अध्यात्म, शिक्षण व साहित्याला न्याय देणारी दुर्गा

अध्यात्म, शिक्षणाबरोबरच सौ. दुर्गा देशमाने-राऊत यांचे साहित्य क्षेत्रातही महत्वाचे नाव आहे. सत्य आणि ज्वलंत विषयावर त्यांचे लेखन असते.

अध्यात्म, शिक्षण व साहित्याला न्याय देणारी दुर्गा

आपुलिया हिता, जो असे जागता।
धन्य माता पिता, तयाचिया ।।१।।
कुळी कन्या पुत्र, होती जे सात्विक।
तयाचा हरीक, वाटे देवा ।।ध्रु।।

गीता भागवत करिती श्रवण।
आणिक चिंतन विठोबाचे ।।२।।
तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा।
तरी माझ्या दैवा पार नाही ।।३।।

वरील संत तुकाराम महाराजांचा अभंग माणसाला खुप काही शिकवून जातो. महाराजांच्या वरील एकाच अभंगात सुसंस्कृत देश घडविण्याची ताकद आहे. फक्त प्रत्येकाने तुकाराम महाराजांच्या अभंगाचे अनुकरण करायला पाहीजे. कारण जो देशाच्या,  धर्माच्या, समाजाच्या उन्नतीसाठी, हितासाठी नेहमी तत्पर असतो. जागे असतो. त्याचा विचार साक्षात पंढरीचा विठोबा करत असतो. अशा तत्पर असणाऱ्या साधकाच्या कुळात, कुटूंबात नक्कीच श्रेष्ठ व्यक्ती जन्म घेत असते. त्या व्यक्तीचा हेवा पूर्ण देश करत असतो. तसेच त्याचा हेवा देव पण करत असतो.

फक्त आपल्याला गरज असते, आपल्या कुळात जन्म घेणाऱ्या बालकाला संस्कार देण्याची, कारण संस्कारक्षम अपत्ये हीच खरी देशाची संपत्ती असते. अशी अपत्ये स्वतःचा नव्हे तर कुळाचा आणि देशाचा उद्धार नक्कीच करू शकते. कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात ही स्वतःपासून केली पाहिजे. तेव्हाच ते कार्य पूर्ण होत असते. त्यामुळे संत तुकाराम महाराजांनी अशा मातापित्यांचा हेवा ईश्वराला देखील वाटतो असे वरील अभंगात म्हटलेले आहे. कार्यसिद्धी आणि समाजहितापासूनच देशाचे बीज पेरले जाते. मानवी मनाला वळण लावणाऱ्या घटनांची सुरुवात 'घर' नावाच्या छोट्या विश्वापासूनच सुरू होते. आणि त्यात आई-वडीलांचा सिंहाचा वाटा असतो. कोणतेही लहान बाळ हे अनुकरणीय असते. त्याच्या आजूबाजूला घडणाऱ्या प्रत्येक घटना या त्याच्या बालमनावर परिणाम करत असतात. लहान वय हे संस्कारक्षम असते. परंतु त्याच्या मनाचा कागद हा कोरा करकरीत असतो. अशा कोर्‍या कागदावर लिहिलेल्या संस्कारावरच पुढील आयुष्याची सुरूवात होते.

प्रत्येक माणसात नर आणि नारायण, देव आणि दैत्य गुणांचा वास जन्मताच असतो. परंतु सभोवतालची परिस्थिती यामध्ये असणाऱ्या काही गुणांना आकार देत असते. बालपणाचे संस्कार माणसाला राम ही बनू शकतात, तसेच अहंकारी रावणही बनवू शकतात. बालपणाच्या संस्कारात खुप मोठी ताकद असते. माता जयवंता बाईसाने महाराणा प्रतापसिंहांच्या बालमनावर देशप्रेमाचे संस्कार कोरले, त्या देशप्रेमाच्या संस्कारामुळे महाराणा प्रतापसिंह घडले, आज हिंदुस्थानच्या इतिहासामधील सर्वात महापराक्रमी राजा म्हणून महाराणा प्रतापसिंहाचे नाव पूर्ण जगात घेतले जाते. राजमाता माँसाहेब जिजाऊ यांनी सुसंस्कार केले म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज घडले. 'तुझ्या पायाला घाण लागली तरी चालेल परंतु तुझ्या मनाला घाण लागता कामा नये', असे ज्या आईने सांगितले तिथे सानेगुरुजीसारखे विचारवंत घडले. संस्कार रुजवावे लागतात. आपण जसे स्वतःचे आचरण ठेवतो, तशीच अनुकरणप्रिय पिढी निर्माण होत असते. मुलगा जर सुसंस्कृत घडला तर तो एका कुळाचे नाव उज्वल करतो. अन् मुलगी जर सुसंस्कृत घडली तर ती माहेर व सासर या दोन कुळांचे नाव ती उज्वल करते. त्यामुळे अनेक सुसंस्कृत पिढ्या निर्माण होतात. 

तसेच माजलगाव, जि. बीड येथील एक सुसंस्कृत, आध्यात्मिक व श्रेष्ठ व्यक्तीमत्व म्हणजे सौ. दुर्गा देशमाने-राऊत होय. आपल्या मात्यापित्यापासून मिळालेला सुसंस्काराचा वारसा त्यांनी सासरी ही जपला. त्याच सुसंस्कार त्यांनी आपल्या मुलांवर देखील केले. आणि त्या ज्या खाजगी शाळेत शिकवतात त्या विद्यार्थ्यांमध्ये देखील सुसंस्काराची पेरणी करत आहे. त्यातूनच त्यातूनच अनेक संस्कारक्षम पिढ्या घडतील आणि त्या पिढ्यांची समाजाला, देशाला मोठी मदत होईल... हे त्रिवार सत्य आहे. शिक्षक कसा असावा तर तो सौ. दुर्गा देशमाने-राऊत यांच्यासारखा असावा, कारण मला त्यांच्यात नेहमीच सावित्रीबाई फुले आणि साने गुरूजींची झलक दिसते. त्यांचे विचार दिसतात. ज्याच्यासोबत सावित्रीबाई फुले आणि साने गुरूजी यांचे विचार आहे, तो नक्कीच सक्षम पिढी घडविणारा 'कारागिर' असतो असे मला वाटते.
    
शिक्षणाप्रमाणे त्यांना आध्यात्माची देखील ओढ आहे. आजच्या काळात 'प्लास्टिक आध्यात्म' फार मोठ्या प्रमाणावर फोफावले आहे. परंतु सौ. दुर्गा देशमाने-राऊत यांचे अध्यात्म डोळस आहे. संस्कारक्षम आहे. त्या अध्यात्माला एक परंपरा आहे. ती परंपरा म्हणजे सुसंस्काराची परंपरा ती परंपरा कोणती तर सकाळी लवकर उठून सडा रांगोळी काढणे, सडा रांगोळी का काढायची तर परमेश्वराच्या स्वागतासाठी... परमेश्वरालाही आपल्या घरात प्रवेश करायला प्रसन्न वाटले पाहीजे, हा त्यामागचा प्रामाणिक हेतू. आपली आई सकाळी लवकर उठून सडा, रांगोळी, देवपूजा करते, हे पाहून मुलांवरही लवकर उठतात. आईचे अनुकरण करतात. आजच्या पिढीत अशी आई प्रत्येकाच्या नशीबात नसते, ज्याच्या नशीबात असते, तो खरच भाग्यवान म्हणावा लागेल. अशा आईलाच मातृत्व, दैवत्व असं मनापासून म्हणावं वाटतं.

अध्यात्म, शिक्षणाबरोबरच सौ. दुर्गा देशमाने-राऊत यांचे साहित्य क्षेत्रातही महत्वाचे नाव आहे. सत्य आणि ज्वलंत विषयावर त्यांचे लेखन असते. पण, माणूस हो, आज आपण रावण शोधतो अन् राम नजरेआडच राहतो, सोशिकतेचा सागर..., झरा आनंदाचा, होय, मी तृतीयपंथी, माणूस हो..., गणेश उत्सवाचे उद्दिष्टे, प्रेमा तुझा रंग कसा? त्यांचे लेखन मानवी मनाला भुरळ घालते आणि विचार करायला भाग पाडते.

अध्यात्म, शिक्षण व साहित्य या तिन्हीही क्षेत्राला सौ. दुर्गा देशमाने-राऊत या पूर्णपणे न्याय देतात, तशाच त्या न्याय देणारा महिला लेखिकांच्या साहित्य परिवाराच्या त्या सहप्रमुख देखील आहेत. समाजात सौ. दुर्गा देशमाने-राऊत यांच्यासारख्या खूप कमी व्यक्तित्व पाहायला मिळतात. मला मनापासून असं वाटतं, सौ. दुर्गा देशमाने-राऊत यांच्या रूपाने परमेश्वराची प्रतिकृती दिसते. दुर्गेचे रूप दिसते.

Baba Channe

बाबा चन्ने,
धोंदलगाव, ता. वैजापूर