मरण सोपे की जीवन? हाच प्रश्न पडतो शेतकरी कन्या म्हणून जगताना

नुकसानामुळे शेतकरी त्रस्त झाले आहे. त्याच्या आयुष्यातील आशेच्या सुर्याचा अस्त होताना दिसतोय. माझ्या डोळ्यासमोर असणारे माझ्या गावाची स्थिती पाहून मला अगदी अश्रू अनावर झाले.

मरण सोपे की जीवन? हाच प्रश्न पडतो शेतकरी कन्या म्हणून जगताना

घर गळत असताना देखील पाऊस यावा कुटूंबाला आधार असणाऱ्या जमिनीची तहान भागावी ही प्रत्येक शेतकऱ्यांची इच्छा असते. बळीराजा घाम गाळून कष्टच मातीत पेरत असतो, तेव्हाच कुठे हिरवे सोने आनंदाने डोलू लागतात. आता पाण्याचा प्रश्न मिटला पण वर्षभर केलेल्या मेहनतीचा सागर आटला. सर्वसाधारण शेतकरी एका आशेवर जगत असतो. पोटाला चिमटा घेऊन मातीत बीजे टाकून हातात किती येईल याची शाश्वती नसतांना देखील हिंमत न हरता आलेल्या वेळेसोबत लढत असतो. दुष्काळ, अवकाळी पाऊस, पीक मालाला भाव नाही हे बघून तर त्रासदायक क्षण जणू बळीराजाच्या पाचीलाच पुजंलेले असतात असे वाटायला लागले. पाऊस आला खरा पण आनंदाचे क्षण पुराच्या पाण्यात वाहून घेऊन गेला. येवढेच नाही तर अनेकांनी साठवलेल्या पैशातून छोटासा संसार मांडला होता. त्यामुळे ते जेव्हा जेव्हा पाण्याला बघण्याचे धाडस करताय त्यांना स्वप्न मात्र पाण्यात उकळताना दिसताय. पाऊस यावा शेतावर हिरवी चादर पसरावी हेच माझे शेतकरी मायबापाचं उघड्या डोळ्यात स्वप्न नाचत असते. पण आत्ताची परिस्थिती पाहून तोंडचं पाणी देखील नदीला जाऊन मिळाले की काय असे वाटायला लागले. सुखाच्या सरी अंगणात पडाव्यात त्यात मनसोक्त भिजावं असा विचार करत झोपी जाणारा माझा शेतकरी एका वेळचं जेवण कमी करून पेरणी करतो. पेरणीपासून कापणीपर्यंत स्वतःपेक्षा जास्त जीव पिकाला लावत असतो. त्याच्या आयुष्यात थंडी, पाऊस, ऊन वारा यांसारखे सत्तर वादळे थैमान घालत असतात. तरीही बळीराजा कष्टाचे अत्तर लावून येणाऱ्या परिस्थितीचा सामना करत असतोच सध्या चालू असणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांचे पीक वाहून तर गेलेच पण माझ्या कष्टकऱ्यांचा जीव ज्यामध्ये दडलेला असतो, म्हणजेच शेतातील माती देखील वाहून गेली. बाकी सर्व माझा शेतकरी कमावू शकतो पण ज्याच्या बळावर संसार थाटत असतो तीच मातीच वाहून गेली तर कुणाला आणि कसा दोष देणार? घरादाराचा, पोटाचा प्रश्न तर जिवंत असताना सामान्य माणूस मरणानंतरच्या वेदना सोसतो आहे. पावसामुळे रस्त्यावर समूद्र आहे की समुद्रात रस्ता निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे हेच कळेना झाले. पाहता पाहता गरीब शेतकरी कुटुंबाची घरे पडली. रहात असलेल्या घरात पाणी शिरले कित्येक वर्षांपासून त्यांनी मांडलेल्या छोटासा संसार क्षणात पुराच्या पाण्याने उद्ध्वस्त झाला काय करणार अशा वेळेस माझा शेतकरी राजा? अहो! मला तर प्रश्न पडतो माझ्या शेतकऱ्याला राजा म्हटले जाते पण त्यालाच इतरांसमोर हात पसरण्याची वेळ का येते. घर पडलेल्या माझ्या शेतकऱ्यांना डोक्याला हात लावून बसणे खेरीज दुसरा पर्याय देखील नाही चार भिंतीत तो हंबरडा फोडू शकत होता, सुख-दुःख सांगू शकत होता. तेच डोक्यावरचे छप्पर क्षणात कोसळले ढगांनी एकदाच कोसळून चोहीकडे पाणी-पाणी केले पण माझा शेतकरी अजूनही डोळ्यातील पाणी अडवतोय. अजून किती दिवस दुःखाच्या लाटा येतील कुणास ठाऊक? आनंदाश्रूंचा देखील कधी शेतकऱ्यांच्या आयुष्यात पूर येईल की नाही याची हुरहूर मनाला लागून असते.

बरे झाले देवा कुणबी केलों ।
नाही तरी दंभे असतो मेलो ।।१।।
भले केले देवराया ।
नाचे तुका लागे पाया ।।२।।
तुका म्हणे थोरपणे ।
नरक होती अभिमाने ।।६।।

या अभंगात संतश्रेष्ठ तुकाराम महाराज देवाला उद्देशून म्हणतात, ‘‘देवा बरे झाले तू मला कुणबी (शेतकरी) केले. उच्च जातीत जन्माला आलो असतो तर मी फुकाचा ताठा मनात बाळगून मेलो असतो.'' आपण कुणबी (शेतकरी) असल्याचा आनंद होऊन तुकाराम नाचत देवाच्या पायी लागतात. हे वरील अभंगावरून स्पष्ट होते. म्हणजे बाकी सर्वांपेक्षा शेतकरी किती साधा असतो हे लक्षात येते. म्हणून मला कधी कधी कळतच नाही अनेक साधुसंताना शेतकरी कसा आहे. ते कळले पण भाजीचे भाव कमी- जास्त करणाऱ्यांना कधी कळणार शेतक-यांची अवस्था. आग पाण्याने शांत होऊ शकते पण पाण्याला पर्याय काय? तशीच तर वेळ माझ्या शेतकऱ्यांवर आहे. अहो थोडेसे पाणी देखील आपल्या घरात सांडले तर जीव कासावीस होतो माझ्या शेतकऱ्यांचे पूर्ण पिक पाण्यात आहे. पण किती लोक त्यांना मदतीचा हात देताय! तेही अगदी बोटावर मोजण्याइतकेच. कसं आहे ना खरं बोलल तर पटत नाही, आणि बरं बोलले तर खरं वाटत नाही. बळीराज्यावर रोज नवीन-नवीन संकटांचे वार सफासफ होत असतात. तेवढे करूनही जर योग्य कष्टाची किंमत मिळाली असती तर माझा शेतकरीच सर्वात श्रीमंत असता. 

नुकसानामुळे शेतकरी त्रस्त झाले आहे. त्याच्या आयुष्यातील आशेच्या सुर्याचा अस्त होताना दिसतोय. माझ्या डोळ्यासमोर असणारे माझ्या गावाची स्थिती पाहून मला अगदी अश्रू अनावर झाले. ज्याप्रमाणे बांद, रस्ते, धरण फुटली त्याचप्रमाणे तीन -चार पिढ्या पासून भिवगाव या गावाची शान असणारे वडाच्या झाडाने क्षणात निरोप घेतला त्याच क्षणी अंगावर शहारे उभे राहिले. अत्यंत मजबूत असणारे जिथे अनेकांचे सुख सोहळे पार पडले. ज्या झाडाखालच्या मातीला संत गाडगेबाबा यांचे पाय देखील लागले होते. ज्या झाडासोबत आठवणींचा साठा आहे. त्याला ढासळलेले पाहून गावकऱ्यांची काय अवस्था होत असेल याचे दुष्य डोळ्यासमोर उभे राहिले, याचाच विचार करत असतांना न भरणारे घाव निर्माण झाले. दिवसभर कष्ट करून पेटणारी चुलीची माती पाण्यासोबत एकरूप झाली पुन्हा एकदा पोटाच्या भुकेचा प्रश्न मनात गोंधळ घालेलच पण कधी कधी मनात विचारचक्र फिरते की मरण सोपे की जीवन? देवाने बहाल केलेल्या जीवनात शेतकऱ्यांच्या वाटेला आनंद कमी आणि दु:ख जास्तच हे शेतकरीकन्या म्हणून जगतांना वेळोवेळी अनुभवायला मिळते. पाऊस संकटाचा पडला असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही. आयुष्यात कोरडा दुष्काळ अनुभवलाही आणि आता ओला दुष्काळ पडला आहे. अनेकांना स्वतःचा जीव वाचवता वाचवता मुक्या जनावरांचे जीव देखील वाचवता आले नाही. याची रुखरुख मनाला लागून आहे. पुरामुळे विस्कळीत झालेले जीवन तसेच सर्व गावांची पुर्वत स्थिती व्हायला किती वेळ लागेल ते देवच जाणे. 

Kaveri Gayake

कावेरी आबासाहेब गायके
भिवगाव, ता. वैजापूर, 
जि. औरंगाबाद