"Pharmacist Strengthening Health System" ह्या ब्रीद वाक्याने यावर्षी "जागतिक फार्मसिस्ट दिन" साजरा करत आम्ही सर्व औषध निर्माण अधिकारी पुन्हा नव्या जोमाने रुग्ण सेवा देण्यासाठी तत्पर होत आहोत. औषध निर्माण अधिकारी हा रुग्णांचा सखा सोबती आहे. तो एक समुपदेशक आहे. रुग्णाच्या सेवेसाठी तत्पर असणारा एक घटक म्हणून प्रत्येक रुग्ण फार्मसिस्टकडे आशेने पाहत असतो. रजिस्टर फार्मसिस्ट आरोग्य प्रणाली मजबूत करण्याचे काम करत आहे.
रक्त वाहायला लागल्यापासून रक्त प्रवाह थांबण्यापर्यंत, थंडी आली ताप आला अगदी आरोग्याच्या कोणत्याही समस्या असुदेत औषधाशिवाय पर्याय नाहीच. आजाराचे निदान झाल्यावर तो बरा होईपर्यंत किंवा आजार होऊ नये म्हणूनही औषधे कार्यरत असतात. औषधे वितरित करणारा हा रुग्णाच्या औषधांच्या नियोजित वेळा, नियोजित ढोस, नियोजित मात्रा यांचा परिपूर्ण अभ्यास केलेला व्यक्ती म्हणाजे रजिस्टर फार्मसिस्ट.
साथीचे आजार असो अथवा अचानक उद्भवणारी अपत्ती असो रोगराई पसरण्याची वेळ आली की औषध निर्माण अधिकारी सज्ज असतो औषधे पुरविण्यासाठी. कोरोना काळातही सर्व बंद असतानाही रुग्ण सेवेसाठी मेडिकल चालूच होते. रजिस्टर फार्मसिस्टचे महत्व औषधे वितरणसाठी कायद्याने बंधनकारक करण्यात आले आहे. तरीही राज्यात प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय आहेत, अनेक आरोग्य उपकेंद्र आहेत, आपला दवाखानाही सुरू झाला आहे. परंतु औषध तिथे फार्मसिस्ट ही संकल्पना अमलात आणली जात नाहीय. असे करताना रुग्णाच्या जीवाशी खेळानेच होत आहे. उपकेंद्र, आपला दवाखाना येथे फार्मसिस्ट असणे गरजेचे आहे, कारण तिथे आता डॉक्टर आहेत, अनेक औषधे साठा तिथेही उपलब्ध आहे. तिथेही रुग्णांची गर्दी होताना दिसत आहे. फार्मसी ॲक्टनुसार फक्त रजिस्टर फार्मसिस्ट औषधे वितरण करू शकतो तर अशा ठिकाणी ही पदे उपलब्ध न करता शैक्षणिक दृष्ट्या परिपूर्ण नसणाऱ्या व्यक्तीकडून औषधांचे वितरण करणे योग्य आहे का? हे रुग्णाच्या जीवाशी खेळणेच आहे.
पशु वैद्यकीय दवाखाना आहे तिथे ही औषधांचा वापर आहे. पशु असतील तरी त्यांनाही अजार आहेच मुक्या जनावरांची औषधांचे वितरण सुधा रजिस्टर फार्मसिस्टशिवाय होत आहे. औषधांची परिपूर्ण माहिती ही एका रजिस्टर फार्मसिस्टला माहीत असते, होणारे साईड इफेक्ट ॲडवर्स रिअँक्शन, त्यांच्या मात्रा, वेळा, त्यांचे उपयोग ह्याचे ज्ञान असणाऱ्या व्यक्तीची जबाबदारी मनुष्यबळ, पदे तयार न करता कोणाच्याही हाती सोपविण्यात येत आहे. विनंती राहील की जिथे जिथे दवाखाना तिथे तिथे रजिस्टर फार्मसिस्टची पदे आणि उपलब्धता करणे गरजेचे असल्याने त्वरित निर्णय अपेक्षित आहेत.
कोणताही आजार हा औषधाशिवाय बरा होऊ शकत नाही. साथरोग वरील औषधे वितरण करण्याचा अधिकार फार्मसी ॲक्ट 1948 नुसार डॉक्टर व परिचारिका यांना सुधा नाहीय, असे केल्यास कायद्याचे उल्लंघन होते हे औषध निर्माण अधिकारी संघटनेने वेळोवेळी शासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे. अनेक वेळा लेखी स्वरूपात निवेदने दिली आहे. अशा आहे राज्यातील एकूण उपकेंद्र आणि नवीन आरोग्यवर्धीनी केंद्र मिळून 11 हजार रजिस्टर फार्मसिस्ट पदे तयार होतील आणि ते रिक्त पदे भरली जावून तिथे औषधांचे वितरण हे योग्य रीतीने होऊन रुग्ण फायदाच होईल.
आजही अनेक रुग्ण वेगवेगळ्या रंगाच्या गोळ्या मागतात, पिवळी गोळी ही जुलाबाची गोळी, गुलाबी पित्ताची, सफेद तापाची, पण गोळ्यांचे रंग नाही तर त्या औषधांचा कंटेंट महत्वाचा असतो. हे समजून सांगणे आणि त्यावबद्दल रुग्णाच्या शंकेचे निरसन करणे गरजेचे आहे. त्यासाठी त्या खुर्चीवर रजिस्टर फार्मसिस्ट असणेच महत्वाचे आहे. रुग्ण आणि डॉक्टर यांच्यातील दुवा बनून, रुग्णाचा सखा सोबती बनून रजिस्टर फार्मसिस्ट हा आरोग्य प्रणाली मजबूत करणारा एक कोहिनूर आहे. सुरक्षित आणि प्रभावी औषधे रुग्णांपर्यंत पोहचवण्यासाठी सज्ज असणाऱ्या माझ्या सर्व रजिस्टर फार्मसिस्ट, सर्व औषध निर्माण अधिकारी यांस जागतिक फार्मसिस्ट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...
सौ. स्वाती ठुबे,
(औषध निर्माण अधिकारी जिल्हा परिषद, अहमदनगर)