मृत्यूनंतर साधी भावपूर्ण श्रद्धांजली देखील नाही, ही मोठी शोकांतिकाच

आयुष्यभर प्रेम करून देखील सागरच्या मृत्यूनंतर सुवासिनी भावपूर्ण श्रद्धांजली... देखील म्हणू शकली नाही. ही मोठी शोकांतिकाच म्हणावी लागेल. खरं प्रेम करणारे योगायोगाने भेटत असतात.

मृत्यूनंतर साधी भावपूर्ण श्रद्धांजली देखील नाही, ही मोठी शोकांतिकाच

संत एकनाथ महाराजांचा पुढील अभंग माझ्या वाचनात आला आणि दुःख कसं निर्माण होत जातं, त्याचा मार्गही कळाला. एकनाथ महाराज म्हणतात, 

आशा तेथे नाही सुख। 
आशेपाशी परम दु:ख ।।
आशा सर्वाशी बाधक। 
मुख्य दोष ते आशा ।।

आशा हेच सर्व दुःखाचे मूळ आहे. आशा निर्माण झाली की, निराशा लगेच धावत आपल्याकडे येत असते, आणि आपण आपोआपच दुःखाच्या सागरात ढकललो जातो. दुःख किती वाईट असते, आणि ते माणसाला कसं मृत्यूच्या दारात ढकलत नेतं याचे उदाहरण पुढील कथा वाचल्यानंतर आपल्या नक्कीच लक्षात येईल. 

सागर हा साहित्यिक विचाराचा उच्च शिक्षित, सुसंस्कृत, हळव्या मनाचा व आध्यात्मिक स्वभावाचा तीसीतील तरूण. आयुष्यात बालपणापासूनच दुःखच दुःख वाट्याला आलेलं. त्यामुळे कोणाचे दुःख पाहीले की तो आपोआपच कासावीस व्हायचा. कोणाच्या डोळ्यातील अश्रू तो कधीच पाहू शकत नव्हता. त्यामुळे तो त्याच्या पध्दतीने पूर्णपणे मदत करायचा. कोणाच्याही अडी-नडीला उभा राहायचा.

सागरची ओळख इंग्रजी माध्यमाची  एक शाळा सुरू करण्याच्या निमित्ताने सुवासिनी नावाच्या तरूणीशी झाली. ओळख फक्त फोनवरच होती. तरीही ती झपाट्याने वाढत गेली. तासनतास बोलणं होऊ लागलं. सुवासिनीने तिच्या आयुष्यातील सर्व अडी-अडचणी सागरला सांगितल्या. तीने सांगितले की, माझे एका मुलावर प्रेम होते. आणि दोन वर्षापूर्वी तो मला अचानक सोडून गेला. आणि माझा मोबाईल नंबर देखील त्याने ब्लॅकलिस्टमध्ये टाकलेला आहे. त्याच्या विरहात मी दोन वर्षापासून रडतेय. हे ऐकून सागर खुपच दुःखी झाला. इतके निर्मळ प्रेम असून देखील कोणी सोडून जात असेल तर त्याच्याइतका नालायक दुसरा कोणी नाही. असे सागरला वाटू लागले. सागरच्या सकारात्मक विचारामुळे ती हळूहळू तिच्या प्रियकराला विसरत गेली. सागर आणि सुवासिनीची छान मैत्री सुरू झाली. सुवासिनीची माया नावाची एक मैत्रीण होती. मायाला भाऊ नव्हता. आणि सागरला बहीण नव्हती त्यामुळे सागरने मायाला बहीण मानले. सख्या बहीणीपेक्षाही जास्त प्रेम सागर मायावर करू लागला. माया आणि सुवासिनी या दोघी खास मैत्रीणी होत्या.

सागरच्या आयुष्यात बालपणापासून दुःख असल्यामुळे सुवासिनीविषयी त्याच्या मनात दिवसेंदिवस ओढ निर्माण होऊ लागली. कारण एक दुःखच दुसऱ्या दुःखाला प्रामाणिकपणे साथ देऊ शकतं असं सागरला मनापासून वाटत होतं. एक दिवस सागर सुवासिनीला म्हणाला, मी तुझ्यावर मनापासून प्रेम करतो. आणि चार पाच दिवसातच तीनेही त्याच्या प्रेमाला होकार दिला. सागरला वाटले दोन वर्ष जर सुवासिनी एखाद्याच्या आठवणीत रडत असेल तर आपण तीला मनापासून प्रेम देऊ तिच्या डोळ्यात कधीच पाण्याचा थेंब देखील येऊ देणार नाही. असे त्याला मनोमन वाटले. तो तिच्यावर जीवापाड प्रेम करू लागला. तसेच तीही प्रेम करू लागली.

होकार मिळून तीन दिवस झाल्यानंतर सोमवारी भेटायचे ठरले. ठरल्याप्रमाणे भेट झाली. अर्धा तास वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाली. आणि अचानक सुवासिनी भूषणला म्हणाली. प्लीज सर मला माफ करा. मी तुमच्यावर प्रेम करू शकत नाही. आपण मित्र मैत्रिणी म्हणून राहू. मी एक मैत्रीण म्हणून तुम्हाला आयुष्यभर साथ देईल. तुमच्या सुख दुःखात मी सर्वात पहिले सहभागी होत राईल. फक्त मी तुमच्यावर प्रेम करू शकत नाही. मला माफ करा. सागरला हे ऐकून शाॅक बसल्यासारखे झाले. आठ दिवसातच प्रेम कहाणी संपुष्टात आली. त्यामुळे त्याला खुप दुःख झाले. आपोआपच त्याच्या दोन्ही डोळ्यातून पाणी आले. नशीबाने परत एकदा सागरला दुःखाच्या खाईत लोटले. पण सागरने विचार केला मैत्रीण म्हणून जरी सुवासिनीची साथ मिळाली तरी आयुष्य सुखासमाधानात जाईल. 

सुवासिनी हळूहळू सागरसोबत बोलणं कमी करू लागली. तीच्या पाठोपाठ माया देखील बोलणं कमी करू लागली. दोन महिन्यात सुवासिनीने पूर्णपणे बोलणं बंदच केलं होतं. माया कधीमधी बोलत होती. सात आठ महिन्यात मायाने देखील बोलणं बंदच केलं. त्यामुळे सागर खुप दुःखी झाला. त्याला रात्ररात्र झोप येत नसे. कित्येक रात्री त्याने सुवासिनीच्या आठवणीत जागून काढल्या. तो स्वतःलाच प्रश्न करू लागला. आता वागावं तरी कसं? इतके चांगले वागून जर अशी शिक्षा मिळत असेल तर आत्महत्या केलेली बरी. तो हळूहळू मानसिक आजाराकडे जाऊ लागला. स्वतः एकटाच बडबडू लागला. कधीही आपोआपच त्याच्या डोळ्याला पाणी येऊ लागले. काय करावे काहीच सुचेना. अशा अवस्थेत त्याला कळाले की सुवासिनीचे संकेत नावाच्या तरूणाशी 'अफेयर' आहे. आणि ती आनंदी जीवन जगत आहे. हे ऐकल्यानंतर सागर म्हणाला, ती आनंदी आहे ना. बस्स! मला दुसरं काहीच नको. फक्त ती आनंदी असायला पाहीजे. परंतु तोपर्यंत सागरला मानसिक आजाराने विळखा घातला होता. तो पूर्णपणे हतबल झाला होता. एवढा हुशार माणूस पण त्याची अवस्था खुप खराब झाली होती. हे बघितल्यानंतर त्याच्या मित्राने त्याला शहरातील एका दवाखान्यात नेले. दवाखान्यात नेल्यानंतर डाॅक्टरने त्याला मानसोपचार तंज्ञाकडे जाण्याचा सल्ला दिला.

मानसोपचार तंज्ञाकडे नेल्यानंतर उपचार सुरू झाले. सागरची पूर्ण कहाणी डाॅक्टरला सांगितल्यानंतर तोही भावनिक झाला. कारण कहाणीही तशीच होती. दगडालाही पाझर फुटावा अशी. डाॅक्टर म्हणाले अरे सागर! तू एखाद्या वेश्येवर जरी इतके प्रेम केले असते तर तीने तुला आयुष्यभर प्रामाणिकपणे साथ दिली असती. हे ऐकून सागरला डाॅक्टरचा रागच आला. पण तो राग त्याने व्यक्त केला नाही. कारण सुवासिनीला कोणी काही बोललं तर त्याला खुप राग यायचा. परंतु डाॅक्टरचा राग त्याने  दाखवला नाही. प्रत्येक तीन दिवसाआड डाॅक्टर उपचार करत होते. वेगवेगळे प्रयोग सागरवर करण्यात आले. तरी काही फरक पडेना. रोज मेडिसिन, इंजेक्शन सगळं काही करून देखील काहीच उपयोग होईना. दिवसेंदिवस आजार वाढत चालला होता. घरी काही कळू नये म्हणून त्याच्या मित्राने त्याला शहरातच एक रूम घेऊन दिली.

सागरची दाढी वाढली होती. तो दाढीही करत नव्हता. एक दिवस दवाखान्यात आल्यानंतर दवाखान्याच्या बाहेर तो आणि त्याचा मित्र उभा होता. तितक्यात तिथे एक कार येऊन उभी राहिली. आणि त्यातून एक मॅडम खाली उतरल्या आणि म्हणाल्या सर, मी प्रांजल! आपण सागर सर आहात का?  त्यावर सागर उच्चारला हो मी सागरच. त्यावर त्या म्हणाल्या मी रोज तुमचे लेख पेपरला वाचते, आणि वाचले की माझ्या डोळ्यात आपोआपच पाणी येते. किती सत्यता असते तुमचे लेखनात, किती भावनिक असतं तुमचं लेखन, पण हल्ली दोन महिन्यात तुम्ही काहीच लिहलं नाही. त्यावर सागरचा मित्र म्हणाला; सर सध्या आजारी आहे. त्यांच्यावर उपचार चालू आहे. त्यामुळे ते लिहित नाही. मानसोपचार तंज्ञ यांचा दवाखाना पाहून प्रांजलच्या डोळ्यात खळकन पाणीच आले. आणि त्या म्हणाल्या, सर! तुमची आणि तुमच्या लेखनाची महाराष्ट्राला गरज आहे हो. तरीही सागर शांतच होता. काहीच बोलत नव्हता.

काही दिवसानंतर संकेतही सुवासिनीला सोडून गेला. त्यामुळे ती परेशान होती. मायाच्या माध्यमातून सुवासिनी परत एकदा सागरशी बोलू लागली. सागर आणि सुवासिनी बोलू लागल्यामुळे मायाला देखील आनंद झाला. परंतु नशीबापूढे कोणाचेच काही चालत नाही, म्हणतात ना..! ते अगदी खरेच आहे. परत सुवासिनीच्या आयुष्यात संतोष नावाचा एक तरूण आला. आणि तीने सागरशी परत बोलणे बंद केले. यावेळी सागरला अजिबात वाईट वाटले नाही. कारण त्याला समजून गेले की, सुवासिनीने आपल्यावर प्रेम करावा! एवढी आपली योग्यता नाही. त्यामुळे तिच्याविषयी प्रेम फक्त मनात ठेवायचे, दाखवायचे नाही. एवढे होऊन देखील तिच्याविषयी किंचितही त्याच्या मनातील प्रेम कमी झाले नाही. 

एका वर्षानंतर माया बोलली, अरे सागर, सुवासिनी आजारी आहे रे! हे ऐकून सागर कासावीस झाला. त्याने लगेच फोन काढला आणि सुवासिनीला लावणार तर त्याला समजले, सुवासिनीने एका वर्षापूर्वी माझा नंबर ब्लॅकलिस्टमध्ये टाकलेला आहे. त्यामुळे तो फोन करू शकला नाही. त्याने मायाला विचारले काय झालं गं सुवासिनीला! त्यावर माया बोलली अरे तीची किडनी फेल झाली रे! हे ऐकून सागरच्या डोळ्यात पाणी आले. तो बोलला अगं माया माझ्याकडे दोन किडन्या व्यवस्थित आहे. मी माझी एक किडनी सुवासिनीला देतो. फक्त तू तीला सांगू नको.

किडनी द्यायची कायदेशीर कारवाई सागरने पूर्ण केली. मायाने सुवासिनीच्या आईला सांगून तीला शहरातील एका नामांकित हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. सागरलाही किडनी डोनेट करण्यासाठी त्याच हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. किडनी डोनेट झाली. सागरची किडनी सुवासिनीला बसविण्यात आली. आठ दिवसात सुवासिनी व्यवस्थित झाली. परंतु सागरची किडनी ऑपरेशन करून  काडत्यावेळी दुसऱ्या किडनीला टच झाली. त्यामुळे मायाला डाॅक्टरने सांगितले, सागर फक्त एकच महिना आपल्यासोबत आहे. त्याची दुसरी किडनी एका महिन्यात फेल होईल. त्यामुळे त्याचा मृत्यू अटळ आहे. हे ऐकून माया टेंशनमध्ये आली. इकडे सुवासिनी व्यवस्थित बरी झाली होती. सागर एका महिन्याचा सोबती आहे. हे माया सागरला सांगू शकत नव्हती. तीला इकडे आढ आणि तिकडे विहीर असे झाले होते. तोपर्यंत फेसबुकच्या माध्यमातून सुवासिनीच्या आयुष्यात एक सुंदर दिसणारा सुवास नावाचा तरूण आला होता.

सागरला मनापासून वाटू लागले सुवासिनीने आपल्यासोबत एकदा तरी बोलावं. तो मायाला बोलला. अगं माया सुवासिनीची मला खुप आठवण येतेय गं. माझं एकदा तरी बोलणं करून दे ना..! हे ऐकून मायाच्या डोळ्यात पाणी आले. थोड्याच वेळात तीने सुवासिनीला फोन केला आणि म्हटली सुवासिनी सागर आजारी आहे. त्याला तुझ्याशी बोलायचे आहे. त्याला एक फोन कर ना गं प्लीज. सुवासिनी बोलली; थोड्या वेळात करते मी फोन. संध्याकाळ झाली तरी सागर तीच्या फोनची देवासारखी वाट पाहत होता. परंतु तीने काही फोन केलाच नाही. संध्याकाळी सागरने मायाला फोन करून सांगितले माया सुवासिनीचा फोन आला नाही गं! त्यावर लगेच मायाने सुवासिनीला फोन केला आणि बोलली महत्वाचे बोलायचे आहे. अगं तुझी किडनी फेल झाली होती. तुला सागरने किडनी देऊन जीवदान दिले गं. त्याने मला शपथ दिली होती. मी तुला हा विषय कधीच सांगणार नाही. परंतु हा विषय तुलाही माहीत असणे गरजेचे होते. म्हणून बोलले. तू उद्या नक्कीच त्याला फोन कर आणि कमीतकमी एक शब्द तरी बोल. सुवासिनी फक्त हो म्हटली. पण ती तिच्या आयुष्यात नवीन आलेल्या तरूणात व्यस्त होती. त्यामुळे तीने काही फोन केला नाही. 

सोमवारचा दिवस होता. सकाळी अकरा वाजता सागरची किडनी फेल झाली. आणि त्याची प्राणज्योत मालवली. मरतेवेळी सागरच्या चेहऱ्यावर हास्य होते. त्याने विचार केला. आपण आपल्या जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत जीवापाड प्रेम करून देखील सुवासिनी आपली होऊ शकली नाही. परंतु माझ्या शरीरातील एक अवयव तीच्या अंतापर्यत तीच्यासोबत राहील. यामुळे सागर आनंदी झाला होता. सागरच्या मृत्यूची बातमी देण्यासाठी मायाने सुवासिनीला फोन करून सांगितले आज अकरा वाजता सागरचा मृत्यू झाला. त्याची अंत्यविधी दुपारी अडीच वाजता आहे. हे ऐकून सुवासिनी मायाला बोलली. माया मी सध्या माझ्या बाॅयफ्रेंन्डसोबत बाहेर आहे. मी सध्या खुप आनंदी आहे. सागर या विषयावर तुला मी नंतर बोलते. इकडे सागरच्या अंत्यसंस्काराची तयारी चालू होती, आणि तिकडे सुवासिनी तीच्या बाॅयफ्रेंन्डच्या मीठीत रममान झाली होती.

आयुष्यभर प्रेम करून देखील सागरच्या मृत्यूनंतर सुवासिनी भावपूर्ण श्रद्धांजली... देखील म्हणू शकली नाही. ही मोठी शोकांतिकाच म्हणावी लागेल. खरं प्रेम करणारे योगायोगाने भेटत असतात. त्यांना आपण ओळखायला शिकले पाहिजे, कारण सौंदर्य, पद, पैसा हे पाऊलोपावली भेटेल पण खरं प्रेम करणारा लाखात एखादाच सागर असू शकतो.

(वरील लेख व लेखातील नावे याचा कोणाच्याही आयुष्याशी काहीही संबंध नाही. आल्यास केवळ योगायोग समजावा.)

Baba Channe

बाबा चन्ने, धोंदलगाव,
ता. वैजापूर, जि. औरंगाबाद
babachanne86@gmail.com