र येऊन एका व्यक्तिमत्वावर मनमोकळं लिहणं आणि त्याचं आय.एस.बी.एन. प्राप्त पुस्तक तयार होणं आणि याची संपादनाची जबाब‌दारी माझ्याकडे येणं हे माझ्यासाठी स्वप्नवतच आहे. पण म्हणतात ना! चांगल्या कामाची फक्त सुरुवात करायची असते हजारो हात आपोआप मदतीला तयार होतात. याचा प्रत्यक्ष अनुभव या पुस्तकाचे संपादन करताना मला आला. अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या, त्याचबरोबर एक आदर्श शिक्षिका, आदर्श कवयित्री जयश्री औताडे मॅडम‌ ज्यांना नुकताच शिक्षणमहर्षी पुरस्काराने सन्मानीत करण्यात आलं त्यांचेही बाबांबद्दलचे मनोगत खूपच बोलके आहे. 

एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. सुधीर गव्हाणे सोबत बाबाजी 

ग्रामीण साहित्यकार बाबाजी चन्ने यांचा वाढदिवस साहित्यिक समुहावर मोठ्या उत्साहाने साजरा झाला.  नवोदीत कवींसह अनेक अनुभवी कवींनी बाबाजींच्या जन्मोत्सवात स्वलिखीत कविता सादर केली. ज्यावेळी मी या कविता वाचल्या तेव्हा या कविता मनाला खूप भावल्या. एकापेक्षा एक वरचढ कविता वाचून झाल्यावर ज्यावेळी बाबांशी याविषयी चर्चा झाली. त्यावेळी आम्ही या सर्व कवितांचे ई-बुक बनवण्याचा निर्णय घेतला. पण या उपक्रमात सहभागी  लेखकांना या ई-बुकची हार्ड‌ काॅपी तयार व्हावी असं वाटायचं. कित्येकांनी तसा प्रस्तावही अनेकदा समोर ठेवला पण बऱ्याचदा आम्ही त्या गोष्टीकडे थोडं दुर्लक्ष केलं होतं. पण समूहाचे मार्गदर्शक बाबाजी चन्ने यांनीही पेपरबॅक काॅपीसाठी परवानगी देऊन वर्डलॅन्ड पब्लिकेशनचे व्यासपीठ उपलब्ध  करुन दिले. तेव्हा ठरवलं की जर  एका ग्रामीण साहित्यकारावर एवढ्या मोठ्या प्रमाणात व एकाचढी एक कविता लिहण्यात आल्या आहेत. या सर्व अविस्मरणीय आहेत. या सर्व रचनांचे खरोखरच पुस्तक तयार व्हायलाच पाहिजे. आणि शेवटी पुस्तकाचे खास आकर्षण ठरलेल्या  प्रा. जगदीश संसारे सरांच्या अभ्यासपूर्ण प्रस्तावणेतून हे पुस्तक तयार झाले. या पुस्तकासाठी सहसंपादक तथा तांत्रिक सहायक कावेरी गायके मॅडमचेही खूप मोलाचे सहकार्य लाभले...

प्रसिद्ध गायक राहुल खरे सोबत बाबाजी 

 

या पुस्तकामध्ये 'येवो बहर क्षणांना " या विषयाखाली  लिहलेल्या अप्रतिम कविता ( विशेषतः 'अष्टाक्षरी' )  निवडण्यात आल्या व मनामनातले बाबाजी " हे नाव ठरवण्यात आले. हे पुस्तक प्रकाशित होताना कालावधी खूप लागला पण शेवटी सगळ्यांनाच आवडेल अश्या मुखपृष्ठासह हे पुस्तक आपल्या हातात पडले याचा खूप आनंद वाटतोय, कारण 'मनामनातले बाबाजी' खरोखरच मनामनातून  मनामनापर्यंत पोहोचवण्याचे राईटर्स वर्ल्ड शृंखलेचे स्वप्न खऱ्या अर्थाने पूर्ण होत आहे. तसेच अनेक नवोदितांना व अनुभवी लेखकांसह वाचकांना तसेच अभ्यासकांना अष्टाक्षरींचा हा संग्रह नक्कीच आवडेल याचा मला पूर्ण विश्वास आहे. या पुस्तकाच्या परीपूर्णतेसाठी सहभाग घेतलेले सर्व सारस्वतकार, कवयित्री जया मुंडे,  हरी दळवी, प्रा. जगदीश संसारे, आणि बाबाजी चन्ने यांच्या सहकार्याशिवाय ही कलाकृती साकार होणं कधीच शक्य झालं नसतं. तसेच या स्पर्धेच्या परीक्षणाची जबाबदारी परीक्षक मा. विंदा वीरकर यांनी सर्व कवितांचा अत्यंत सुक्ष्मपणे अभ्यास करुन पार पाडली, त्यांचेही या मनोगताच्या निमीत्ताने आभार व्यक्त करतो. आणि सर्वांच्या कायम ऋणात राहून व बाबांना पुनश्च एकदा वाढदिवसाच्या व भावी आयुष्याच्या शुभेच्छा देऊन मी या ठिकाणी थांबतो... धन्यवाद.

    

अमर आर. भुंगुर्डे
प्रमुख, राईटर्स वर्ल्ड साहित्यिक समूह